डॉ. नानासाहेब थोरात
मार्च २०२० पासून संपूर्ण जगभरात कोविड-१९ च्या संसर्गामुळे आत्तापर्यंत सुमारे ४० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे, एकट्या भारतात ४ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या संसर्गाबरोबर सर्वांत गंभीर झुंज कुणाला द्यावी लागली असेल तर ती कॅन्सर रुग्णांना. जागतिक स्तरावर फक्त कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ३० टक्के पेक्षा कमी आहे, पण ज्या लोकांना आधीपासूनच दुर्धर आजार आहेत (कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग) अशा लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ७० टक्केच्या आसपास आहे. वेगवेगळ्या देशांतील कॅन्सर रुग्णांचे कोविडमुळे झालेले मृत्यू, त्याची कारणे, अशा रुग्णांना दिलेले औषधोपचार या बाबतीत मार्च २०२० ते मे २०२१ पर्यंतची माहिती एकत्र करून ऑक्सफर्ड विद्यापीठातील मेडिकल सायन्स डिव्हिजनने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. या अभ्यासात अमेरिकेतील हार्वर्ड मेडिकल स्कूल, इटलीमधील ट्रिस्टि, अमेरिकेतील येल, पर्डू आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमधील शास्त्रज्ञ सहभागी होते. या अहवालातील काही महत्त्वाच्या नोंदी खालीलप्रमाणे.
१. जागतिक स्तरावर १०० कोविड रुग्णांच्या मृत्यूमध्ये २५ रुग्ण हे कॅन्सरचे आहेत. अमेरिकेत हेच प्रमाण २८, युरोपमध्ये २२, इराणमध्ये २९, भारतामध्ये १६, तुर्कीमध्ये २५, ब्राझीलमध्ये १२ आणि चीनमध्ये १७ एवढे आहे.
२. चौथ्या स्टेजमध्ये असणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वच देशांत असून, युरोपियन देशांमध्ये सरासरी ५१ टक्के तर तुर्कीमध्ये सर्वाधिक ६९ टक्के आहे.
३. रक्ताचा आणि फुप्फुसांचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांचे कोविडमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. रक्ताच्या आणि फुप्फुसांच्या कॅन्सरच्या मृत्यूची जागतिक सरासरी अनुक्रमे २५ आणि २६ टक्के आहे. याचाच अर्थ कोरोना फुप्फुसांबरोबरच रक्तातील रोगप्रतिकारक शक्तीवर सर्वाधिक आघात करतो.
४. कोविडच्या सुरक्षाविषयक नियमांमुळे लाखो कॅन्सर रुग्णांना वेळेत उपचार मिळाले नाहीत, तसेच त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक असल्याने हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांना उपचारासाठी भरती करून घेतले नाही. २०२० मध्ये एकट्या इंग्लंडमध्ये कॅन्सर रुग्णांची हॉस्पिटलमधील भरती ८४ टक्क्याने कमी झाली, अमेरिकेत ४६ टक्के तर भारतात हेच प्रमाण ५० टक्के एवढे होते. म्हणजेच कोविडमुळे भारतातील १०० कॅन्सर रुग्णांपैकी ५० रुग्णांना हॉस्पिटलमध्ये योग्य वेळेत उपचारच मिळाले नाहीत. चीन आणि आफ्रिकन देशांमध्ये हे प्रमाण फक्त १० टक्के एवढेच होते.
५. अनेक देशांतील वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केल्यावर दिसून आले आहे की, कोविड रुग्णांना बरे करण्यासाठी केमोथेरपीसाठीच्या औषधांचा वापर केला गेला. कॅन्सर आणि कोविड असणाऱ्या रुग्णांसाठी अँटिबायोटिक्स, अँटिव्हायरल औषधांचाही उपयोग झाला. याचबरोबर रेडिएशन आणि नवीनच विकसित केलेली CAR-T थेरपी पण वापरली गेली. त्यामधील अनेक औषधे फारशी उपयोगी ठरली नाहीत. त्यामुळे अहवालात सुचवले आहे की, प्रयोगशाळेतच Artificial Intellegence आणि Machine Learning तंत्रज्ञान वापरून कोणते औषध या दोन्ही आजारांसाठी एकत्रितपणे वापरता येईल याचा शोध घ्यावा.
६. कॅन्सर रुग्णांना कोविड संसर्गाच्या भीतीपोटी घरातच न ठेवता हॉस्पिटलमध्ये योग्य ती काळजी घेऊन उपचार केले पाहिजेत. त्यांच्या शस्त्रक्रियाही वेळेत केल्या पाहिजेत. युरोपियन देशात कोविडमुळे मार्च २०२० ते मे २०२१ पर्यंत जवळपास १० लाख कॅन्सर रुग्णांचे वेळेत निदान आणि उपचार करता आले नाहीत. इंग्लंडमध्ये कॅन्सर रुग्णांना सर्जरीसाठी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागत आहे, दुर्दैवाने कमी-अधिक प्रमाणात भारतातसुद्धा अशीच परिस्थिती असून, भारतामध्ये १०० कॅन्सर रुग्णांना कोविड झाला तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३७ एवढे आहे.