डॉ. रितू परचुरे, सीनिअर रिसर्च फेलो, प्रयास आरोग्य गट, पुणे
यावर्षीच्या उन्हाळ्यात आत्तापर्यंत अनेक ठिकाणी तापमानाचे नवनवीन उच्चांक गाठले गेले. आजच अशी ‘असह्य’ परिस्थिती तर पुढचं चित्र किती विदारक असेल, जगणंच कसं अशक्य होईल, अशा चर्चाही या तापलेल्या वातावरणात होत आहेत आणि होत राहतील. शतकाच्या शेवटास परिस्थिती काय असेल त्याचा अदमास घेणे आणि या संहारक टोकापर्यंत जग पोहोचू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणं या घडीला अत्यावश्यकच आहे. पण त्याचबरोबर या शतकाच्या मध्यापर्यंतची परिस्थितीही फारशी बरी नसणार आहे. त्यातून नुसत्या आरोग्याच्या गंभीर समस्याच नाहीत, तर विशेषतः आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी जगण्याचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यासाठी काय करायला हवं, याचा विचार आणि त्या दृष्टीने पावलं उचलणंही तितकंच आवश्यक आहे.
तीव्र उष्णतेमुळे आरोग्यावर जे अनेक विपरित परिणाम होतात, ते आता सर्वसाधारणपणे सर्वांना माहीत आहेत. उष्माघातामुळे जिवावर बेतल्याच्या घटना आपल्या स्मरणात आहेत. उन्हाळ्याच्या लाटेनंतर हृदयविकार, मूत्रपिंड विकारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसते. वेगाने होणारी तापमानवाढ बघता नजीकच्या काळात हा महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न होणार आहे. यासाठी ‘तीव्र उष्णतेपासून बचाव’ आणि ‘गरज पडल्यास त्वरित वैद्यकीय मदत’ ही दोन सूत्रं डोळ्यासमोर ठेवून उपाययोजना आखाव्या लागतील. यासाठी सध्या भारतात अनेक ठिकाणी राज्य / जिल्हा / शहर पातळीवर ‘हीट ॲक्शन प्लॅन्स’ (उष्णताविरोधी कृती आराखडे) बनवले आहेत. पूर, वादळ या घटनांसाठी ज्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कार्यान्वित होते, काहीशा त्याच तत्त्वावर हे प्लॅन्स आखले जातात. यात दिवसाच्या कमाल तापमानानुसार उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना दिली जाते. यात स्थानिक प्रशासनाने घ्यायची दक्षता (पाण्याची सोय, कूलिंग सेंटर-हीट शेल्टर कार्यान्वित करणे), आरोग्य केंद्रांची सज्जता, जाणीवजागृती अशा विविध गोष्टी केल्या जातात.
काही ठिकाणी याच आराखड्यामध्ये घरांच्या छतांना उष्णतारोधक रंग लावणे, उष्णतारोधक बांधकाम साहित्याचा वापर वाढवणे, झाडे लावणे इत्यादी दीर्घकालीन उपायदेखील सुचवलेले आहेत. तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी हे कृती आराखडे निश्चितच काही ठोस मार्गदर्शक रूपरेखा मांडतात. या प्रश्नाबद्दलची जाणीव यामधून अधिक ठळकपणे पुढे येते. ही स्वागतार्ह सुरुवात आहे; पण तरीही अजून बरंच अंतर चालायलाही हवं आहे.एखाद्या ठिकाणाच्या उष्णतेची संहारकता फक्त कमाल तापमानावर अवलंबून नसते. तिथला दमटपणा, सलग तीव्र-उष्णतेचे दिवस, रात्रीचे तापमान या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. आरोग्याला असलेला धोका अचूकपणे समजण्यासाठी या सगळ्यांचा एकत्रित विचार पूर्वसूचनेमध्ये व्हायला हवा. भविष्यात उन्हाळ्याच्या लाटा अधिक तीव्र असतील, वारंवार येतील, अधिक काळ रेंगाळतील असं भाकीत आहे. ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांनी तापमान असह्य आहे म्हणून काम थांबवायचं म्हटलं तर खायचे वांधे होतात. तापमानाची पर्वा न करता तसंच काम ढकलत राहिलं तर आजारपणाचा / मृत्यूचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत त्यांना उष्णतेमुळे होणाऱ्या आजारपणाची, त्यापायी होणाऱ्या खर्चाची आणि कमी उत्पादन क्षमतेची अशी तिहेरी जोखीम पत्करण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा गटांसाठी सावलीच्या, गारव्याच्या, पाण्याच्या काय सोयी शहरात / गावात लागतील, कुठे लागतील याचं नियोजन लागेल.
उष्णतेचे संकट फक्त आरोग्याचा प्रश्न नाही. त्याचा परिणाम कमी करण्यासाठी संसाधनांचा सर्वांगीण विचार दूरगामी योजनांसाठी आवश्यक आहे. उदा. जसजशी तापमानवाढ होईल तसतशी विजेची आणि पाण्याची गरज वाढणार आहे. या दोन्हींचा पुरवठा सर्वांना नियमित व्हावा, यासाठी वीजनिर्मिती व वितरण, पाणीसंवर्धन व वाटप यांचाही विचार करावा लागेल. शहरी भागासाठी तीव्र उष्णता ही मोठीच समस्या आहे. वाढत्या तापमानाबरोबर शहरातील दाटीवाटीने बांधलेल्या मुबलक उंच इमारती आणि हवाप्रदूषण यामुळे शहरी भाग जास्त तापतात. यांना ‘हीट आयलंड्स’ किंवा ‘उष्णतेची बेटे’ म्हणतात. अशी बेटे शहरात होऊ नयेत या दृष्टीने नगररचना असणं, ती करताना समाजातील सर्वस्तरांचा विचार होणं जरुरीचे आहे; कारण याच शहरात कामधंदा मिळण्याच्या आशेने आलेले अनेक लोक निकृष्ट नागरी सुविधांसह शहरी गरीब वस्त्यांमध्ये राहत आहेत. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेअभावी वाहतूक आणि प्रदूषण यांचे प्रश्न आधीच तीव्र झाले आहेत. या सर्व गोष्टी तीव्र उष्णतेची समस्या अधिक गंभीर करतात.
या सगळ्यांचा एकत्रित, समावेशक, बहुक्षेत्रीय, समन्वयित, लोकसहभागाधारित विचार करणारी धोरणेच आपल्याला या अस्मानीतून तारून नेऊ शकतील. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी किंवा कमी ठेवण्यासाठीचे जे तुटपुंजे प्रयत्न सुरू आहेत, त्याकडे पाहता हे आव्हान किती मोठे आहे, ते सहज लक्षात येईल. ‘कल करेसो आज कर...’ अशी ही घटिका आहे. ritu@prayaspun.org