केतन गौरनिया, वित्तीय सल्लागार
गेल्या काही दिवसांत भारतीय शेअर बाजाराने सर्वोच्च शिखर गाठलेले दिसले.. निफ्टी इंडेक्स आणि पाठोपाठ बँक निफ्टी यांनी अभूतपूर्व उच्चांक गाठला. मिड कॅप श्रेणीतील कंपन्यांच्या समभागांची खरेदी करण्यासाठी तुडुंब गर्दी आहे आणि आताच्या परिस्थितीत अनेकजण शेअर बाजारात टिप्स देण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, सद्य:स्थितीत काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांच्या किमती देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांच्या किमतीशी स्पर्धा करताना दिसत आहेत.
ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पाच ते दहा वर्षांचे क्षितिज निश्चित केले होते त्यांनी स्वतःला सिद्ध केले असे म्हणता येईल. सर्व घडामोडी पचवत बाजाराने हा प्रवास केला आहे. एप्रिल २०२३ मध्ये शेअर बाजारात जेव्हा निराशावाद पसरला होता त्यावेळी मी याच ठिकाणी चांगल्या दिवसांचे भाकीत केले होते. त्यावेळी निफ्टी १७,५०० अंशांवर, सेन्सेक्स ६० हजार अंशांवर तर मिडकॅप निफ्टी ३० हजार ५०० अंशांवर होता. आज निफ्टी २० हजार २०० वर, सेन्सेक्स ६८ हजार अंशांवर तर मिडकॅप निफ्टी ४१ हजार अंशांवर आहे. या वळणावर आपला नफा नोंदवत काही बचावात्मक पवित्रा घेत शेअर बाजार गुंतवणूक करायला हवी. यामुळे दीर्घकालीन जोखमीचे व्यवस्थापन करणे सुलभ होईल.एक इशारा देणे गरजेचे वाटते. जेव्हा बहुतांश लोक हे बाजाराबद्दल अधिक उत्साही असतात, किंवा स्वार्थीपणाने व्यवहार करताना दिसतात, त्यावेळी गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असा इशारा देण्यामागे काही कारणे आहेत. अनेक कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आणि दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी २०२३ मध्ये ११ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या समभागांची निर्गुंतवणूक (विक्री) केली आहे. विक्रीची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अशा सरावलेल्या गुंतवणूकदारांना बाजारात पुन्हा प्रवेश करण्याची घाई नसते. तर दुसरीकडे, म्युच्युअल फंड, सामान्य गुंतवणूकदार यांचे लक्ष हे निव्वळ मालमत्ता मूल्यावर (एनएव्ही) व अल्प मुदतीच्या कामगिरीवर असते.
मार्केटमध्ये मंदीसारखी स्थिती असते, तेव्हा भारतीय शेअर बाजारात खरेदी-विक्रीचे व्यवहार महागडे होतात. मिड कॅप किंवा स्मॉल कॅप समभागांच्या वाढलेल्या मूल्यांकनामुळे हतबल झालेले दिसतात. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण गुंतवणूकदारांना तिथे अडकून पडायला होते.सध्या डॉलर इंडेक्स १०५ च्या दरम्यान घिरट्या घालत आहे. तर तेलाच्या किमती प्रती बॅरल ९० अमेरिकी डॉलर इतक्या आहेत. अमेरिकेचे १० वर्षांच्या कालावधीसाठीचे व्याजदर हे ४.७५ तर कधी ५ टक्के आहेत. अशा स्थितीत, भारतीय बाजारासमोर अनेक आव्हाने आहेत. भारतात मान्सून सामान्य स्तरापेक्षा कमी झाला आहे. परिणामी महागाई वाढताना दिसेल.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, २०१४ ते २०२३ या कालावधीमध्ये भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी घसरला आहे. २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण २९ टक्के इतकी झाली होती. २००४ ते २०१४ च्या तुलनेत ही घसरण दुपटीने होताना दिसत आहे. जागतिक पातळीवरील मंदी पाहता भारतीय निर्यातीला देखील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता अधिक चलनवाढीचा धोका आहेच. यामुळे लोकानुनयी आर्थिक निर्णय होऊ शकतील. अर्थकारणाला फटका बसेल अशा राजकीय घोषणा होऊ शकतील. कर आणि जीडीपी यामधील गुणोत्तराने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधेसाठी खर्च करण्यासाठी सरकारला मर्यादा येतील, तसेच आर्थिक स्थिती पाहता अनेक योजनांना याचा फटका बसू शकेल.
थोडक्यात, भारतीय बाजार मोठ्या वादळाच्या उंबरठ्यावर आहे. गुंतवणूकदारांनी बचावात्मक पवित्रा घेणाऱ्या लार्ज कॅप कंपन्यांच्या समभागात किंवा डेट गुंतवणुकीच्या साधनांत किंवा रोखीने पैसे साठवून ठेवावा. बाजारात सध्या झपाट्याने होणाऱ्या तेजी-मंदीच्या चढउताराचा विचार करता अनेकांना अल्पमुदतीमध्ये आपले नुकसान झाले, असे वाटू शकते. पण आगामी एक ते दोन वर्षांत चांगल्या किमतीला समभागांची उपलब्धी होऊ शकते. ता.क. - हा लेख लिहिल्यापासून आज तो प्रकाशित होईपर्यंतच्या केवळ काही दिवसांमध्येच बीएसई इंडेक्स व निफ्टीमध्ये २.६ टक्क्यांपर्यंत करेक्शन झालेले दिसेल!