- राजू नायक‘सनबर्न क्लासिक’ हा इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव पुन्हा एकदा वादात सापडला आहे. वागातोर या किनारी भागात होणाऱ्या या महोत्सवाला अवघे १० दिवस बाकी असताना राज्य सरकारने काही अटी लागू केल्या आहेत. त्यातील महत्त्वाची अट ही आहेय की या महोत्सवाची थकबाकी एक कोटी रुपये भरा! आयोजकांचे म्हणणे, सरकारने ऐनवेळी त्यांची अडवणूक चालविलेली आहे. क्लासिकचे मुख्य अधिकारी शैलेश शेट्टी म्हणाले की यावर्षी महोत्सवाला ५० हजार युवक उपस्थित असतील. शिवाय जगातील पाच सर्वश्रेष्ठ इडीएम कलाकार व इतर १०० वादक उपस्थित राहणार आहेत. एका प्रकारे राज्य सरकारवर ते दबाव आणताहेत. राज्यात यावर्षी ३० टक्के कमी पर्यटक येताहेत. थॉमस कूक युरोपीय पर्यटन कंपनी बंद झाल्याचा फटका राज्याला बसला आहे.‘सनबर्न’ हा महोत्सव नेहमीच वादात असतो. यापूर्वी याच नावाने होणाºया इडीएममध्ये एक मुलगी अती ड्रग्स सेवनाने मृत्युमुखी पडली होती. तेथे ड्रग्स मिळतात, ध्वनी प्रदूषण होते. वाहतुकीची कोंडी होते व सामाजिक अडचणी निर्माण होत असल्याची टीका होत आली आहे. इडीएम हा प्रकार उच्चभ्रू युवकांमध्ये सध्या चांगलाच लोकप्रिय आहे. गोव्याच्या महोत्सवासंबंधी पुणे, बंगळुरूहून मोठ्या प्रामणावर आयटी क्षेत्रातील तरुण येतात. गोव्यात असे ‘खुले’ वातावरणही असते. जे या बेफाम, बेदरकार आणि धुंद युवकांना योग्य माहौल उत्पन्न करून देते. पुण्यात यापूर्वी असा प्रयोग झाला आहे. परंतु त्याला योग्य प्रतिसाद लाभला नाही. गोव्यात जेथे हा महोत्सव होतो तो ‘वागातोर’ भाग यापूर्वी हिप्पींसाठी प्रसिद्ध होता. ज्यांना ‘धुंदीत’ राहायला आवडायचे आणि जगाला ‘विसरून’ कपड्यांसह सर्वसंग परित्याग केलेले हे युवक गोव्याच्या आश्रयाला कायमचे आलेले असायचे. आज जरी हा ‘हिप्पी’ ट्रेंड संपला असला तरी हिप्पींनी ‘शोधलेला’ गोवा त्याच वातावरणासाठी अनेकांना आवडतो. वर्षातील काही दिवस तरी हे युवक त्याच धुंदीत जगू इच्छितात. असले इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव त्यांना हवे ते वातावरण तयार करून देतात.गोव्यातही या प्रकारच्या महोत्सवांना पाठिंबा देणारा घटक आहे. पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक त्यांना पाठिंबा देणारच. कारण सतत समुद्रकिनारे पाहून कंटाळलेला तरुण पर्यटक त्यांना येथे सतत वळलेला हवाच असतो. हा घटक अमली पदार्थांना विरोध करून स्वच्छ पर्यटन असावे या मताचाही नाही. पश्चिमी राष्टÑांमधल्या कित्येक ठिकाणी आता नियंत्रित स्वरूपाच्या अमली पदार्थांच्या सेवनाला मान्यताही आहे. परंतु वैद्यकीय निगराणीखाली तेथे हा प्रकार चालतो. गोव्यात कायदे कडक असूनही नेपाळ, पाकिस्तानसारख्या ठिकाणांहून अमली पदार्थ येतात. गोव्यात नायजेरियन नागरिकांना या कायद्याखाली सतत अटक केली जाते. बरेच गोवेकरही त्यात आता गुंतले आहेत. तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी चालली आहे. अमली पदार्थांच्या जोडीला कॅसिनो व शरीरविक्रयही सुरू झालेली आहे. त्यामुळे असले पर्यटन आम्हाला कुठे नेणार आहे, हा प्रश्न अधूनमधून येथे निर्माण होतो.आणखी एक विचार व्यक्त होतो तो म्हणजे ‘वागातोर’ या गर्दीच्या ठिकाणी असे महोत्सव न भरवता तो एका कोपºयात जेथे नागरी वस्तीला त्याचा उपद्रव जाणवणार नाही तेथे हे महोत्सव भरवावेत. गोव्याने असा एक अलग ‘मनोरंजन इलाखा’ तयार करावा हा विचार बरेच दिवस घोळतो आहे. बेतुलसारखे ठिकाण त्यासाठी योग्य आहे. परंतु राज्य सरकार ताबडतोब निर्णय घेत नाही. कारण महोत्सव वादात सापडले की त्यातून हप्ते गोळा करता येतात. राज्याचे कर चुकवून विनासायास पैसे उकळता येतात. त्यामुळेच ‘सनबर्न’ला ऐनवेळी जुने येणे वसूल करण्यासंदर्भात बजावलेली नोटीस त्याच धर्तीची आहे, अशी येथे चर्चा चालली आहे.
‘सनबर्न’ला लागलेले ग्रहण कधी सुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 9:00 AM