- सचिन जवळकोटे
मुरारजीपेठेतील ‘महेशअण्णां’च्या ‘राधाश्री’ बंगल्यानं खूप वर्षांनंतर बड्या नेत्यांची वर्दळ अनुभवली. गाड्यांचा ताफा पाहिला. एकेकाळी ‘सुशील’ सहवासानं पुलकित होणारा हा बंगला आज ‘शरद’ स्पर्शानं गहिवरला. बदलत्या निष्ठेची ही बदलती रूपं याच बंगल्यातला ‘सुशीलकुमारां’चा फोटोही अचंबित होऊन पाहत राहिला. ‘शिंदे गेले कोठे.. पवार आले कोठे’ या शोधात सर्वसामान्य कार्यकर्ताही थक्क होऊन राहिला. लगाव बत्ती..
तब्बल पाच माजी महापौरांची कहाणी..‘थोरले काका बारामतीकरां’चा हा दौरा केवळ प्रस्थापित ‘घड्याळ’वाल्यांच्याच राजकीय करिअरला धक्का देणारा नव्हता.. तर अवघ्या सोलापूरच्याराजकारणाला कलाटणी देणारा होता. जुन्यांना त्यांची जागा, तर नव्यांना नवा रस्ता दाखविणारा होता. शहरातील तब्बल पाच माजी महापौरांसाठी जणू टर्निंग पाॅईंटच होता.1) पहिले माजी महापौर म्हणजे खुद्द ‘महेशअण्णा’. या ‘कोठे’ फॅमिलीची पूर्वीपासूनची एक खासियत. ते जिथं जातील, ती पार्टी पुरती हायजॅक करतील. एक तपापूर्वी त्यांच्या करकच्चऽऽ तावडीतून ‘शिंदें’चा ‘पंजा’ कसाबसा बाहेर निघाला. मग या ‘अण्णां’नी ‘धनुष्यबाण’ हातात घेतलं.. म्हणजे सरळ-सरळ खिशातच टाकलं. हे पाहून माढा-परंड्याच्या ‘सावंतां’ची सटकली. त्यांनी त्यांचा खिशाच फाडून टाकला. अखेर फाटक्या खिशानिशी गेल्या वर्षभरात ते ‘बारामती’ला हेलपाटे मारू लागले. कधी ‘बळीरामकाकां’चं बोट धरून, तर कधी थेट ‘अजितदादां’च्या केबीनमध्ये शिरून संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागले. सुरुवातीला ‘थोरल्या काकां’नी त्यांना खूप फिरवलं. भलतंच तंगवलं. लोकांना वाटलं, बहुधा ‘काका’ यांच्या निष्ठेची परीक्षा घेत असावेत; मात्र ‘काकां’ना निष्ठेशी कधीच देणं-घेणं नव्हतं. कारण स्वत:ही कधी ते एकाच पक्षाशी निष्ठावान राहिले नव्हते. त्यांना फक्त हा ‘लंबी रेस का घोडा’ रेसमध्ये शेवटपर्यंत टिकणार का, याची खात्री करायची होती.2) दुसरे माजी महापौर म्हणजे ‘मनोहरपंत’. महापालिका इलेक्शनची सारी सूत्रं ‘महेशअण्णां’कडं दिल्याची द्वाही फिरविण्यासाठी ‘काकां’ची गाडी जेव्हा ‘राधाश्री’ बंगल्यासमोर येऊन थांबली, तेव्हा फाटकाबाहेर ताटकळत उभारलेल्या ‘सपाटें’नी अवहेलनेचा आवेग कसाबसा गिळला. सोबतच्या ‘दिलीपभाऊं’ना तर तेवढंही करता येईना. त्यांना तोंडातलं पान गिळता येईना. थुंकताही येईना. ‘सपाटे’ हतबलपणे बाहेर उभे होते, तेव्हा ‘काकां’ना बंगल्यात ‘महेशअण्णा’ लाडक्या ‘देवेंद्रदादां’ची ओळख करून देत होते, ‘यांनीच सपाटेंचा पराभव केला बरं का,’.. किती दुर्दैवी योगायोग ना. ‘एक दिवस या कोठे फॅमिलीला सोलापूरच्याराजकारणातून हद्दपार करून दाखवू’ अशी कधीकाळी प्रतिज्ञा करणाऱ्यांना शेवटी याच