- किरण अग्रवाल
अधिकारांची जाण बहुतेकांना असते, पण कर्तव्याचे भान मात्र तितकेसे नसते हे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येकच बाबतीत शासकीय यंत्रणांकडे बोट दाखवताना आपल्या जबाबदारीकडे डोळेझाक होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणे गरजेचेच आहे. किंबहुना आपल्यासाठीच उपयोगाचेही आहे.
हल्ली जागोजागी चोऱ्या वाढल्या, असा आरोप करून पोलिसांचा धाक कमी झाल्याचे कारण त्यामागे असल्याचे सांगितले जाते. काही बाबतीत किंवा प्रमाणात ते खरेही असावे. परंतु, यातील नागरिकांची बेफिकिरीही दुर्लक्षित करता येणार नाही. आपण स्वतः आपली काळजी घेणार नसू तर यंत्रणा कुठवर आपल्या मदतीला पुरी पडणार, असा प्रश्न त्यामुळेच निर्माण होणारा आहे.
अलीकडच्या काळात शहर व जिल्ह्यातील चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. एकतर शालेय सुट्यांचा कालावधी व त्यात लग्नसराई. त्यामुळे लोक घराबाहेर पडतात व हीच संधी साधून घरे फोडली जातात. फिरायला व लग्नाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेवून चोरट्यांनी संधी साधत चोरी केल्याच्या गत सहा महिन्यांत ६७ घटना अकोला जिल्ह्यात पोलिस दफ्तरी नोंदल्या गेल्या आहेत, यावरून चोरांचा सुवर्णकाळ लक्षात यावा. या प्रकरणी पोलिस आपला तपास करत आहेतच. किंबहुना यातील ३२ घटनांचा शोध लावण्यात त्यांना यशही आले आहे; पण हे सर्व होताना नागरिक स्वतः स्वतःची काही काळजी घेणार आहेत की नाही?
बाहेरगावी जाताना आपल्या परिसरातील बीट मार्शलसह पोलिसांना सूचना द्यायला हवी, असे आवाहन वारंवार केले जाते. त्याचे किती जणांकडून पालन केले जाते, असा प्रश्न केला तर समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांचे सोडा, शेजाऱ्यांना सुद्धा हल्ली कोणी सांगून जात नाही. विशेष म्हणजे सांगण्याचे अगर कळविण्याचेही जाऊ द्या, बाहेर पडताना नीट घर बंद केल्याचीही काळजी घेतली जाणार नसेल तर चोरांना संधी मिळणारच. अलीकडेच कुंभारी येथे असाच प्रकार घडला. तेथील एक कुटुंब लाखनवाडी येथे देवदर्शनाला गेले असता, घाई गडबडीत घराच्या मागील दरवाजाला कुलूप लावायचे राहून गेले, अखेर जे नको व्हायचे तेच झाले व चोरांनी मागच्या दाराने आरामात घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याची पोत लांबवली. अशाही बाबतीत पोलिसांचा वचक संपला म्हणून यंत्रणेला दोष दिला जाणार असेल तर तो योग्य ठरू नये.
आपण अधिकारांप्रति जितके जागरूक असतो, तितके कर्तव्याबद्दल नसतो, हा सर्वांच्याच बाबतीतला अनुभव आहे. इतरांकडून किंवा यंत्रणांकडून आपल्या ढीगभर अपेक्षा असतात, त्या गैर नाहीत; पण आपलीही काही जबाबदारी आहे की नाही? बरे, इतर गोष्टींचेही जाऊ द्या; किमान स्वतःच्या जीवाची चिंता तर स्वतःच करावी ना! परंतु तेही होताना दिसत नाही, हे अधिक आश्चर्याचे व चिंताजनकच म्हणायला हवे. पोलिसांकडून केल्या गेलेल्या हेल्मेट सक्तीकडे या संदर्भाने बघता यावे. वाहनचालक जीवावर उदार होऊन फिरताना आढळतात.
दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे व चारचाकी चालवताना सीटबेल्ट लावणे हे इतरांसाठी नव्हे, तर स्वतःच्याच जीवासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे; पण त्याही बाबतीत नियमांचे पालन केले जात नाही. समृद्धी महामार्गावर वेगाची मर्यादा पाळली जात नसल्याने प्रतिदिन जीव गमावले जात आहेत. तसे इकडे शहरांमध्ये हेल्मेट न वापरल्यानेही अनेक जीव जात आहेत. एकट्या अकोला जिल्ह्याची आकडेवारी बघितली तर गेल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात ३६७ अपघात झाले व यात ५७ जणांना जीव गमवावा लागला. यातील अर्ध्यापेक्षा अधिक बळी हे केवळ हेल्मेट परिधान न केल्यामुळे गेलेले आहेत. आता बोला, या प्रकरणात दोष कुणाचा? खराब रस्तेही अपघाताला निमंत्रण देतात हे खरेच, परंतु ते माहीत असूनही आपण उघड्या डोक्याने हेल्मेट न घालता फिरून संकट ओढवून घेणार असू तर कसे व्हायचे?
जाता जाता आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो. आपण सारेच जण उठता बसता सरकार नामक यंत्रणेला दूषणे देत असतो. हे सरकार स्थापन करण्यासाठी मतदार म्हणून आपल्याला संविधानाने जो हक्क दिला आहे तो बजावता यावा, यासाठी आता वर्षाच्या बाराही महिने जी ऑनलाइन नावनोंदणी केली जाते व वेळोवेळी यंत्रणांकडून मतदार याद्यांचे पुनरिक्षणही केले जाते त्यात स्वयंस्फूर्तीने किती जणांनी भाग घेतला, हे तपासून पाहिले तर त्याचेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. आपला अधिकार मिळविण्यासाठी आपणच थोडी तसदी घेऊन प्रयत्न करायला काय हरकत आहे? पण ते अपवाद वगळता तितकेसे होत नाही. पाणीटंचाईचे घ्या. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत; मात्र अजूनही शहरात अनेक ठिकाणी तोट्या नसलेले नळ धो-धो वाहताना दिसतात. लोकं नळी लावून वाहने धुतात. यात आपली काहीच जबाबदारी नाही का?
सारांशात, शासनाकडून व पर्यायाने यंत्रणांकडून कसल्याही अपेक्षा करताना जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणेही अपेक्षित आहे. मात्र, स्वतःचेच नुकसान टाळण्यासाठी व जीव जपण्याच्या संदर्भानेही ती काळजी घेतली जाताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे.