शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

अमृतपाल सिंग कुठे आहे? याचा छडा काही दिवसांत लागेलच...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 8:48 AM

इतर काही साथीदार पंजाबमध्ये अटकेत आहेत. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांच्या परवान्याची तपासणी केली जात आहे.

पंजाबमध्ये फुटीरवाद्यांनी घडविलेल्या हिंसाचाराची आठवण करून देणारा खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्ध केंद्र व राज्याच्या पाेलिसांनी उघडलेल्या मोहिमेचे मनापासून स्वागत करायला हवे. गेले चार दिवस पंजाबमधील इंटरनेट व मोबाइल सेवा बंद करून अमृतपालच्या ‘वारिस पंजाब दे’ संघटनेची कंबर तोडण्याची ही कारवाई अजून पूर्ण झालेली नाही. अमृतपाल सिंगला अटक झाली की नाही, याबद्दल बराच संभ्रम आहे. शनिवारी त्याला नाट्यमय पाठलाग करून अटक करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले आणि नंतर रात्री उशिरा तो पोलिसांच्या तावडीतून सुटून फरार झाल्याचे स्पष्टीकरण दिले गेले. त्याच्या चार प्रमुख साथीदारांना मात्र अटक करून आसाममध्ये हलविण्यात आले आहे. इतर काही साथीदार पंजाबमध्ये अटकेत आहेत. त्यांच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शस्त्रांच्या परवान्याची तपासणी केली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे, अमृतपाल सिंगला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची फूस असावी असा संशय असल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणा आता या प्रकरणात उतरणार आहे. राज्य सरकारला सोबत घेऊन केंद्र सरकारने उचललेल्या या पावलांची प्रतीक्षा होती. या विषयावर देशभर व देशाबाहेरही खूप चर्चा झाली. गेल्या फेब्रुवारीच्या शेवटी अमृतसर जिल्ह्यात पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यावर अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीची सुटका करण्यासाठी शस्त्रधारी हजारोंचा जमाव चालून गेला होता. पंजाब पोलिसांची यंत्रणा त्या जमावाच्या दांडगाईपुढे झुकली व त्या आरोपीची दुसऱ्या दिवशी सुटका झाली. त्या जमावात अमृतपाल सिंगच्या ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचे लोक होते. ही संघटना खलिस्तानची मागणी करते आणि आताच्या कारवाईनंतर संशय आहे, की भारताबद्दल आकस असलेल्या पाकिस्तानच्या आयएसआयसह अन्य काही आंतरराष्ट्रीय संघटनांची अमृतपाल सिंग व त्याच्या कारवायांना फूस असावी.

आयएसआयने फुटीरवाद्यांना पंजाबमध्ये अशी फूस देण्याचे हे काही पहिले प्रकरण नाही. तसाही पंजाब प्रांत आपल्या धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी ओळखला जातो. एका प्रमाणाबाहेर दिल्लीचा हस्तक्षेप पंजाबी लोकांना आवडत नाही. त्याचा गैरफायदा अमृतपाल सिंग यांच्यासारखे फुटीर नेते व आयएसआय घेत असतात. तो सक्रिय झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये ड्राेनद्वारे ड्रग टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उजेडात आले आहेत. अमृतपालची संघटना मादक द्रव्याच्या तस्करीत गुंतलेल्यांच्या माध्यमातूनच विस्तार करीत असल्याचेही दिसून आले आहे. तसे नसते तर दुबईमध्ये चुलत्याचा वाहतूक व्यवसाय सांभाळणाऱ्या एका तरुणाला अचानक धर्माची आठवण आली नसती आणि तो कट्टर धार्मिक विचारधारा पुढे नेण्यासाठी हाती शस्त्र घेऊन तयार झाला नसता. थेट पोलिसांवर चालून जाण्याची हिंमत त्याने दाखवली नसती. तो जर्नेलसिंग भिंद्रनवाले याची दुसरी आवृत्ती असल्याचा प्रचारही याच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग असावा. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने अमृतपाल सिंग प्रकरण अधिक गंभीरपणे हाताळण्याचे ठरवलेले दिसते.

अमृतपाल सिंगला अटक झाली असावी आणि त्याचे पडसाद उमटू नयेत यासाठी त्याला अज्ञात स्थळी हलविण्यात आले असावे, असे मानणारा मोठा वर्ग आहे. तथापि, अशा विषयांची जाहीर चर्चा करता येत नाही. सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले व योग्य ती पावले उचलण्यात आली, एवढेच सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे. पंजाबमध्ये फुटीरवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू होताच ब्रिटन तसेच अमेरिकेत भारतीय दुतावासासमोर निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटनमध्ये तिरंगा ध्वजाला हात लावला गेला, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही घटना घडताच राजधानी दिल्लीत भारत सरकारने ब्रिटन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून कडक शब्दात जाब विचारला हे बरे झाले. दहशतवादी हल्ले, विमान अपहरण, ऑपरेशन ब्लू स्टार, इंदिरा गांधींची हत्या, देशभर शीखविरोधी दंगली अशाप्रकारे पंजाबने दिलेल्या जखमांचे व्रण आजही स्मरणात आहेत. त्या प्रकारांची पुनरावृत्ती घडवू शकेल अशा छोट्यामोठ्या हालचालीदेखील गंभीरपणे घेण्याची आणि या विषवल्ली फोफावण्याआधीच उपटून काढण्याची आवश्यकता आहे. अमृतपाल सिंग कुठे आहे, याचा छडा काही दिवसांत लागेलच. तथापि, पंजाबमधील अटकसत्राच्या रूपाने सरकारने सुरुवात केली, हे महत्त्वाचे.

टॅग्स :Punjabपंजाब