इस्रायलच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या झालेल्या स्वागत सोहळ्यात त्यांची पत्नी मेलानिया हिने त्यांनी प्रेमाने पुढे केलेला हात झिडकारणे ही बाब एरव्ही बातमीचा विषय झाली नसती. पण तो हात अमेरिकेच्या अध्यक्षाचा असल्याने व तो देशाच्या पहिल्या महिलेने झिडकारला असल्याने त्याचे वृत्त झाले आणि ते जगाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर अचंब्याने पाहिले. अमेरिकन हवाईदलातील पहिल्या क्रमांकाच्या (एअर फोर्स वन) अध्यक्षीय विमानातून उतरताना स्वागताला समोर आलेल्या इस्रायली नेत्यांना अभिवादन करण्यासाठी हात उंचावताना ट्रम्प यांनी मेलानियाचा हात धरण्याचा प्रयत्न केला. तो नाकारून तिने आपला हात आपल्या केसातून फिरविणे पसंत केले. पुढे स्वागतासाठी अंथरलेल्या लाल गालिचावरून चालत जातानाही ट्रम्प यांनी तसा प्रयत्न दोनदा केला. त्यांच्या बाजूने चालणारे इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानयाहू व त्यांची पत्नी एकमेकांचे हात हातात घेऊन चालत होते. स्वाभाविकच ट्रम्प यांनाही तसे करावेसे वाटले असणार. मात्र याही वेळी मेलानियाने त्यांना दाद न देता त्यांचा हात फटकारून दूर केला. हा प्रकार दूरदर्शनवर पाहणाऱ्या अमेरिकी जनतेएवढाच इस्रायली लोकांनाही जबर धक्का देऊन गेला. मेलानिया हिचे ट्रम्प यांच्याशी झालेले हे पहिले तर ट्रम्प यांचे तिच्याशी झालेले तिसरे लग्न आहे. ट्रम्प ७०, तर मेलानियाचे वय ४७ वर्षांचे आहे. मात्र या अंतराहूनही त्यांच्यातील दुरावा मोठा असावा याचे हे दर्शन आहे. (तसे म्हणायला फ्रान्सचे नवे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याहून त्यांची पत्नी २४ वर्षांनी मोठी आहे मात्र त्यांचे सहजीवन प्रेमातला आदर्श ठरावे असेच आढळले आहे.) ट्रम्प यांच्या शपथविधीलाही मेलानिया येईल की नाही याविषयीचा संशय तिकडच्या वृत्तपत्रांनी व्यक्त केला होता. पण ती आली आणि तिने तो सोहळा साजराही केला. मात्र नंतरच्या काळात मेलानियाहून जास्तीची चर्चा ट्रम्प यांची अगोदरच्या विवाहापासून झालेली कन्या, इव्हांका हिची झाली. इव्हांका हीच अध्यक्षीय निवासस्थानातील सर्वात महत्त्वाची व कदाचित पहिली महिला असेल असे तिच्याविषयी म्हटले गेले. काही चावट वृत्तपत्रांनी इव्हांका आणि ट्रम्प यांच्या संबंधांविषयीही संशय व्यक्त करण्याचे धाडस दाखविले. ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरही मेलानिया बरेच दिवस फ्रान्समध्ये राहिली. आपल्या मुलाच्या शिक्षणाचे कारण त्यासाठी तिने तेव्हा पुढे केले. अमेरिकेचा अध्यक्ष ही आजच्या घटकेला जगातली सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे. त्याची पत्नी असणे ही अर्थातच महत्त्वाची बाब आहे. ती अमेरिकेची केवळ पहिली महिलाच नाही तर तिच्यावर अनेक सांस्कृतिक व स्वागतोपयोगी जबाबदाऱ्याही असतात. मात्र स्त्रीला अधिकार आणि पद याहूनही आणखी काहीतरी जास्तीचे हवे असावे. मेलानिया हिची मानसिकता तशी असावी आणि ती ट्रम्प यांच्या एकूणच वर्तन व व्यवहारावर फारशी प्रसन्न नसावी. त्यांच्या सहजीवनासंबंधी इंटरनेटवर असलेली माहितीही फारशी समाधानाची नाही. आयुष्याच्या आरंभी मॉडेलिंगसारख्या मुक्त क्षेत्रात वावरलेली व व्होग या जागतिक कीर्तीच्या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर आपली विवस्त्र छायाचित्रे छापायला परवानगी देणारी ती कमालीची स्वतंत्र व बेदरकार बाण्याची स्त्री आहे. ट्रम्प हे जगातील सर्वाधिक श्रीमंत माणसांमध्ये गणले जाणारे बांधकाम क्षेत्रातील यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा राजकारणापासून उद्योगातील सर्व क्षेत्रांपर्यंत असलेला संबंध जुना व निकटचा आहे. २००५ मध्ये त्यांच्या मेलानियाशी झालेल्या विवाहाला तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन हे हिलरी या आपल्या पत्नीसोबत उपस्थित होते ही बाब त्यांचे अमेरिकेच्या सार्वजनिक जीवनातील स्थान व वजन दर्शविणारी आहे. एवढ्या धनाढ्य, वजनदार आणि जगातील सर्वाधिक शक्तिशाली पुरुषाची पत्नी असूनही मेलानिया अशी अस्वस्थ असेल तर त्याचा संबंध श्रीमंतीशी वा अधिकाराशी नाही एवढे निश्चितच लक्षात येते. स्त्रीला विवाहात व तेही नवऱ्याकडून नेमके काय हवे असते हा विवाहसंस्थेच्या आरंभापासून विचारला गेलेला प्रश्न आहे. मेलानियाला जे हवे ते ट्रम्प देऊ शकत नसतील तर स्त्रीची इच्छा जगातली सर्वात सामर्थ्यवान व्यक्तीही पूर्ण करू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. लग्नाआधी सात वर्षे मेलानियाचा पिच्छा पुरविल्यानंतरही ट्रम्प यांना तिचे मन जाणून घेता आले नसेल तर तो पुरुषी मानसिकतेचाही पराभव मानला पाहिजे. प्रश्न, पतीपत्नीमधील आवडीनिवडीचाही असतो. त्या कशातून जुळतील आणि कशामुळे तुटतील याची नेमकी जाण त्यांनाही बहुदा नसते. अमेरिकेसह पाश्चात्त्य जगात पती व पत्नी यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होणे ही बाब कोणी फारशी मनावर घेत नाही. मात्र अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षाने घेतलेल्या घटस्फोटाची कहाणी नाही. मात्र ट्रम्प हे आजवरच्या सर्व अध्यक्षांहून वेगळे आणि त्यांच्या परंपरेत न बसणारे व बरेचसे बेभरवशाचे वाटणारे गृहस्थ आहेत असेच सारे म्हणतात. त्यांचा पक्ष त्यांच्यापासून दूर जात आहे. माध्यमे दुरावली आहेत आणि विरोधी पक्ष त्यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याचा विचार करीत आहे. साऱ्या देशात त्यांच्याविरुद्ध कृष्णवर्णीयांनी व महिलांनी निषेधाचे मोर्चेही आजवर काढले आहेत. ही स्थिती मेलानियाच्या मनोवस्थेजवळ जाणारीही असावी.
ट्रम्पचा हात मेलानिया झिडकारते तेव्हा...
By admin | Published: May 26, 2017 1:36 AM