प्रल्हाद जाधव - एखादा प्रश्न जर पुन:पुन्हा पडत असेल तर त्याचं उत्तर पुन:पुन्हा शोधण्याचा प्रयत्न माणूस करत असतो. देव आहे की नाही, हा असाच एक सनातन प्रश्न! त्याचं उत्तर शोधण्यासाठी जगभर माणसं सतत प्रयत्न करत असतात. कर्मठ धर्ममार्तंडापासून ते मोकळ्या विचारांच्या आध्यात्मिक गुरुंपर्यंत आणि कवी-लेखकांपासून ते चित्रकार-संगीतकारांपर्यंत अनेकजण आपापल्या माध्यमातून सदैव देवाचा शोध घेताना दिसतात. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गजही यासंबंधीचं आपलं नवनवं संशोधन अधूनमधून जगासमोर आणण्यात धन्यता मानतात. ज्याला हवा त्याच्यासाठी देव आहे; नको त्याच्यासाठी नाही, असं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. किती छान उत्तर आहे हे! ते स्वत: देव मानायचे की नाही याचं उत्तरही त्यांनी ‘गाभारा’ या कवितेद्वारे दिलेलं आहे. ते म्हणतात, ‘दर्शनासाठी आलात -- या पण गाभाऱ्यात देव नाही. याचा अर्थ देव आहे, पण तो देवळात नसून देवळाच्या बाहेर आहे. देवापेक्षा देवळाचं माहात्म ज्यांना अधिक वाटतं, त्यांना आपल्या औपरोधिक शैलीत चार खडे बोलही कुसुमाग्रजांनी सुनावले आहेत. ते म्हणतात, ‘घ्यायचं असेल त्यांनी गाभाऱ्याचंही दर्शन घ्यायला हरकत नाही-गाभारा सलामत तो देव पचास’! देव देवळात नाही मग कोठे गेला आहे, तर सकाळी सकाळी एका महारोग्यानं त्याचा धावा केल्यामुळं तो महारोग्यांच्या वस्तीत मदतकार्यासाठी गेला आहे, असंही पुढं कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे. माणसानं महारोग जरी नियंत्रणात आणला असता तरी अज्ञान, दारिद्र्य आणि माणसाच्या चमत्कारी वर्तनाचे दर्शन घडवणारे अनेक रोग आज आपल्याला भेडसावत आहेत त्याचं काय? देवाची गरज तिकडे अधिक आहे म्हणून तो देवळातून बाहेर पडला आहे.पु. ल. देशपांडे यांनी कधी देव-देव केल्याचं आढळत नाही. नाटकाचा पडदा उघण्यापूर्वी नारळसुद्धा ते कधी स्वत: फोडत नसत. त्यांचा नमस्कार मूर्तीपेक्षा शिल्पकाराच्या प्रतिभेला असायचा. देव आपल्या हृदयातच असताना त्याला बाहेर शोधण्याचा खुळेपणा आपण का करावा, असा प्रश्न विचारणारं मंगेश पाडगावकरांचं गीतही घरोघरी पाठ आहे. देव बालमुखातून बोलतो, पिकांतून डोलतो, कधी भिकारी होऊन अन्नासाठी आपल्या साद घालतो--तो आपल्याला का दिसत नाही असा प्रश्न त्यांनी साऱ्यांनाच केला आहे. असा देव आपल्याला शोधता आला आणि त्याच्या कामात आपण हातभार लावला तर माणसाचं जगणं किती सुंदर होऊन जाईल!
देवा तुला शोधू कुठे?
By admin | Published: January 15, 2015 2:52 AM