कालपर्यंत एकमेकांच्या जीवाला जीव देणारे लोक, एकदम एकमेकांचा जीव घेण्याइतपत क्रूर का होऊ लागले? ज्या महिलेसोबत पाच-सहा वर्ष एकत्र संसार केला तिचे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंतची निष्ठुरता मानवी मनात येते तरी कुठून...? बायको नांदायला येत नाही म्हणून नवरा तिचे डोके पोलिस ठाण्याच्या परिसरातच भिंतीवर आपटतो.. आईला मारहाण करणाऱ्या वडिलांना पोटचा मुलगा चाकूने भोसकून ठार मारतो प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचे धाडस बाई करू शकते.... हे सारे येते कुठून...? मन आणि बुद्धी सुन्न करणाऱ्या या घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडत आहेत. पालघरमधील श्रद्धा वालकर या मुलीचा तिच्या प्रियकराने ज्या पद्धतीने खून केला, त्यापासून प्रेरणा घेऊन आपण ज्या महिलेसोबत सहा वर्षे संसार केला तिचे तुकडे केले. त्यातील काही तुकडे कुत्र्याला खाऊ घातले, असे सांगण्याची हिंमत एका पुरुषाकडे येते तरी कुठून..?
सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण कुठल्याही सुसंस्कृत माणसाला कमालीचे अस्वस्थ करणारे आहे. इतकी महाभयंकर अस्वस्थता महाराष्ट्रात याआधी कधी नव्हती. महाराष्ट्राचा सर्वसाधारण स्वभाव प्रागतिक आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा! गुन्हेगारी जग इथेही होतेच; पण सर्वसामान्यांची घरे पापभिरू आता त्याच घरांमध्ये हे चाकू- सुरे कुठून शिरले असतील? हा असा इतका क्रूर महाराष्ट्र कधी नव्हता. उजाडणारा प्रत्येक दिवस नवी क्रूर घटना घेऊन समोर येतो. मीरा रोडला घडलेल्या घटनेत आरोपीने महिलेचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये शिजवले. मिक्सरमधून बारीक केले आणि ते गटारावाटे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. क्रूरतेची सीमा यापेक्षा वेगळी असू शकत नाही. या मानसिकतेत माणसं येतात तरी कशी? आणखी एक घटना मुंबईत भांडुप भागात घडली आहे. नुकत्याच जन्माला आलेल्या तान्ह्या बाळांचे रडणे सहन होत नाही, म्हणून त्यांच्या तोंडात चोखणी देऊन तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा अमानुष प्रकार महापालिकेच्या दवाखान्यात घडला आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण प्रचंड गढूळ झाले आहे. याला प्रत्येक जण जबाबदार आहे. या सर्वात कहर सोशल मीडियाने केला आहे. प्रत्येक गोष्टीत व्यक्त होण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्याच्या थाटात, कोणीही उठतो, कोणत्याही गोष्टीवर वाटेल ते बोलतो. व्हॉट्सअॅप, फेसबुकवर येणाऱ्या गोष्टीची कसलीही शहानिशा न करता लोक ते खरे मानू लागतात आणि सामाजिक स्वास्थ्य खराब करण्यात हातभार लावतात. प्रत्येक शहरात कमी जास्त प्रमाणात हे सुरू आहे. हे थांबवण्याची जबाबदारी त्या त्या शहरातील विचारी लोकांची आहे.
काही वर्षांपूर्वी लोक सहकुटुंब नाटक, सिनेमा बघायचे. संगीताच्या कार्यक्रमाला आवर्जून जायचे. व्याख्यानमाला घडायच्या. त्यावर चर्चा होत असे. या गोष्टी हळूहळू लुप्त होत जातील की काय, अशी भीती वाटण्याइतपत परिस्थिती गंभीर झाली आहे. कोणत्याही शहराचे सामाजिक वातावरण त्या त्या शहरात होणाऱ्या साहित्य, कला संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमांमुळे टिकून राहत •असते. असे कार्यक्रम आता जवळपास प्रत्येक शहरातून हद्दपार होत आहेत. लोकांची सहनशीलता संपल्यात जमा आहे. दोन व्यक्तींचे भांडण झाल्यानंतर ते शांत होण्यासाठीची जी 'ब्रीदिंग स्पेस' लागते ती सोशल मीडियाने पूर्णपणे संपवून टाकली.
उतावीळपणाने टोक गाठले की त्याचे रूपांतर हिंसेत होते. माणसाने माणसाला समजून घेण्याची प्रक्रिया समाजमाध्यमांनी संपवून टाकली आहे. फेसबुक, ट्रिटर अशा माध्यमातून आपण व्यक्त झालो की आपली जबाबदारी संपली, असे म्हणून आपण लगेच व्यक्त होण्यासाठी दुसरा विषय शोधू लागतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत बोलायचे असते, मात्र ऐकायचे कोणाचेच नसते या अशा वागण्याने आपण एका भयंकर जगाकडे निघालो आहोत.
समाजप्रमुख आणि राज्यकर्त्यानी या अशा अवस्थेकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून बघितले पाहिजे. वेळीच या गोष्टींवर आपण गंभीरपणे तोडगे काढले नाहीत, तर हे अध:पतन टोकाला जाईल. उंच डोंगराच्या टोकावरून एखादा भला मोठा दगड खाली सुटला तर तो खाली कसा येईल, हे कोणालाही सांगता येत नाही. तो ज्या गतीने खाली येतो, त्याच गतीने तो आजूबाजूच्या गोष्टी नष्ट करत येतो. समाजाचे अध: पतन त्याच गतीने होताना दिसत आहे. हे थांबवायची जबाबदारी समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे.