- वसंत भोसले‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकीकत’ हे सदाशिव महादजी देशपांडे (हेडमास्तर) यांनी लिहिलेले पुस्तक करवीर संस्थानचा इतिहास समजून घेण्यातील एक महत्त्वाचे साधन आहे. या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन तब्बल १३५ वर्षांनी झाले. मराठी इतिहास लेखनामध्ये हासुद्धा एक प्रकारचा विक्रमच असेल.श्रीमन्महाराज शाहू छत्रपति सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाचा समारंभ जेव्हां पाहिला, तेव्हा मला खरोखर आनंदाचें भरते आले. आणि कोल्हापूरच्या नूतन श्री. शाहू महाराजांचा हा प्रसाद, असे उद्गार माझ्या मनांत वारंवार येऊं लागले, व त्याचवेळी वाटलें, की ह्या महोत्साहाची हकीकत लिहून ठेवली, तर कोल्हापूर इलाख्यांतील भाविक लोक व राजनिष्ठ लोक प्रीतीनें वाचतील. आतां ह्या हकीकती सरकारच्या दफतरीं लिहून ठेविलेल्या आहेत, तथापि त्या इतरांस पाहिजे तेव्हां वाचण्यास मिळत नाहींत, ह्मणून त्यांचा उपयोग सर्व लोकांस होत नाहीं...!
‘श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांच्या दत्तकविधानाची हकीकत’ या पुस्तकाचे लेखक सदाशिव महादजी देशपांडे (हेडमास्तर) यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत वरीलप्रमाणे आपल्या भावना लिहून ठेवल्या आहेत. राणी आनंदीबार्इंनी कोल्हापूरच्या गादीसाठी कागल जहागिरीचे अधिपती जयसिंगराव (आबासाहेब) घाटगे यांच्या पोटी २६ जून १८७४ रोजी जन्मलेल्या यशवंतराव यांना दत्तक घेतले. या समारंभास प्रत्यक्ष हजर असलेले सदाशिव महादजी देशपांडे कोल्हापुरातील सेंट्रल मराठी स्कूलचे हेडमास्तर होते. १७ मार्च १८८४ रोजी राजर्षी शाहू महाराज यांचा दत्तकविधी समारंभ झाला. त्याची हकीकत सांगण्याचा मोह त्यांना झाला. कारण तो समारंभ करवीर संस्थानाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या तत्कालीन समाजजीवन समजून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. दत्तकविधी समारंभ १७ मार्च १८८४ रोजी झाला आणि सदाशिव महादजी देशपांडे यांनी २५ फेब्रुवारी १८८५ रोजी पुस्तक रूपाने त्याची हकीकत लिहून प्रकाशित केली.
केवळ अकरा महिन्यांत त्यांनी हे महत्त्वपूर्ण कार्य तडीस नेले, हे विशेष आहे. या पुस्तकाची निर्मिती १३५ वर्षांपूर्वी झाली आहे. त्यानंतर त्याची आवृत्तीही निघाली नाही. त्यामुळे ते सापडणे अवघड होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी नियमित मेहनत घेणारे संशोधक प्राचार्य डॉ. विलास पोवार यांना १९७९ मध्ये म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी एका ठिकाणी जीर्ण झालेले सदाशिव देशपांडे यांच्या पुस्तकाची एक प्रत सापडली. ते वाचल्यापासून ज्याप्रमाणे दत्तकविधान सोहळा पाहून सदाशिव देशपांडे प्रभावित झाले होते, तसेच ते वाचून डॉ. विलास पोवार प्रभावित झाले होते. त्यातील तपशील समजून घेल्यानंतर हे तर करवीर संस्थानचा इतिहास समजून घेण्यातील एक महत्त्वाचे साधन आहे. ते संपादित करून पुनर्मुद्रित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. त्यास यश आले आणि शुक्रवारी ( २९ मार्च २०१९ ) हा समारंभ शाहू स्मारकात घडून आला. आणखी एका ऐतिहासिक घटनेची नोंद झाली, असे म्हणावयास हरकत नाही.
प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी संपादित द्वितीय आवृत्ती प्रकाशित करताना प्रस्तावना लिहिली आहे. विशेष म्हणजे १३६ वर्षांपूर्वी हा दत्तकविधान सोहळा पार पडला. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याची पुस्तक रूपाने हकीकत सदाशिव देशपांडे यांनी मांडली. त्यानंतर तब्बल १३५ वर्षांनी त्याची द्वितीय आवृत्ती निघावी, हासुद्धा एक प्रकारचा मराठी इतिहास लेखनामध्ये विक्रमच असेल, असे वाटते. एकोणिसाव्या शतकातील हा सोहळा आहे. विसावे शतक निघून गेले आणि आधुनिक जगाचा चेहरा पाहणाºया एकविसाव्या शतकात त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे. या धडपडीमागे सदाशिव देशपांडे हेडमास्तर यांचे कार्य महानतम आहे. तसेच नव्या युगासमोर या पुस्तकाची प्रत आपल्या हाती देण्यासाठी धडपडणारे संशोधक प्राचार्य डॉ. विलास पोवारही अभिनंदनास पात्र आहेत.
