दृष्टिकोन - कुठून कुठे विसावला पँथर चळवळीतील तो विद्रोह?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 05:32 AM2019-07-31T05:32:20+5:302019-07-31T05:33:18+5:30
दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत नि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या निधनामुळे सत्तरच्या दशकातील पँथर चळवळीचा झंझावात डोळ्यांसमोरून सरकून गेला.
बी. व्ही. जोंधळे
दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत नि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या निधनामुळे सत्तरच्या दशकातील पँथर चळवळीचा झंझावात डोळ्यांसमोरून सरकून गेला. रिपब्लिकन पक्षाला १९७० च्या दशकात मरगळ आली होती. (आता तर पक्षाचे अस्तित्वच नाममात्र राहिले आहे.) काँग्रेस-रिपब्लिकन युतीमुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांतील लढाऊ बाणा लोप पाऊन त्यांना सत्तेची चटक लागली. याच काळात महाराष्ट्रात दलित समाजावरील अत्याचारांत वाढ झाली. या पार्श्वभूमीवर दलित पँथरचा ९ जुलै १९७१ रोजी जन्म झाला व पँथरने अन्याय-अत्याचाराविरुद्ध विद्रोही एल्गार पुकारला.
महाराष्टÑात पँथरची चळवळ जेव्हा चर्चेत होती त्याच काळात मराठवाड्यात कालवश प्रा. अविनाश डोळस, कालवश प्रा. माधव मोरे, विद्यमान प्रा. प्रकाश सिरसट, प्रा. एस. के. जोगदंड प्रभृतिंनी स्थापन केलेल्या दलित युवक आघाडीने दलित व सवर्ण समाजात समन्वय साधणारी चळवळ उभारली होती. दलित विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढ आंदोलन, एक गाव - एक पाणवठा, गायरान जमिनीचे लढे अशा काही चळवळी सनदशीर मार्गाने उभारल्या होत्या. १९७८ च्या नामांतर दंगलीमुळे मराठवाड्यात दलित समाजात दहशत पसरली होती. चर्चा खुंटली होती. या पार्श्वभूमीवर दलित युवक आघाडीने जानेवारी १९७९ मध्ये औरंगाबादेत तिसरे दलित साहित्य संमेलन घेत चर्चेचा मार्ग मोकळा केला. नामांतर लढ्यात नामांतरविरोधी दलितेतरांचा सहभाग वाढविण्याचेही मोठे काम केले. दलितांचा प्रश्न हा केवळ दलितांचा नाही. तो राष्टÑीय असल्याने दलितेतरांचा सहभाग वाढविल्याशिवाय दलित मुक्तीचा लढा यशस्वी होणार नाही, अशी मराठवाड्यातील दलित युवक आघाडीची भूमिका होती.
दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातील दलित पँथरचा आक्रमक जहाल आवेश समजण्यासारखा होता; पण सामाजिक न्यायाचा लढा लढविताना एकांगी भूमिका घेऊन चालत नाही, तर समविचारी मित्रांना सोबत घेऊनच सामाजिक समतेची लढाई पुढे न्यायची असते. याचे भान पँथर चळवळीला फारसे राखता आले नाही. अपवाद वगळले तर पँथर्सनी दलित-शोषितांच्या आर्थिक प्रश्नांवर फारसे लढे उभारल्याचे दिसत नाही. सारा भर भावनात्मक राजकारणावर राहिला. नेतृत्वात दुसरे कुणी वाटेकरी झाले, तर आपल्या पुढारीपणाचे काय? या भयगंडाने पछाडल्यामुळे सतत ते कंपूशाहीवर भर देत आल्याचे दिसते. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध पुकारलेला विद्रोही एल्गार एका मर्यादेत समर्थनीय होता, असे जरी क्षणभर मान्य केले, तरीही हा विद्रोह अखेरीस फसवाच निघाला, हे कसे बरे नाकारता येईल? रिपब्लिकन नेते तडजोडवादी निघाले, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन संकल्पनाच मारून टाकली, असा पुकारा करीत जेव्हा दलित पँथरची स्थापना झाली तेव्हा दलित समाजास मोठा दिलासा मिळाला होता; पण पँथर्सही अखेर रिपब्लिकन नेत्यांच्या मळलेल्या वाटेनेच गेले. ईर्षा-द्वेष-भांडणामुळे पँथरमध्येही अवघ्या दोन-एक वर्षांत फूट पडली. ढाले-ढसाळांचे मार्ग वेगळे झाले. राजा ढालेंनी पँथर बरखास्त करून मास मुव्हमेंटची स्थापना केली. बरखास्तीचा निर्णय मान्य नसणाºया अन्य नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी दलित पँथर चालविली.
काँग्रेस-रिपब्लिकन युतीवर ज्या पँथर्सनी तोंडसुख घेतले त्यांनीच रिपब्लिकन पुढाऱ्यांवर मात करीत तत्त्वच्युत आघाड्या-युत्या करण्यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्टÑवादीसोबत मंत्रिपद उपभोगले. नंतर शिवसेनेशी मैत्री केली. आता ते भाजपच्या मांडीला मांडी लावून केंद्रात मंत्री आहेत. आयुष्यभर ज्या नामदेव ढसाळांनी मार्क्सवादाची भाषा केली होती तेही शिवसेनेशी दोस्ती करून बसले. रिपाइंचे अविनाश महातेकर राज्यमंत्रिपद भूषवत आहेत. दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांना शिवसेनेच्या मांडवाखालून जाताना अजिबात चुकल्यासारखे वाटत नाही. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सत्तेसाठी कमी आणि सामाजिक अभिसरणासाठी अधिक यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या साथीने जी काँग्रेस-रिपब्लिकन युती केली होती त्या युतीवर जे कठोर टीका करीत होते तेच आज भाजप-शिवसेनेच्या तंबूत डेरेदाखल झाले. या तत्त्वच्युतीचे समर्थन तरी कसे व्हावे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष नीतिमूल्यांचा आणि व्यवस्थाविरोधी विद्रोहाचा टाहो फोडणाºयांनी आंबेडकरी विचारांच्या विरोधांशी दोस्ती करावी ना? म्हणूनच आता प्रश्न असा उपस्थित होतो की, पँथर्सचा विद्रोह कुठून सुरू होऊन कुठे जाऊन विराम पावला? या प्रश्नाचे तर्कशुद्ध नि समाधानकारक उत्तर कुणी आंबेडकरी समाजाला देईल काय?
( लेखक दलित चळवळीचे अभ्यासक आहेत )