- पद्माकर उखळीकर, परभणी
अलीकडे अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडताहेत. कुठे गेली ती आपुलकी, कुठे गेली ती बांधिलकी, बंधुभाव आणि एकमेकांसाठी जिवाला जीव देणारी भावना? राजकीय लाभापोटी देशातील सलोखा बिघडवण्याचे काम काही प्रवृत्ती करत असतात. देशातील नागरिकांवर स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. कुठलाही एकच विचार सर्वांनी मान्य करावा ही कुठली लोकशाही? फोडा आणि राज्य करा हा विचार रूढ होत आहे आणि याला काही सनातनी विचारांतून दुजोरा मिळत आहे.
लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला त्या त्या विचारसरणीचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. पण याचा अर्थ कोणाला काहीही करण्याला कसंही वागण्याला मोकळीक आहे, असं नव्हे.
महाराष्ट्राने ऐक्याचा आदर्श देशाला घालून दिला आहे. पण आता महाराष्ट्राची ओळख दंगलींचा महाराष्ट्र अशी होते की काय याची चिंता वाटते. छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अकोल्यात, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेल्या दोन तीन महिन्यांत दंगली घडल्या तर त्र्यंबकेश्वर येथे कटू प्रसंग होता होता वाचला. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि यातून अकोल्यात वादाला सुरुवात झाली. किरकोळ वादातून हाणामारी झाली व दंगल भडकली. दोन दिवस अकोला शहर धुमसत होते. अकोल्यातील दंगल शमत नाही तोवर नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे दंगलीत रूपांतर होऊन वाहने पेटवली गेली. त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ मे रोजी हिंसाचार झाला. अनेक गाड्या, दुकाने जाळली गेली. सर्वसामान्यांनी मोठ्या कष्टाने, आपल्या घामाने उभारलेली संपत्ती, मिळकत डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होते तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल? कोणत्या प्रसंगांतून ती जात असेल?
अशावेळी जिवंतपणीच ती थोडी थोडी मरत असते. दंगलीत अनेक निष्पापांचे बळी जातात. ज्या गल्लीबोळात, चौकात दंगल पेट घेते, तेव्हा 'पेटवणाऱ्यांचं काहीच जळत नाही. जळते ती भावना, बांधिलकी, आपुलकी, डोळ्यांत तरळणारी आणि आजवर जपलेली सारी स्वप्नं, इथे कुणीही असू शकतं. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, इसाई पण शेवटी तो आहे तर आपल्याच देशाचा नागरिक, आपलाच भाऊ ना। मग, दंगल कुणासाठी?.