- सचिन जवळकोटे
महाराष्ट्रभर फिरून नारद मुनींना कंटाळा आलेला. त्यांनी ठरवलं, ‘चला जराऽऽ सोलापूरला चक्कर मारून येऊ या.’ मग काय.. वीणा झंकारत मुनी सोलापुरी पोहोचले. इथं त्यांना अनेक नेते भेटले. त्यांच्या सोबतच्या संवादातून सोलापुरी राजकारणातल्या गमती-जमती अलगद कळत गेल्या. हे सारं पाहून अवाक् झालेल्या मुनींनी शेवटी एकच वाक्य उच्चारलं, ‘दि ग्रेट सोलापूर !’
‘संजयमामां’च्या भेटीला ‘वर्ल्ड बँक’..
जिल्ह्याच्या बॉन्ड्रीवरचं उजनी धरण पाहून मुनी खुश झाले. खूप वर्षांनी त्यांना या महिन्यात इथं पाणी दिसलेलं. भीमानगरजवळ फाट्यावर ‘संजयमामा’ भेटले. ते धरणावरच्या वॉटर प्रोजेक्टचं डिझाईन करण्यात मग्न. थेट काश्मीरहून शिकारा बोटी मागवायच्या की गोव्याहून मिनी क्रूझ, यावर त्यांचं डिस्कशन रंगलेलं. एवढ्यात ‘आंबोले’नी येऊन कानात सांगितलं, ‘वर्ल्ड बँकेचं शिष्टमंडळ आलंय तुम्हाला भेटायला.’ टीम आली. ‘भले-भले देश आमच्याकडं कर्जासाठी वर्षानुवर्षे खेटा मारताहेत. मात्र तुम्ही म्हणे एका झटक्यात हजारो शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं. तुमच्या या जादूचं रहस्य शोधायला आम्ही आलोय.’ शिष्टमंडळातल्या एकानं सांगितलं, तेव्हा हुश्शाऽऽर ‘मामां’नी लगेच त्यांना बॅकवॉटरमधल्या आपल्या बोटीत बसवून फिरवून आणलं. नंतर फार्म हाऊसवर ‘रस्सा-बिस्सा’ खाऊ घालून परत दिलं पाठवून.
त्या टीमला रहस्य सापडलं का, माहीत नाही; मात्र मुनींना समजली पाव्हण्यांना खुश करण्याची ट्रीक. ते गालातल्या गालात हसत टेंभुर्णीत आले. तिथं ‘कोकाटें’च्या हॉटेलसमोर भलामोठा बोर्ड रंगवायचं काम सुरू होतं. पेंटरनं कॉल करून विचारलं, ‘संजयबाबाऽऽ बोर्डावर तुमच्या फोटोखाली फोर लेन रोडचे प्रणेते म्हणू की निर्माते ?’ त्याचवेळी शेजारी उभारलेले ‘हायवे’चे अधिकारी एकमेकांशी पुटपुटले, ‘पैसा सरकारचा. काम आपलं. आता हे नवीन पद कुठून जन्माला आलं ?’
डोकं खाजवत मुनी अकलूजकडं गेले. तिथं ‘शिवरत्न’समोर डॉक्टरांची गर्दी दिसलेली. एक डॉक्टर सांगू लागला, ‘आजकाल उपोषण करून रणजितदादांचं पोट बिघडलंय’, दुसरा डॉक्टर बोलू लागला, ‘सतत आंदोलनं करून धैर्यशीलभैय्यांचेही पाय दुखू लागलेत.’ हे ऐकून मुनींना भरून आलं. आयुष्यभर सत्तेत राहिलेल्या या ‘दादा फॅमिली’ला गेल्या साडेसहा वर्षांपासून विरोधकांच्या भूमिकेतच पाहण्याची वेळ आलेली. सरकार बदलूनही.
मुनी चुकचुकत पंढरपुरी आले. ‘प्रशांतरावां’च्या तालमीत तयार झालेले अनेक राजकीय मल्ल जोरजोरात ‘शड्डू’ ठोकण्यात मग्न होते; मात्र समोर कुठं तगडा दुश्मनच दिसत नव्हता. नाही म्हणायला ‘भगीरथ’ तेवढे एक लाख मतांच्या इतिहासात रमलेले. मात्र त्यात ‘पिताश्रींची पुण्याई’ किती अन् ‘स्वत:च्या कर्तृत्वाचा वाटा’ किती हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. आता हे कटूसत्य सांगणारे चांगले सल्लागारही त्यांच्याजवळ नव्हते.