हे पुस्तक पाच भागांत विभागले गेले आहे. पहिल्या भागात कोल्हापूरच्या राजघराण्याची हकीकत आणि दत्तक विधानापूर्वीची कोल्हापूरची राजकीय परिस्थिती याविषयी सखोल माहिती दिली आहे. कागलच्या घाटगे घराण्यातील पुत्रास दत्तक घेण्याबद्दलचे लोकांचे तर्कवितर्क, दत्तक घेण्यास सरकारची मंजुरी, सरकारने दत्तक घेण्यास मंजुरी दिल्यानंतर भरवलेला दरबार, आनंद प्रदर्शित करणारी पत्रे, आदी गोष्टींची माहिती दिली आहे. दुसºया भागात दत्तक समारंभाचा मुहूर्त निश्चित करणे, दत्तकविधी समारंभाची तयारी, दत्तकविधी समारंभात होणारे सर्व कार्यक्रम यांची माहिती दिली आहे. तिसºया भागामध्ये दत्तक समारंभ व त्यासंबंधी भरलेले दरबार, दरबारात बसलेल्या दरबारी लोकांची मानाप्रमाणे नावे व त्याचा नकाशा, कोल्हापूर म्युनिसिपल कमिटीने दिलेले मानपत्र तसेच पुण्याच्या सार्वजनिक सभेने दिलेले मानपत्र, पोलिटिकल एजंटसाहेब बहाद्दूर यांच्या रेसिडेंसीमधील दरबार व त्यांचे झालेले भाषण, आतषबाजी, मिरवणूक, चिरागदानी, आदी गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली आहे.
चौथ्या भागात शाळेतील मुलांकरिता करमणुकीचे कार्यक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हटलेल्या कविता, राजाराम कॉलेजमध्ये झालेले नाटक, ब्राह्मण भोजन, रमण्याची दक्षिणा, साहेब लोकांकरिता खाना, मराठी मंडळींचा भोजन समारंभ, कामगार लोकांस भोजन, घोड्यांची सर्कस, शिष्ठसंभावना यांचा समावेश आहे. पाचव्या भागात आभारदर्शक आलेली पत्रे आणि दत्तकविधी समारंभाविषयी झालेल्या खर्चाची सखोल यादी दिलेली आहे.समारंभाच्या पूर्व तयारीसाठी करावयाची तयारी, समारंभानिमित्त सर्व कार्यालयांना सुट्टी देऊन सरकारी अंमलदारांकडे सोपविलेली कामे याची माहिती दिली आहे. समारंभाच्या पूर्व तयारीसाठी ३ मार्च १८८४ रोजी म्युनिसिपल कमिटी कार्यालयात सर्वसाधारण सभा झाली. सभेत ठरल्याप्रमाणे गंगावेस ते पंचगंगा नदी रस्त्यावर आणि टाऊन हॉलच्या पलीकडे सध्याच्या तहसील कार्यालयासमोर एक अशा दोन दगडी कमानी उभारण्यात आल्या. शहरात स्वच्छता, गुढ्या उभारणे, तोरण लावणे, आतषबाजी, चिराखबाजी, शाहू महाराज यांना द्यायचे मानपत्र, आदी कार्यक्रम दिला आहे.
इतका तपशील दिला आहे की, हे पुस्तक वाचताना १३६ वर्षांपूर्वी घडलेला हा दत्तकविधी समारंभ आपण पाहतो आहोत, असा भास होतो. कोल्हापूर शहराचे समाजजीवन, राजकीय परिस्थिती, संस्थानची सीमारेषा, आर्थिक परिस्थिती, लोकसहभाग, आदींचा त्यात समावेश आहे. समारंभास देशभरातून आलेले पाहुणे, संस्थानिक, सरकार दरबारचे अधिकारी, त्यांच्या बसण्या-उठण्याची व्यवस्था करणारा राजशिष्टाचार, आदींची इत्थंभूत माहिती दिली आहे. यातून एक बाब प्रकर्षाने पुढे येते की, करवीर संस्थानाचा विस्तार लहान असला तरी त्याला एक भारतीय समाजजीवनात महत्त्व होते. सरकार दरबारी मानमरातब होता. लोकांचे प्रेम आणि सहभाग होता. यातून राजर्षी शाहू महाराज घडण्याची प्रक्रिया सुरू झाली असे वाटते. या संस्थानचा असलेला दबदबा पाहता केवळ दहा वर्षांचे शाहू महाराज पुढे घडत गेले आणि त्यांना पुढे मिळालेल्या केवळ ३८ वर्षांच्या आयुष्यात ऐतिहासिक कामगिरी करून एक आदर्श मॉडेल बनविले गेले. आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य याचा आढावा घेतो तेव्हा महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा महामार्ग का तयार झाला याची प्रचिती येते. यासाठी शाहू महाराजांची जडणघडण कशी झाली, याचा अभ्यास करण्यासाठी दत्तकविधानापासून सुरुवात करावी लागते. तेव्हाची करवीर संस्थानाची स्थिती, महत्त्व आणि केलेले कार्य पाहता येते.
दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा शोध घेता घेता ‘शिवाजी कोण होता’ असा सवाल करून रयतेच्या राजाचे कार्य वेगळ्या पद्धतीने आधुनिक जगाला उलगडून दाखविले होते. तसे राजर्षी शाहू महाराज घडताना सांगावे लागेल. याचे कारण की, देशात पाचशेहून अधिक संस्थानिक होते. मात्र, करवीर संस्थानचे राजे शाहू महाराज यांच्या कार्याचे महत्त्व खूप वेगळे आहे. ते एक विकासाचे मॉडेलच आहे. आजच्या काळातही ते लागू पडते. तत्कालीन समाजासमोरच्या समस्या कोणत्या आहेत आणि समाजाचा सर्वांगीण, सर्वसमावेश विकास करण्यासाठी किती गोष्टी कराव्या लागतील, याची जंत्रीच शाहू महाराज यांनी मांडली, अमलात आणली. एकाचवेळी अनेक पातळ्यांवर त्यांची ही लढाई चालू होती.
सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक शोषणाविरुद्ध ते संघर्ष करीत होते. त्याचवेळी येणाºया विसाव्या शतकात जगभर होऊ पाहत असलेली औद्योगिक क्रांतीची बीजेही ते पेरू इच्छित होते. आधुनिक शेतीसाठी पाण्याची सोय, नव्या वाणांचा शोध, संकरित पशुपैदास, नवी पीकरचना यांचा कार्यक्रम राबवित होते. शिक्षणाशिवाय भावी पिढीस तरुणोपाय नाही, तो अधिकार आणि संधी समाजातील सर्व घटकांना मिळाली पाहिजे, हा समतेचा विचारही त्यांनी मांडला आणि तशी सोयदेखील केली. व्यापार- उद्योगात उतरण्याशिवाय आर्थिक उन्नती होणार नाही, यासाठी व्यापारपेठांची उभारणी केली. कला, क्रीडा, शिकारी, संगीत, नाटक, आदी क्षेत्रांचे मानवाच्या आनंदी जीवनात महत्त्व आहे, हे देखील त्यांनी ओळखून त्यांची सोय केली. या सर्व गोष्टी करण्यासाठी पायाभूत सुविधा लागतात. त्या सुविधा निर्मितीचे ते जनकच होते.
यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समजून घेतले पाहिजेत. आजच्या समाजातही विषमता आहे, शोषण आहे, विकासाचे मुद्दे आहेत, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आव्हान आहे, आनंदी जीवन जगण्याच्या कला क्षेत्राच्या विकासाची गरज आहे. या सर्व गोष्टींसाठी या आधुनिक जगाची निर्मिती करण्याचे आव्हान आहे. या सर्व गोष्टी करण्यासाठी शाहू महाराज यांचे सर्वसमावेशक विकासाचे मॉडेलच आदर्श ठरू शकते. त्यासाठी राजर्षी शाहू महाराज घडले कसे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जडण-घडणीत याची लक्षणे दिसतात. आधुनिक शिक्षण त्यांनी घेतले होते. जगप्रवास केला होता. तो पर्यटन नव्हता, नवे नवे शिकण्याचा ध्यास होता. एका अर्थाने त्यांचे घडणे हे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा भाग होता. युरोपमधील विचारवंत, तेथील प्रगतीच्या दिशा आणि विचार प्रक्रिया यांनी ते प्रभावित होते. त्याची अंमलबजावणी आपल्या संस्थानात केली. त्याची सुरुवात वयाच्या दहाव्या वर्षी दत्तक विधानापासून झाली असे म्हणायला हरकत नाही. याचसाठी शिवाजी राजा कोण होता, ते समजून घेणे आवश्यक ठरते.
तसे राजर्षी शाहू महाराज घडताना, समजून घ्यायला हवे; कारण ते जे घडले त्यात त्यांच्या विचार आणि कार्याचे बीज आहे. त्यासाठी सदाशिव महादजी देशपांडे यांच्या पुस्तकाचे महत्त्व आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाच्या वाटचालीचे ते पहिले पाऊल आहे. ते त्यांनी १३५ वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले आहे. हा करवीर संस्थानच्या इतिहासाचा मोलाचा ठेवा आहे, तो जपण्याचा प्रयत्न प्राचार्य डॉ. विलास पोवार यांनी केला आहे, असेच म्हणावे लागेल.