बंगल्याबाहेर नाईलाजानं उभारावं लागलं. मोठ-मोठ्या बाता मारणाऱ्या ‘विद्याताई’ तर गपगुमानं रिक्षातूनच रामवाडीजवळच्या घरी गेल्या.3) तिसरे माजी महापौर म्हणजे ‘आरिफभाई’. त्यांचे बंधू ‘तौफिकभाई’ अखेर ‘घड्याळ’वाल्यांच्या स्टेजवर मिरवून आले. हे ‘भाई’ आजपावेतो ‘हैदराबाद’वाल्यांच्या पार्टीत होते, तोपर्यंत गोष्ट वेगळी होती. आता आगामी इलेक्शनमध्ये ‘शोलापूर के लोगा ओवैसीभाईं के पिछे जायेंगे.. या तौफिकभाई के साथच रहेंगे,’ हे दाखविण्यासाठी ‘ताज ग्रुप’ला पळावंच लागणार. या नादात ‘आरिफभाईं’ना नाईलाजानं का होईना ‘घड्याळ’वाल्यांबरोबर फरफटत जावंच लागणार.4) चौथ्या माजी महापौर म्हणजे ‘नलिनीताई’. ध्यानीमनी नसताना पहिल्यांदाच मेंबर म्हणून निवडून आल्यानंतर त्या थेट ‘मेयर’च बनल्या. ‘चंदेले घराण्याची पुण्याई’ सोडली तर त्यांचं स्वत:चं राजकीय कर्तृत्व काय, हे ‘ताई’सोबत नेहमी फिरणाऱ्या दोघींनाच माहीत. त्यांचा हा आकस्मिक प्रवेश साऱ्यांसाठीच धक्कादायक. या अनपेक्षित निर्णयाबद्दल ‘हेमूं’ना विचारावं तर ते गंभीरपणे ‘जाऊ दे बॉसऽऽ निवांत कधीतरी हिस्ट्री सांगतो,’ असं बोलून एका वाक्यात विषय बदलतील. त्यांचंही बरोबरच म्हणा. जिथं खुद्द ‘किंगमेकर दिरा’लाच विचारलं जात नाही, तिथं बाकीचे तर किस झाड की पत्ती. 5) पाचवे माजी महापौर म्हणजे ‘बेरिया वकील’. खरंतर ते ‘सुशीलकुमारां’चे कट्टर कार्यकर्ते. मात्र त्यांनीही ‘अण्णां’च्या बंगल्यावर ‘काकां’ची भेट घेतली. सोलापूरच्या विकासाची चर्चा केली. आता शहराचा विकास म्हणजे ‘बेरिया हॉल’ डेव्हलप करण्याइतका साधा सोपा विषय नसावा. असो. दोष त्यांचा नाही. आयुष्यभर सत्तेत राहण्याच्या मानसिकतेचाही नाही. विषय एवढाच की पाच-पाच माजी महापौर चलबिचल का होतात याचा. लगाव बत्ती..
‘काकां’नी हात झटकून सांगितलं.. ..मी नाही बोलणार सुशीलकुमारांशी !स्थळ - ‘रेस्ट हाऊस’. ‘थोरल्या काकां’सोबत स्थानिक नेत्यांची चर्चा रंगलेली. आगामी महापालिका निवडणुकीची राजनीती ठरू लागलेली. ‘दोन्ही देशमुखांना घरी पाठवायचं असेल तर आघाडी करावीच लागेल’ असं ‘काकां’नी सुचविताच चुळबुळ सुरू झाली. अनेकांनी हळूच गेल्या निवडणुकीतले अनुभव सांगितले. शेवटपर्यंत हो-हो म्हणत शेवटच्या क्षणी ‘ताईं’नी कशी स्वतंत्रपणे लढविली, याचे किस्सेही शेअर केले गेले. त्याचवेळी एकानं ‘काकां’ना विनंती केली, ‘तुम्हीच सुशीलकुमारांशीच बोला’.. तेव्हा ‘काकां’नी घाईघाईनं हात झटकत स्पष्टपणे सांगून टाकलं, ‘छे. छे. मी नाही बोलणार त्यांच्याशी !’ खरंतर आजपावेतो ‘थोरल्या काकां’च्या मनातले भाव अन् चेहऱ्यावरच्या रेषा कधीच न उमगलेल्या; मात्र ही तीव्र प्रतिक्रिया साऱ्यांनाच समजली. निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. रडारवर ‘देशमुख जोडी’ असेल, मात्र खरा अटॅक ‘शिंदे टीम’वरच होणार, हेही अनेकांनी ओळखलं. या साऱ्या पार्श्वभुमीवर ‘प्रणितीताईं’ची आगामी भूमिका काय असू शकते, हेही महत्वाचं.