मुनी मोहोळमध्ये आले. तिथं ‘अनगरकर’ आपल्या दोन्ही मुलांना अस्सल राजकारणाचे धडे देत होते. ‘आपला गट नेहमीच स्ट्राँग ठेवायचा; मात्र कार्यकर्ते आपल्यापेक्षा मोठे कधीच होऊ द्यायचे नाहीत. जास्त उड्या मारणाऱ्यांच्या पायात त्यांचीच दोरी अडकवून ठेवायची’ मुनींना संदर्भ कळला; मात्र ‘घाटण्याचा ऋतुराज’ अचानक शांत कसा झाला, याचा मात्र त्यांना शोध लागला नाही. हे शो-पीस ‘घाटणेकर’ मीडियासमोर ‘नरखेडकरां’ची नवी आवृत्ती होता-होता कसे थांबले, याचंही उत्तर त्यांना मिळालं नाही.
मुनी सोलापूरकडं निघाले. टोल नाक्यावर ‘जय महाराष्ट्र’ स्टीकरवाली गाडी दिसली. आत चक्क ‘वडाळ्या’च्या ‘काकां’ची टोपी चमकली. मुनीही चमकले. तेव्हा ‘काका’ घाईघाईनं सांगू लागले, ‘ही महेशअण्णांची गाडी. त्यांचा प्रवेश या वर्षी होईल की पुढच्या वर्षी, हे कन्फर्म करण्यासाठी दर आठवड्याला आम्ही बारामतीला जात असतो.’
‘ताईं’चा दौरा.. ..‘अण्णां’चा मुहूर्त !
मुनी सोलापुरात आले. ‘प्रणितीताईं’ना भेटावं म्हणून ‘जनवात्सल्य’वर गेले. बंगल्यावर नेहमीप्रमाणं शांतता होती. ‘कार्याध्यक्षा ताई सध्या राज्यभर फिरताहेत. लवकरच येतील सोलापूरच्याही दौऱ्यावर’, जोशींनी सांगताच मुनी ‘काँग्रेस भवन’ला पोहोचले. नेहमीचे कलाकार ‘राजू अन् राहुल’ यांना सोबत घेऊन ‘प्रकाश अण्णा’ डावपेच आखत बसलेले. खरंतर ‘कोरोनामुक्ती’नंतरचं त्यांचं जंगी स्वागत पक्षामध्ये वजन वाढवून गेलेलं.. तरीही एक डोळा पालिकेच्या इलेक्शनवर, दुसरी नजर ‘रसाळें’च्या ‘सुनील मामां’वर ठेवून ते सावधपणे राजकारण करू लागलेले.
तिकडं ‘जुना पुणे नाक्या’वर’ एका ज्योतिष्याला घेऊन ‘पुरुषोत्तम’ बसलेले. ‘पक्षांतरासाठी चांगला मुहूर्त कोणता,’ याचा कानोसा घेऊ लागलेले. हे पाहून मुनी दचकले; मात्र नंतर लक्षात आलं की, ‘दिलीपराव’ अन् ‘महेशअण्णा’ यांच्या पक्षांतराची घाई ‘बरडें’नाच लागलेली. पक्षाच्या भल्याचा विचार करणारा असा ‘जिल्हाप्रमुख’ मुनींनी प्रथमच पाहिलेला.
शेवटी ते ‘कुमठ्या’च्या ‘दिलीपरावां’कडं गेले. केबीनबाहेर ‘लाडके घोडके ’ शुद्ध तुपाची ऑर्डर फोनवरून देत होते. मुनींनी गोंधळून विचारताच ते कौतुकानं कानात कुजबुजले, ‘आमचे मालक पुन्हा आमदार होताहेत. सत्ताधारी घड्याळवाल्यांच्या पक्षातून जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळतेय. मंत्र्यांच्या गाड्या पुन्हा बंगल्याबाहेर दिसू लागल्यात. सात वर्षांपूर्वी जसा आमचा रुबाब होता, तशीच स्ट्राँग पोझीशन पुन्हा तयार होतेय. मग पाचही बोटं तुपात नकोत का ?’ लगाव बत्ती...
( लेखक 'लोकमत सोलापूर' आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)