शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

तरुण (बि)घडतात, राजकारणात येतात, तेव्हा..

By श्रीनिवास नागे | Published: January 17, 2023 6:11 AM

अमेरिकेत शिकणारी यशोधराराजे, बी. टेक. करत असलेली प्रणाली, बी.ई. सिव्हिल झालेला हर्षवर्धन; या तिघा उच्चशिक्षित तरुण सरपंचांशी गप्पा !

श्रीनिवास नागे

तिचं वय अवघं २१ वर्षं ५ महिने. अमेरिकेत जॉर्जिया विद्यापीठात ‘एमबीबीएस’ च्या चौथ्या वर्षात शिकत असलेली. गावाकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतात. तिला पप्पांसोबत गावकऱ्यांचा फोन येतो. सरपंचपदाची निवडणूक लढवण्याची गळ घातली जाते आणि ती थेट विमान पकडून गावाकडे परतते. अर्ज भरते. पंधरा दिवसात सर्वांत तरुण, उच्चशिक्षित, ‘फॉरेन रिटर्न्ड’ सरपंच बनते ! सगळंच अचंबित करणारं. तिचं नाव यशोधराराजे महेंद्रसिंह शिंदे. सांगलीच्या मिरजेला खेटून असलेल्या वड्डी गावची ती कारभारी. यशोधराचं घराणं नरवाडकर सरकार म्हणून ओळखलं जातं. पणजोबा आणि आजी मंदाकिनी शिंदे वड्डी शेजारच्या नरवाडचे सरपंच राहिलेले, पणजोबांनी नंतर जिल्हा परिषदेचं सदस्यपदही सांभाळलेलं, तर वडील ग्रामपंचायत सदस्य. माजी महसूलमंत्री शालिनीताई पाटील म्हणजे यशोधराच्या मावस आजी.

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या सोहोली गावातली प्रणाली सूर्यवंशी २२ वर्षांची. सध्या वारणानगरला बीटेकच्या शेवटच्या वर्षाला आहे. गावचं सरपंचपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव झालं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना वडिलांनी, गावकऱ्यांनी हिला निवडणुकीत उतरवलं. परीक्षा देतच प्रचार केला आणि बहाद्दरीण सरपंच झाली. हर्षवर्धन पाटील सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या रेठरे धरण गावचा. पुण्यात बीई सिव्हिल झालाय. वय २२ वर्षं. वडील आनंदराव पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक, तर आई जिल्हा परिषदेची सदस्य. व्यवसाय आणि पुढचं शिक्षण सोडून तरुण हर्षवर्धन गावात परतला आणि थेट सरपंचपदाच्या खुर्चीत बसला.

आपल्याकडं गावचं सरपंचपद नाटकं-चित्रपट-कथा-कादंबऱ्यांनी बदनाम करून ठेवलंय. प्रत्यक्षात मात्र या पदाचा रूबाब, प्रतिष्ठा, आब कायम आहे. चौदाव्या वित्त आयोगामुळे शासनाचा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येतो. त्यामुळं पाच वर्षं पदावर राहणाऱ्या सरपंचांच्या हातात आर्थिक ताकदही असते. सरपंच लोकनियुक्त असावा, लोकांनीच निवडून दिलेला असावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पिढ्यानपिढ्या गाव ताब्यात ठेवणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देणाऱ्या या निर्णयामुळे तरणीबांड आणि उच्चशिक्षित पिढी गावगाड्याच्या राजकारणात उतरू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागलंय. कुणाला घरातूनच राजकारणाचं बाळकडू आहे, तर कुणाला कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही ! 

महाराष्ट्रातल्या कित्येक आमदार, खासदार, मंत्र्यांचं राजकारणातलं पहिलं पाऊल ग्रामपंचायतीत पडलंय. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांची सुरुवात सरपंच म्हणूनच झाली होती कल्पक, कार्यक्षम सदस्य सरपंच झाला तर कायापालट घडवतो, हे पोपटराव पवारांनी हिवरे बाजारमध्ये दाखवून दिलं आहेच ! समोर असले आदर्श आणि काहीतरी वेगळं करण्याची ऊर्मी तरुण पोरांच्या ठायी आहे. त्यामुळंच गावाच्या विकासासाठी परदेशातील उच्च शिक्षणाला मुरड घालून यशोधरा गावगाड्याच्या राजकारणात उतरलीय. सरपंच झाल्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण ती ऑनलाइन आणि अपडाऊन करून पूर्ण करणार असल्याचं सांगते. गावकऱ्यांनी गावातल्या पायाभूत सुविधांचा मुद्दा उपस्थित करत तिला निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली. राजकारणाचा अनुभव घेऊन इथंच ‘करिअर’ करण्यासाठी ती राजकारणात उतरलीय. तिला राजकारण नवं नसलं, तरी गावगाड्याचा विकासपट बदलल्याचं ती सांगते. तिला गावात बदल करायचाय. कारण ती स्वत:ला गावची लेक समजते. गावातल्या बायकांच्या समस्या माझ्या पुढील शिक्षणातील समस्यांपेक्षा गहिऱ्या असल्याचं सांगते. 

राजकारण गढूळ झालं असलं तरी सजग पिढी त्यात उतरल्याशिवाय ते स्वच्छ होणार कसं, असा रोकडा सवाल हे तरुण करतात. गावकरी आणि सरपंच, प्रशासन यातल्या भिंती तोडायची, गावाशी संवाद साधायची, गाऱ्हाणी ऐकून घ्यायची तयारी त्यांनी ठेवलीय. पंचायत राज पद्धती, ग्रामपंचायतीचा कारभार, सरपंचांची कामं याबाबत त्यांना फार माहिती नाही, पण जाणून घ्यायची आस आहे. निवडून आल्यावर परीक्षेसाठी महाविद्यालयात गेलेली सरपंच प्रणाली शिक्षण पूर्ण झाल्यावर  पूर्ण वेळ राजकारण करणार आहे. लग्न लवकर झाल्यानं बायकांचं शिक्षण अर्धवट राहतं. तसं होऊ नये म्हणून ती प्रयत्न करणार आहे. बायकांची निर्णयक्षमता वाढवणार आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाहीत, या मुद्द्यांवर नव्या पिढीनं गावात प्रचार केलाय. यशोधरानं तर महिलांसाठी स्वच्छतागृहं, परदेशासारखं शाळेत, चौकात सॅनिटरी पॅडचं व्हेंडिंग मशीन बसवण्याचा मुद्दा प्रचारात आणला होता.

विकासाची नवी दृष्टी देणारी ही पिढी आश्वासक वाटल्यानंच सरपंचपदाचा कारभार वर्षानुवर्षं हाकणाऱ्यांना बदललं गेलं. ग्रामस्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेतीतल्या अनेक योजना राबविण्याची संधी तर कारभाऱ्यांना असतेच, पण मूलभूत गरजांपलीकडे जाऊन विकासाची दृष्टी ठेवण्याचा अभ्यासही नव्या चेहऱ्यांकडे असावा लागतो. तो ‘स्पार्क’  दिसतो, प्रस्थापितांच्या गर्दीत स्वत:ची ‘स्पेस’ निर्माण करण्याची धमक  जाणवते, तेव्हा गावाचं अर्थकारण सुधारण्यासाठी ताज्या दमाच्या आणि नव्या नजरेच्या सक्षम तरुणांकडे गावचा कारभार सोपवला जातो; तो हा असा ! - काही म्हणा, गावाकडलं चित्र बदलायला लागलंय !!shrinivas.nage@lokmat.com

(लेखक लोकमत सांगलीचे वृत्तसंपादक आहेत)