अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -नाटकात काम करणाऱ्या स्टेजवरील कलावंतांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या कलावंतांची कायम उपेक्षा होत आली आहे. त्यांच्यासाठी ना कोणती संघटना, ना साधे विम्याचे कवच. कोविडच्या काळात प्रशांत दामले आणि अजित भुरे यांनी काही कलावंतांना शक्य होईल, ती मदत केली. त्यातून साडेतीनशे बॅकस्टेज कलावंत असल्याचे कळाले. मात्र ही संख्यादेखील अधिकृतपणे नाट्य परिषदेकडे नोंदविलेली नाही. प्रख्यात अभिनेते अशोक सराफ यांनी पडद्यामागे काम करणारे बॅकस्टेज व काही वयोवृद्ध कलावंतांसाठी मदतीचा हात पुढे केला. ‘मी बहुरूपी’ नावाचे पुस्तक अशोक सराफ यांनी लिहिले.या पुस्तकातून मिळणारा पैसा आपण वापरायचा नाही, अशी कल्पना त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी मांडली. त्यातून बॅकस्टेज व इतर कलावंतांना मदत करण्याचा विषय पुढे आला. एका चांगल्या हेतूला महाराष्ट्रातील लोकांनी मदत तर केलीच, पण गेली ३५ वर्षे दुबईत वास्तव्याला असणाऱ्या डॉ. संजय पैठणकर यांनीही दिलदारपणे मदत केली. त्यातून मुंबईत २० बॅकस्टेज व इतर कलावंतांना प्रत्येकी ७५ हजार रुपये देता आले. या उपक्रमात त्यांच्यासोबत वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मदत करणारी ग्रंथाली ही प्रकाशन संस्था धावून आली. अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी त्यांचे काम केले. कोविड काळात बॅकस्टेज कलावंतांचे झालेले हाल ऐकवणार नाहीत इतके भयंकर आहेत. त्या काळात भाजप नेते आशिष शेलार, अशोक हांडे, प्रशांत दामले यांनी आपापल्या परीने मदत केली. मात्र ही अशी मदत किती काळ पुरणार..?जे लोक तीन तास आपली निखळ करमणूक करतात, आनंद देतात. आपल्या भावभावनांना रंगमंचावर मांडतात. संगीताच्या कार्यक्रमासाठी, नाटकासाठी, पडद्याआड झटतात. अशांची संख्या मोठी आहे. कपडे पटापासून ते व्यवस्थापकापर्यंत ही भली मोठी यादी आहे. हा सगळा असंघटित वर्ग आहे. यांची ना कोणती युनियन? ना कोणती संस्था? जोपर्यंत हातपाय चालतात, डोळे शाबूत आहेत, तोपर्यंत यांना काम आहे. मात्र ज्या क्षणी काम बंद होईल त्या क्षणी यांना घर चालवण्यासाठी दुसरे काम करावेच लागते. कोविड काळात अनेकांनी घर चालवण्यासाठी भाजी विकणे, लोकांच्या गाड्या धुणे अशी कामे केली.परवा ज्यांचे सत्कार झाले त्यातल्या काहींची अवस्था पाहून मन गलबलून गेले. काहींची दृष्टी कमजोर झाली होती. त्यांना दिसत नव्हते. काहींना चालताना कोणाच्या तरी आधाराची गरज होती. ज्या कलावंतांनी संपन्न इतिहास असलेली मराठी रंगभूमी आजपर्यंत टिकवून ठेवली, त्यात बॅकस्टेज कलावंतांचाही सिंहाचा वाटा आहे. अशा लोकांना आयुष्याच्या उतारवयात कोणाकडे तरी मदतीसाठी हात पसरावा लागतो, ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. ज्या कलावंतांच्या जिवावर मराठी नाट्य परिषद स्वतःचे राजकारण करते, त्यांच्यासाठी तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हिंदी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मालिकेत काम करणाऱ्या बॅकस्टेजच्या वेगवेगळ्या २२ प्रकारच्या संघटना आहेत, तिथे त्यांची रीतसर नोंदणी होते. त्यांना ठरवलेला निश्चित पगार मिळतो की नाही, याची खात्री करून घेतली जाते. त्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी इंडियन फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन प्रोड्युसर कौन्सिल म्हणजे ‘आयएफटीपीसी’ ही सर्वोच्च संस्था काम करते. बॅकस्टेजच्या सगळ्या कलावंतांचा तिथे या संस्थेच्या वतीने विमा काढला जातो. या संस्थेवर सदस्य असणारे ‘दशमी क्रिएशन्स’चे नितीन वैद्य यांनी ही यंत्रणा कशी व्यवस्थित काम करते हे सांगितले. कोविड काळात एका बॅकस्टेज कलावंताचे निधन झाले. त्याच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत कशी मिळवून दिली, हे त्यांनी सांगितले. जर या गोष्टी हिंदीत होत असतील तर मराठीत का नाही?काही वर्षांपूर्वी सामाजिक कृतज्ञता निधीसाठी निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, श्रीराम लागू अशा अनेक ज्येष्ठ कलावंतांनी पुढाकार घेऊन एक निधी उभा करण्याचा प्रयत्न केला होता. नाट्य परिषदेने पुढाकार घेतला तर अशा उपक्रमातून काही कोटींचा निधी मिळवणे अवघड नाही. यासाठी मुळात नाटक या व्यवसायाला आर्थिक शिस्त लावावी लागेल. दरवर्षी कितीही नाटक उत्तम चालली तरीदेखील नाटकाचा उद्योग सात-आठ कोटींच्या वर जात नाही. अशा व्यवसायाला मायक्रो इंडस्ट्रीअंतर्गत नोंदणी करायला लावणे, येणाऱ्या-जाणाऱ्या पैशांचा हिशेब ठेवायला लावणे, त्यावर इन्कमटॅक्स भरणे, या गोष्टी केल्या तर आर्थिक पत सुधारेल. त्यामुळे कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.
मराठी नाट्य परिषदेची नुकतीच वाजतगाजत निवडणूक झाली. स्वतःला रंगभूमीला वाहून घेतलेल्या प्रशांत दामले यांचे पॅनल निवडून आले. अजित भुरे यांच्यासारखे संवेदनशील निर्माते या संस्थेवर आहेत. त्यांच्याकडून कलावंतांनी अपेक्षा केली तर ते चुकीचे ठरणार नाही.
- ज्यांनी रंगभूमीची सेवा केली आणि आता ज्यांचे हातपाय चालत नाहीत. आर्थिक मदतीचे कुठलेही साधन नाही, अशा लोकांची त्यांनी महाराष्ट्रभर फिरून यादी केली पाहिजे.- त्या लोकांना कशा पद्धतीने मदत देता येईल, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. या लोकांचे वैद्यकीय विमा काढण्याचे काम नाट्य परिषदेने परिषदेच्या खर्चाने केले पाहिजे. - मराठीत नावलौकिक असणारे अनेक कलावंत आहेत, त्यांनी ठरवले तर या बॅकस्टेज कलावंतांना मदत मिळवून देणे कठीण नाही.