राजा माने|
इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके ( यमकेला ओळखले ना? अहो, राजकुमार हिराणी-आमीर खानचा ‘पी.के.’ चा डुप्लिकेट ‘एम.के.’ ! अर्थात, आमच्या यमगरवाडीचा यमके...मनकवडे) आज वेगळ्याच चिंतेत होता. संस्कृती, परंपरा, आचरणपाईकतेवर जन्मसिद्ध हक्क सांगणाऱ्या पुणे नगरीत आपल्या मुलाने ‘जोगती’ व्हावे म्हणून कुटुंबानेच मांडलेल्या छळवादाच्या घटनेने तो अस्वस्थ होता. त्याच घटनेचा रिपोर्ट इंद्रदेवांना सादर करण्याच्या विचारात असतानाच यमकेच्या फोनवर रिंगटोन खणाणली... ‘ नारायण! नारायण !!' (महागुरू नारदांचाच तो कॉल असल्याने यमकेने पटकन फोन घेतला आणि बोलू लागला...) यमके : गुड मॉर्निंग गुरुदेव...!नारद : बॅड मॉर्निंग आहे शिष्या... मराठी भूमीतील पुण्यात हे काय चाललंय?यमके : हो तोच रिपोर्ट देतोय... जोगती प्रकरण..नारद : म्हणजे काय...?यमके : गुरुदेव नटरंग... ! वाजले की बारा... किंवा अप्सरा आऽऽऽली ... अहो त्यातील जोगती... लिमयांचा उपेंद्र.. बर्व्यांची मुक्ता...नारद : सगळं समजलं! पण पुन्हा तू जोगती प्रकरणाची शिळीच बातमी देतोय... अरे ती तर काल दुसºया प्रहरी लोकमत आॅनलाईन आवृत्तीवर इंद्रदेवांनी वाचली... नेमक्या त्याचवेळी स्वर्गलोकी डॉ. नरेंद्र दाभोलकरही ‘लोकमत’ आॅनलाईनवर बातम्या पाहत असतील... आणि अचानक त्यांनी दोन शब्दांचा मेसेज इंद्रदेवांना काढला. ते शब्द होते... फाशी! फाशी!!यमके : हो. भारतभूमीतील नरेंद्रभार्इंनी एक ऐतिहासिक कायदा केला. १२ वर्षांच्या आतील वयाच्या बालिकेवर अत्याचार करणा-या नराधमांना फासावर लटकविणारा तो कायदा आहे. कदाचित नरेंद्रभार्इंचे अभिनंदन करण्यासाठी दाभोलकर सरांनी तसा मेसेज धाडला असावा.नारद : बरोबर आहे शिष्या. पण तो मेसेज दोन शब्दावर थांबला नाही तर परत एक भलामोठा खलिता डॉ. दाभोलकरांनी इंद्रदेवांना धाडला.यमके : आता ही काय नवी भानगड?नारद : ही भानगडही नव्हे आणि फेकाफेकीही नव्हे. भारतभूमीत दर २० मिनिटाला महिला अत्याचाराचा गुन्हा घडतो, असे दाखले देत त्यांनी महिलांवरील अत्याचार मानसिकतेचा इतिहासच देवांपुढे ठेवला. इ.स.पूर्व ५२६ आणि इ.स. १०१० पासून ते आजपर्यंतच्या अत्याचार मानसिकतेची आकडेवारीच त्यांनी दिली. या मानसिकतेला फाशी देण्यासाठी तुम्ही काय करणार? असा खडा सवाल त्यांनी देवाला केला आहे.यमके : सरांच्या अंधश्रद्धाविरोधी तळमळीबद्दल आम्ही नेहमीच अभिवादन करतो. महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात सौदी अरेबियात फाशीची शिक्षा दिली जाते. इतर देशांमध्ये दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. आता अशा प्रवृत्तीला ठेचण्यासाठी भारतभूमीत फाशीपासून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार असताना डॉ. दाभोलकर सरांनी मागणीऐवजी नरेंद्रभार्इंचे अभिनंदन करावे.नारद : अरे, प्रत्येक अपप्रवृत्तीच्या मुळाशी अंधश्रद्धा दडलेली असते. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यात अंधश्रद्धेला फासावर लटकविण्याची मागणी करणे स्वाभाविकच आहे. फाशीची शिक्षा ही अपप्रवृत्तींवर दहशत बसेल, पण आपल्या मानगुटीवर बसलेल्या अंधश्रद्धेचे काय?