सध्या ‘हात’वाल्यांचं ‘सुशील भवन’ खूप डिस्टर्ब. तिकडं ‘पटोले नानां’नी ‘धवलदादां’चं नाव जिल्ह्यात परस्पर जाहीर केलेलं. ‘प्रकाशअण्णां’नाच शहरात सेट होऊ देण्यासाठी उमरग्याचे ‘बसवराज’ही पुढं सरसावलेले. त्यापायी बिचाऱ्या ‘चेतनभाऊं’चा पत्ता कट झालेला. हे दोन धक्के कमी पडले की काय म्हणून थेट सेवादलाचं प्रदेशाध्यक्षपद ‘चाकोतें’च्या ‘सुदीप’नी पटकाविलेलं. गुलबर्ग्यातल्या मामाच्या लॉबीतून त्यांनी म्हणे हे पद मिळविलेलं. त्यांची निवड जाहीर होईपर्यंत कुणालाच काही ठावूकही नव्हतं. आता तर त्याहीपुढं जाऊन अजून एक ब्रेकिंग न्यूज. ‘शहर उत्तर’च्या तयारीला ते गुपचूपपणे कामाला लागलेत. वरून फुल्ल सपोर्ट मिळालाय म्हणे त्यांना. एकीकडं विश्वासात न घेता मोठे निर्णय परस्पर घेतले जाताहेत. दुसरीकडं कैक जुने सहकारी सोडून चाललेत. मात्र अशा परिस्थितीतही ‘प्रणितीताई’ अत्यंत शांत. स्थिर. अचल. ‘जोपर्यंत थेट जनता आपल्या सोबत आहे, तोपर्यंत भीती नाही कुणाचीच. गरज नाही कुणाचीच,’ ही त्यांची आक्रमक स्ट्रॅटेजी ऐकायला छान वाटते, पहायला भारी वाटते. मात्र आजूबाजूला ‘विश्वासघातकी’ वाढू लागले तर कधी-कधी ‘आत्मघातकी’ही ठरू शकते. याचा दोनवेळा दाहक अनुभव ‘पिताश्रीं’नी घेतलाय, म्हणूनच ‘राधाश्री’ भेट त्या नक्कीच लाईटली घेणार नाहीत, याची शंभर टक्के खात्री.
टीप : ‘वंचित’पासून ‘वंचित’ झालेले नेते ‘थोरल्या काकां’च्या दौऱ्यात कुठं दिसलेच नाहीत. सोशल मीडियावर ना कुठल्या व्हिडिओंचा मारा, ना कुठल्या फोटोंचा धडाका. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांनाच प्रश्न पडला असावा. एकवेळ ‘बारामतीकरां’च्या तंबूत ‘चंदनशिवें’ना जवळ केलं जाईल, मात्र ‘घड्याळ’वाल्या ‘आनंददादां’ना बुधवारपेठेतली मंडळी सहजपणे स्वीकारतील का ? लगाव बत्ती...
जाता-जाता : ‘हात’वाल्यांपासून दूर गेलेल्या ‘महेशअण्णां’च्या बंगल्यात आजही ‘सुशीलकुमारां’चा फोटो. आतातर त्याला लागूनच ‘अजितदादां’चीही नवीकोरी फ्रेम. या दोन फोटोंच्या साक्षीनं ‘थोरल्या काकां’ची छबी असलेलं सोलापुरी वस्त्रही बंगल्यात झळकलं. हे पाहून ‘धनुष्यबाण’वाल्या ‘बरडें’नी म्हणे ‘कमळ’वाल्या ‘देशमुखां’ना चिडून कॉल केला, ‘या बंगल्यात आमच्या उद्धो सरकारांचाही फोटो अण्णांनी लावायला पाहिजे होता कीऽऽ’ त्यावर तिकडून गालातल्या गालात हसत ‘देशमुख’ म्हणाले, ‘दोन वर्षांपूर्वी इलेक्शनमध्ये युती झाली नसती तर ते कमळ घेऊन उभारले असते. आमच्या मोदी-फडणवीसांचाच फोटो या बंगल्यात दिसला असता. जाऊ द्या सोडाऽऽ’ लगाव बत्ती..