- अच्युत गोडबोले, ख्यातनाम लेखक, सहलेखिका-आसावरी निफाडकर
माणसाला अंतराळातलं जग कायमच खुणावत आलंय. जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीनं जरी आपण विश्वाच्या उत्पत्तीजवळ येऊन पोहोचलो असलो तरीही दुसऱ्या ग्रहावर पृथ्वीसारखी जीवसृष्टी शोधण्याची तसंच अंतराळात वास्तव्य करण्याची किमया आपल्याला अजून तरी साधता आलेली नाही. हे स्वप्न ओळखून अनेक कंपन्यांनी चंद्रावरच्या जागा विकायला आणि लोकांनी चक्क विकत घ्यायला सुरुवात केली आहे.
१९६१मध्ये सोव्हिएत रशियाचा युरी गागारीन अवकाशात जाणारा पहिला माणूस ठरला. १९६९ साली नील आर्मस्ट्राँगनं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. १९९८ साली ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS)’ (म्हणजेच अवकाशातली प्रयोगशाळा) पृथ्वीच्या ४०८ किमीच्या कक्षेत सोडण्यात आलं. इथे एका वेळी ३-६ लोक आणि क्वचितप्रसंगी १२-१३ लोकही थांबू शकतात. पण भविष्यात अंतराळात हजारो लोक एकत्र राहू शकतील, अशा मोहिमांसाठी आता जग सज्ज झालेलं आहे.
अंतराळात वस्ती करण्याची योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इलॉन मस्क, जेफ बेझॉस, रिचर्ड ब्रॅन्सन यांच्यासारखे अब्जाधीश पुढे येताहेत. १९७६ साली अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ गेराल्ड के. ओनील यानं अवकाशातल्या वस्तीसाठी एका सिलिंडरची कल्पना मांडली होती. ॲमॅझोनचा मालक जेफ बेझॉसनं आता ओनीलची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘ओनील’ नावाचा प्रकल्पच हाती घेतलाय. अवकाशात वसाहत करण्यासाठी ६.५ कि. मी. व्यासाचा तसंच २६ किमी लांबीचा एक सिलिंडर बनवला जाईल. चंद्रावर मोठ्या प्रमाणात सिलिका आणि अल्युमिनियम यांचे साठे आहेत. त्यामुळे हा सिलिंडर बनवायला लागणारी खनिजंही चंद्रावर किंवा लघुग्रहावर खाणकाम करून मिळवली जातील. भविष्यात ग्रहांवर खाणकाम मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता दाट आहे.
या सिलिंडरच्या आत काय असेल म्हणून विचारू नका !! मानवनिर्मित डोंगर असेल, दऱ्या असतील, जंगलं असतील. शेती असेल, हवेत उडणारी वाहनंही असतील, अत्याधुनिक तंत्रज्ञानानं हे ठिकाण गजबजून गेलेलं असेल. यात छोटी पृथ्वीच तयार केली जाईल. जवळपास १ लाख कोटी लोकांना सामावून घेऊ शकेल इतका मोठा सिलिंडर बनवण्याची इच्छा जेफ बेझॉस बाळगून आहेत, तर भारतीय मूळ असलेली कल्पना चावला हिच्या नावानं असलेला ‘कल्पना वन’ हा प्रोजेक्ट ५००० लोकांना सामावून घेऊ शकेल. कमी-अधिक प्रमाणात सगळ्या प्रोजेक्ट्सची डिझाइन्स एकसारखीच आहेत.
हे स्वप्न साकार होण्यासाठी आधी प्रत्येक ग्रहांचा नीट अभ्यास करून येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधावे लागतील. उदा. चंद्रावर दिवसा साधारणपणे १२० अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं आणि रात्री ते उणे ११७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरतं; मंगळावरचं वातावरण तर कायमच थंड असतं. तिथे उणे ४९ अंश सेल्सिअस ते २३ अंश सेल्सिअस तापमान असतं. गुरुच्या ‘युरोपा’ या चंद्रावर अतिशय थंड म्हणजे जवळपास उणे १८४ अंश सेल्सिअस एवढं तापमान असतं. याव्यतिरिक्तही मानवी वसाहतीसाठी अनेक बाबींचा विचार करावा लागेल. उदा. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण; पाण्याची आणि इतर मूलभूत स्त्रोतांची उपलब्धता; त्याचबरोबर रेडिएशन्ससारख्या अनेक घातक हल्ल्यांचे धोके अशा सगळ्यांचाच अभ्यास करून त्यावर उपाय शोधण्याची गरज असेल. अवकाशात सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे सूक्ष्मगुरुत्त्वाकर्षणाचं!
फिरणाऱ्या सिलिंडरनं गुरुत्त्वाकर्षण निर्माण करू शकलो तरी सतत फिरणाऱ्या या यंत्रानं मोशन सिकनेसची नवी समस्या उभी होते. आपल्या शरीराची मूळ रचनाच पृथ्वीवरच्या गुरुत्त्वाकर्षणासाठी तयार झालेली आहे, खूप काळ अंतराळात राहिल्यानं ‘ओर्थोस्टॅटिक इन्टॉलरन्स’चा आजार होऊ शकतो. कॉस्मिक रेडिएशनमुळे रक्त तसंच त्वचेच्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर इमारतीतला पूर्ण परिसर निर्जंतूक ठेवणं आणि अवकाशातल्या कचऱ्यापासून आणि लघुग्रहांच्या माऱ्यापासून इमारतीचा बचाव करणं, ही दोन आव्हानंही संशोधकांसमोर आहेत.
परग्रहांवर बांधकाम करणार कसं ? पृथ्वीवर असतात तसे ट्रक्स काही तिथे नेता येणार नाहीत. रोबॉट्स आणि रोव्हर्स यांच्या मदतीनं बांधकामं होऊ शकतील आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही सुरू झालं आहे. ग्रहांवरच खाणकाम करून बांधकाम साहित्य मिळवता येऊ शकेल का ? यावर आता मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. २०१९ साली नासानं कमीत कमी मानवी हस्तक्षेपाशिवाय मंगळावर घरं बांधू शकणारा ‘3D प्रिंटर’ तयार करण्याची स्पर्धा घेतली. घरांच्या प्रत्येक भागाचा पुनर्वापर होऊ शकेल किंवा त्यांची नैसर्गिकरीत्या विल्हेवाट लावता येईल, अशा प्रकारची घरे तयार करावीत, अशा नासाच्या अनेक अटी होत्या. ही स्पर्धा इलॉन मस्कच्या ‘AI स्पेस फॅक्टरी’नं जिंकली होती.
२०६० सालापर्यंत आपण मंगळावर वसाहत करू शकू, असा तज्ज्ञांचा दावा आहे. या घरांचा आकार, तिथला उजेड, पाणी, वाहनं.. पृथ्वीवर असतात तशा अनेक सुविधा येथे कशा देता येतील, याचाही विचार केला गेला आहे. काही दशकातच आपल्या पुढच्या पिढ्या अवकाशात वस्ती करून राहायला लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"