- वप्पाला बालचंद्रन(माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय)
१२ ऑक्टोबर २००७ रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या मुंबई चॅप्टरमध्ये मी एक व्याख्यान दिले होते. ‘माहिती क्षेत्रातील क्रांती आणि इंटरनेटमुळे निर्माण झालेले अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न’ असा त्या व्याख्यानाचा विषय होता. इंटरनेट येण्याच्या आधीच्या काळात एमटीएनएल किंवा बीएसएनएल यांची दळणवळण क्षेत्रात मक्तेदारी होती. सर्व येणारे आणि जाणारे दूरध्वनी हे ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्विसद्वारे नियंत्रित केले जात. त्यामुळे एखादा फसवा कॉल कुठून आला, हे शोधता येत असे आणि गुन्हेगारही सापडत असे.
इंटरनेटने हे सगळे बदलून टाकले. संवादाचे नवे जग अतिशय सोपे सुलभ झाले. २६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांनी ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’चा वापर करून त्यांच्या हालचालीच्या जागा लपवल्या होत्या. अलीकडे खोटे फोन करणाऱ्यांकडून इमेल किंवा मेटा आणि एक्ससारख्या समाजमाध्यमांचा खुलेआम वापर होतो. त्यातून लोकांची दिशाभूल होते. पैसे हडपले जातात. विमानसेवांचे वेळापत्रक बिघडते. अशा प्रकारच्या घटना एकत्रित करून अभ्यास केला, तेव्हा लक्षात आले की, यावर्षीच्या मे आणि ऑक्टोबर महिन्यात विमान कंपन्यांना जास्तीत जास्त फोन / मेसेजेस केले गेले. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने या माहितीचे विश्लेषण केले का, कल्पना नाही.
चाचा नेहरू हॉस्पिटलला धमकीचा फोन आला. ३० एप्रिलपासून अशा प्रकारच्या खोट्या फोनची मालिका सुरू झाली, अशी बातमी दिल्लीच्या एका वृत्तपत्राने २३ मे रोजी दिली आहे. त्यानंतर दिल्लीतल्या सुमारे दीडशे शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल आले. दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने हे ई-मेल रशिया किंवा ‘डार्क वेब’मधून आल्याचे हुडकून काढले. अशाच प्रकारची धमकी अहमदाबादमधील ३६ शाळांना देण्यात आली. यावेळी ई-मेल्स पाकिस्तानातून आले होते. १२ मे रोजी २० हॉस्पिटल्स, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या दिल्लीतील सीपीआरओ कार्यालयाला सायप्रस मधल्या मेलिंग सर्विस कंपनीतून बॉम्बच्या धमकीचे मेल आले.
मे महिन्याच्या उत्तरार्धात बंगळुरूमधील हॉस्पिटल्सना असे ई-मेल यायला सुरुवात झाली. १४ मे रोजी २००८ साली जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांना सोळा वर्षे पूर्ण होत असताना जयपूरच्या ५५ शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोहोचली. त्याचप्रमाणे तिहार कारागृह, चेन्नई विमानतळ, मुंबईचे ताज पॅलेस हॉटेल, तेलंगणा मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, बंगळुरूमधील केंपेगोडा विमानतळालाही अशा धमक्या मिळाल्या. ३१ मे रोजी शेवटची धमकी आली. त्यामुळे दिल्ली - वाराणसी विमान उड्डाण लांबले. विमानाच्या प्रसाधनगृहात ‘५:३० वाजता बॉम्बस्फोट’ असे लिहिलेला एक कागद सापडला. जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधूनमधून अशा धमक्यांचे फोन आले. ऑक्टोबरमध्ये त्यांची संख्या खूपच वाढून २३ ऑक्टोबरपर्यंत जवळपास दीडशे विमानांचे उड्डाण लांबले. त्यात ४१ आंतरराष्ट्रीय विमाने होती.
डझनभर धमक्या ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’कडेच आल्या होत्या. इंडिगोच्या २६ विमानांना, अक्साच्या वीस विमानांना या धमक्यांचा त्रास सहन करावा लागला. विस्ताराच्या एकोणीस विमानांचे उड्डाण लांबले. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अकरा विमानांना झळ पोचली. त्याचप्रमाणे एअर इंडिया आणि स्पाइस जेटच्या प्रत्येकी सहा विमानांना उपद्रव झाला. या सर्व घटना पाहता, असे दिसते की, भारतविरोधी शक्ती आपल्या प्रत्येक क्षेत्रात घबराट पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या अशा धमक्या कोठून येतात, हे शोधण्याचे काम नागरी उड्डयन मंत्रालयावर सोपवण्यात आले आहे. ते पुरेसे नाही. धमक्यांचे फोन करणे, हा दखलपात्र गुन्हा झाला पाहिजे. असे उद्योग करणाऱ्यांना केवळ विमान प्रवासाला मज्जाव करून भागणार नाही. गृहमंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाने सायबर सुरक्षा क्षेत्रातील गुप्तचरांची विशेष मदत घेतली पाहिजे. जेणेकरून खोटे फोन कोठून येतात हे निरंतर शोधले जाईल.