शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
2
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
3
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
4
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
5
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
6
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
7
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
8
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
10
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
11
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
12
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
13
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
14
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
15
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
16
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
17
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
18
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
19
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
20
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."

कुठून कुठे विसावला तो पँथरचा विद्रोह?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 4:01 AM

‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण केला होता.

- बी. व्ही. जोंधळे(पुरोगामी चळवळीचे अभ्यासक)१९७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्रात दलित समाजावरील अत्याचार वाढले होते. पुणे जिल्ह्यातील बावडा येथील मातंग उमेदवाराने जिल्हा परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सवर्णांनी तालुक्यातील दलित समाजावर बहिष्कार टाकला होता. अकोला जिल्ह्यातील गवई बंधूंचे डोळे काढले होते. परभणी जिल्ह्यातील ब्राह्मणगावात दोन दलित महिलांची नग्न धिंड काढली होती. या घटनांमुळे दलित तरुण संतप्त होत होता. याच काळात १० एप्रिल १९७० रोजी एलिया पेरुमल समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात म्हटले होते, दलित अत्याचाराच्या एकूण प्रकरणात १ टक्का गुन्ह्याचीसुद्धा नोंद होत नाही. अहवाल प्रसिद्ध झाल्यावर २४ मे १९७२ रोजी मधू लिमये यांनी लोकसभेत दलित अत्याचारविरोधी आवाज उठविला.महाराष्ट्रात दलित समाजावर अत्याचार वाढत असतानाच दुसरीकडे प्रस्थापित साहित्याविरुद्ध बंडखोरीचा स्वर ‘लिटल मॅगझिन’च्या माध्यमातून उमटू लागला होता. ‘सत्यकथेत’ल्या साहित्याविरुद्ध दलित लेखक काहूर माजवू लागले होते. राजा ढाले, नामदेव ढसाळ हे या मॅगझिनमधून उमेदवारी करीत होते. याच काळात डॉ. म. ना. वानखेडे हे अमेरिकेतून ब्लॅक लिटरेचरची पीएच.डी. घेऊन भारतात परतले होते. त्यांनी ब्लॅक लिटरेचर, ब्लॅक पॉवर, ब्लॅक पँथरच्या चळवळीचा अभ्यास केला होता. अमेरिकेतील अश्वेतांनी आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून जसे लेखन केले, तसे लेखन दलित लेखकांनी करावे, हा विचार प्रभावी ठरू लागला होता. परिणामी, दलित लेखक नव्या धाटणीचे साहित्य लिहू लागले. ‘स्वातंत्र्य हे कुठल्या गाढवीचं नाव?’ असा सवाल नामदेव ढसाळांनी कवितेतून विचारला होता, तर १५ आॅगस्ट १९७२ मधील ‘साधना’ साप्ताहिकातील राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्य दिन’ हा लेख राज्यभर वादळ माजवून गेला. १९६३ मध्ये आलेल्या बाबूराव बागुलांच्या ‘जेव्हा मी जात चोरली होती’ पुस्तकाने काहूर माजून दलित साहित्य चर्चेस तोंड फुटले.