वैचारिक व्यभिचारातून निर्माण झालेली ही नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्राला येत्या काही वर्षांत कोणत्या पातळीवर नेऊन ठेवणार, ही चिंता आणि चिंतनाची बाब आहे. गेल्या काही वर्षांत आणि त्यातही गेल्या वर्षभरात हे राजकीय स्खलन फार वेगाने झाले. त्याचा अंत काय होईल?विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात स्वातंत्र्यलढ्यात राजकीय अधिष्ठान हा शब्दप्रयोग पुढे आला. या लढ्याकडे केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष या नजरेने न पाहता हा लढा लढताना जनतेमध्ये राजकीय आणि वैचारिक जागृती निर्माण करावी हा त्यामागचा हेतू होता. काँग्रेस पक्षाची स्थापना ही अशाच वैचारिक मंथनातून झाली होती. त्याच वेळी जगाच्या राजकीय व्यासपीठावर फ्रान्समधील लोकशाहीचे आंदोलन रशियन राज्यक्रांती या वैचारिक अधिष्ठानावर लढल्या गेलेल्या राजकीय लढ्याची उदाहरणे होती. त्यामुळे हा लढा या अंगाने पुढे नेत जनजागृती करावी हा विचार पुढे आला. लोकमान्य टिळकांनी तो सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले, तर पुढची म्हणजे १९२० नंतरची सत्तावीस वर्षे भारतीय राजकारण महात्मा गांधी या व्यक्तिमत्त्वाने व्यापून टाकले होते. तरीही साम्यवादी आणि समाजवादी प्रवाह आपली विचारधारा टिकवून होते. हाच काळ हिंदू राष्ट्रवादाच्या उदयाचा होता. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून हिंदू राष्ट्रवादाची कल्पना रुजविली आणि येथून पुढची पंचवीस वर्षे स्वातंत्र्यलढ्याच्या राष्ट्रीय आंदोलनाची होती तशी या वेगवेगळ्या विचारांच्या वैचारिक आंदोलनाचीही होती. या सगळ्या मंथनातून स्वातंत्र्योत्तर काळातील पुढच्या पन्नास वर्षांच्या भारतीय राजकारणाने आकार घेतला आणि हा काळ महात्मा गांधींनी बांधणी केलेल्या काँग्रेसच्या राजकीय अधिष्ठानाचा होता.या काळात सत्तेसाठी अनेक पक्षांच्या आघाड्या बनल्या. त्यांनी राज्यकारभारही वेगवेगळ्या राज्यांमध्ये केला. १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग हा एका समान राजकीय हेतूने प्रेरित होऊन तो झाला; पण परस्पर विरोधी विचारधारांचे कडबोळे बांधून सत्ता प्राप्त केली की काय होते, याचा परिपाठ यातून मिळाला. यापूर्वी वैचारिक समान धागा असलेल्या पक्षांच्या आघाड्या बनल्या होत्या. काँग्रेस आणि समाजवादी ही विचारधारा समांतर असल्याने अशी प्रादेशिक सरकारे अस्तित्वात आली; परंतु जनता पक्षाच्या प्रयोगात जनसंघाचा समावेश केला गेला. त्यात समान धागा नव्हता म्हणूनच तो फसला. म्हणजे या राजकीय संकटातून राजकीय गोंधळच निर्माण झाला आणि भारतीय राजकारणातून राजकीय अधिष्ठानाचे स्खलन सुरू झाले. हे सगळे मांडण्याचे कारण म्हणजे आज महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत जो राजकीय गोंधळ सुरू आहे, हा त्याचा परिपाक म्हटला पाहिजे. सत्ताप्राप्तीसाठी समान वैचारिक धागा असलाच पाहिजे. एवढीसुद्धा नैतिकता पाळायची कोणाचीही तयारी नाही आणि मिळेल त्या मार्गाने येईल त्याच्या सोबत सत्तासोबत करताना कोणालाही गैर वाटत नाही.वैचारिक व्यभिचारातून निर्माण झालेली ही नवी राजकीय संस्कृती कुठे नेणार? गेल्या काही वर्षांत आणि त्यातही गेल्या वर्षभरात हे राजकीय स्खलन फार वेगाने झाले. भाजपच्या फडणवीस सरकारने काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दुराग्रहापायी या पक्षातील बड्या नेत्यांना आपल्या मांडवात आणून बसवले. त्यांनी निर्माण केलेल्या ‘साम्राज्याला’ धोका निर्माण होईल, अशा धाकातून हे घाऊक पक्षांतर झाले आणि उरल्यासुरल्या वैचारिक राजकीय निष्ठा किंवा अधिष्ठानाला तिलांजली मिळाली आणि कोणतेही तारतम्य, जनकल्याण यापेक्षा केवळ पैसा, धर्म, जात, राजकीय प्राबल्य या आधारावर प्राबल्य असलेल्या आणि स्वार्थासाठी सत्ता प्राप्त करून राबविणाऱ्या नव्या संस्कृतीचा उदय झाला. आज राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी निवडणुकीचा शिमगा चालू आहे. ती या नव्या राजकीय संस्कृतीची चुणूक म्हणावी लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुसंख्य जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतीमध्ये भाजपची सत्ता असल्याचा दावा फडणवीसांनी केला होता. या नव्या संस्कृतीने त्यांचे राजकीय गणित तोडून टाकलेले दिसते. स्वातंत्र्यलढ्याचे वैचारिक नेतृत्व करणाºया या महाराष्ट्रातील राजकारणाला आजवर एक वैचारिक अधिष्ठान होते. राजकीय पाट लावण्याच्या नादात आता महाराष्ट्राच्या राजकारणाची किती अधोगती होणार, याचीच चिंता आहे. कारण यापुढे किमान एक तपाचा काळ तरी ही राजकीय संस्कृती फुलणार आहे आणि ही महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ठरू नये.
राजकीय स्खलन कधी थांबणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 6:50 AM