दलित समाजावरील अत्याचार व दलित साहित्यातून व्यक्त होणाऱ्या विद्रोहाने दलित तरुण संतप्त न होता तरच नवल! अन्यायाचे साम्राज्य असते तेव्हा बंड ही न्यायाची सुरुवात असते, असे प्रख्यात तत्त्ववेत्ता कार्लाईल म्हणाला होता, तर ‘शेळी होऊन अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून एक दिवस जगा’ हा बाबासाहेबांचा संदेश होता. परिणामी, दलित तरुणांत असंतोष धुमसू लागला. त्याच असंतोषाचे दुसरे नाव आहे ९ जुलै १९७२ रोजी जन्माला आलेली दलित पँथरची चळवळ. दलित पँथरने राज्यात चांगलाच दरारा निर्माण केला होता. हजारो तरुण पँथरच्या भोवती जमा झाले होते. दलितांचा मुक्तिलढा सर्व प्रकारची क्रांती इच्छितो. आमचे लक्ष्य व्यक्ती नसून, व्यवस्था आहे. ती बदलून आम्हाला राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थान हवे आहे, या भूमिकेने तरुण भारावून गेले होते. वरळीची दंगल, गीतादहन, पँथर्सची बेदरकार भाषणे, त्यांच्या लाखा-लाखाच्या सभा यामुळे पँथर चांगलीच चर्चेत आली होती. पँथरमुळे खेडोपाडी दलितांवर होणारे अत्याचार थांबले होते. शिवसेनेला त्याकाळी आव्हान दिले ते पँथरनेच! पण दलित चळवळीस लाभलेला दुहीचा शाप अखेर पँथरलाही भोवला आणि व्यक्तिगत हेवेदावे, नेतृत्वाचा हव्यास तसेच आंबेडकरवाद की मार्क्सवाद या वादातून पँथर फुटली.नागपूर येथे भरलेल्या पहिल्या दलित पँथरच्या मेळाव्यात राजा ढालेंनी पँथरच्या नावाचा राजकीय वापर होत आहे, पँथर ही स्वयंभू संघटना आहे, असे कारण देत नामदेव ढसाळांना संघटनेतून काढून पँथर बरखास्तीची घोषणा करून ‘मास मूव्हमेंट’ काढली. तरीही नामदेव ढसाळ, रामदास आठवले, भाई संगारे, अरुण कांबळे, गंगाधर गाडे, अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर, आदींनी पँथर चालविली; पण १९९८च्या लोकसभा निवडणुकीवेळी रिपब्लिकन पक्षाचे जे फसवे ऐक्य झाले, तेव्हा दुसऱ्यांदा रामदास आठवलेंनी पँथर बरखास्त करून मोठी चूक केली. यामुळे दलित अत्याचाराविरोधी लढणारे हजारो तरुण सैरभैर झाले. चांगल्या चळवळीचे मातेरे झालेले पाहणे दलित चळवळीच्या वाट्याला आले. अत्याचाराविरुद्ध खदखदणारा ज्वालामुखी थंड झाला.रिपब्लिकन पक्षाच्या तडजोडवादी गटबाज नेत्यांच्या नाकर्तेपणाविरुद्ध आक्रोश करीत सर्वंकष क्रांतीचा नारा देत जन्माला आलेल्या दलित पँथरने रिपब्लिकन नेत्यांनाही मागे सारणारे सत्तेचे हिणकस राजकारण करण्यात कसूर केली नाही. दोन्ही काँग्रेसच्या मांडवाखालून जाता जाता पुढे शिवसेना व आता भाजपच्या तंबूत पँथर नेते केव्हा जाऊन बसले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. पँथरने नामांतर, मंडल आयोगाच्या प्रश्नावर संघर्ष केला; पण पुढे सर्व भार भावनात्मक राजकारणावरच राहिला. एक वेळ हे ठीकही होते. कारण, एका मर्यादेतील भावनात्मक राजकारण चळवळीत ऊर्जा निर्माण करीत असते; पण पँथर नेत्यांनी आंबेडकरवाद बाजूस सारून धर्मांध पक्षांशी युती करून सत्तेची पदे उपभोगावीत यास आंबेडकरवाद कसे म्हणावे, हा खरा आंबेडकरानुयायांना छळणारा प्रश्न आहे. १९७०च्या दशकासारखे अत्याचार आजही दलितांवर होत आहेत. तेव्हा दलित समाजावरील अत्याचाराची दाद मागण्यासाठी व त्यांना सर्व क्षेत्रात सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीवादी, सनदशीर, व्यापक, समाज संघटनेच्या मार्गाचा अवलंब करून काय करता येईल, याचा विचार दलित तरुणांनी केला पाहिजे, अशी अपेक्षा दलित पँथरच्या आजच्या स्थापनादिनी केली तर ती गैर ठरू नये.

टॅग्स :SocialसामाजिकDalit assaultदलितांना मारहाणMaharashtraमहाराष्ट्र