जिथे गोंधळ नाही, खेचाखेची नाही ती काँग्रेस कसली?
By अतुल कुलकर्णी | Published: February 9, 2023 10:26 AM2023-02-09T10:26:05+5:302023-02-09T10:29:29+5:30
महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकजूट नाही, सत्ताधाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याची ताकद नाही, एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यातच सारे मश्गुल आहेत!
अतुल कुलकर्णी, संपादक, लोकमत, मुंबई -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला की नाही हे त्यांना माहिती. मात्र, त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे एकमेकांशी असणारे टोकाचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचा पोरकटपणा समोर आला. १३६ वर्षांची परंपरा असलेला पक्ष विधान परिषदेच्या एका जागेसाठी चर्चा करून रणनीती ठरवू शकत नाही. ज्याच्याकडे बघून लोकांना काँग्रेसमध्ये राहावे वाटेल, असा एकही नेता राज्यात नाही. २०१९ च्या विधानसभेत फार वेगळे चित्र नव्हते. काँग्रेसकडे त्याहीवेळी चेहरा नव्हता आणि आज तर प्रत्येकजण नेता आहे. एकजूट नाही, सत्ताधाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याची ताकद नाही. केवळ एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यात सगळे मश्गुल ! काँग्रेसमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याची ही संस्कृती नवी नाही.
नाशिकमध्ये डॉ. सुधीर तांबे किंवा सत्यजित तांबे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार काँग्रेसकडे नव्हता. भाजपने राजेंद्र विखे यांना उमेदवारी दिली तर डॉ. सुधीर तांबे यांना उभे करायचे आणि भाजपाने दुसरा कोणी उमेदवार दिला तर सत्यजित तांबे यांना उभे करायचे, असे अंतर्गतरीत्या ठरले होते. आयत्यावेळी दिल्लीहून डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यातून पुढे जे रामायण घडले ते दिसलेच. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव चेहरा बाळासाहेब थोरात आहेत, ते जे ठरवतील ती पक्षाची भूमिका असेल, असे म्हणून चेंडू थोरात यांच्या कोर्टात टाकता आला असता. मात्र, तसे झाले नाही. पुढे एकमेकांवर चिखलफेक करण्याची स्पर्धा नेत्यांमध्ये लागली. एका कुटुंबाचा, एका जिल्ह्याचा प्रश्न संपूर्ण काँग्रेसचा झाला. पडद्याआड अनेकांनी आपापले हिशोब चुकते करण्याचे प्रयत्नही सुरू केले नसतील तर ती काँग्रेस कसली ?
नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत असेच झाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गंगाधर नाकाडे किंवा राजू झाडे यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यायची होती. तेथे सुनील केदार, विजय वडेट्टीवार आणि राजेंद्र मुळक यांनी सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर करून कामही सुरू केले. पटोले यांचा नाइलाज झाला. अभिजीत वंजारी यांनी झोकून देऊन काम केले. अडबाले विजयी झाले. तो विजय आता नाना आपला असल्याचे सांगतात. मात्र, अभिजीत वंजारी हे बाळासाहेब थोरात यांच्या अत्यंत विश्वासातले! पटोले यांची भूमिका अपरिपक्वपणाची ठरली आणि बाळासाहेब थोरातांचे सोयीस्कर मौन पक्षाच्या नुकसानीचे ठरले. प्रदेशाध्यक्षांनी सगळ्यांना सोबत घेऊन गेले पाहिजे. विदर्भात वजाहत मिर्झा वगळता एकही नेता पटोले यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. कोकणात काँग्रेस औषधालाही शिल्लक नाही. पश्चिम महाराष्ट्रात बंटी पाटील, खान्देशात नंदुरबार, जळगावचे तीन आमदार वगळता काँग्रेसचे अस्तित्व नाही. मराठवाड्यात अशोक चव्हाण, अमित देशमुख हे नेते असल्यामुळे नानांना तिकडे पाठबळ नाही.
‘भारत जोडो’ यात्रेनंतर महाराष्ट्रात काँग्रेसवर ‘नेते जोडो’ आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. दहा नेत्यांची तोंडे दहा दिशांना! एखाद्याकडे नेतृत्व दिले तर बाकीचे पहिल्या दिवसापासून त्या नेत्याचे पाय ओढायला लागतात. पदावर येणारा नेता आधी आपले पक्षांतर्गत विरोधक कसे दूर करता येतील, याच्याच मोहिमा आखत राहतो. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना बाजूला सारले. तरी त्यांना फरक पडला नाही. काँग्रेसचे तसे नाही. तोळा मासा तब्येत झालेल्या काँग्रेसचा एक नेता बाजूला करावा तर त्याच्या जागी कोण ? असा प्रश्न पडावा इतकी विदारक स्थिती आहे. तरुणांना कोणी पक्षात येऊ देत नाही. त्यांना जबाबदाऱ्या देत नाही. ज्येष्ठ नेते स्वार्थापलीकडे विचार करायला तयार नाहीत.
गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात झाले, ते सर्व प्रकरण आता दिल्ली दरबारी गेले आहे. दिल्लीने प्रदेशाध्यक्ष बदलला तर विदर्भातून एकाची त्याजागी वर्णी लागू शकते. विदर्भातल्या नेत्यांना हा बदल हवाच आहे. पक्षाचे प्रभारी बदलले तर एच. के. पाटील यांनाही हवे आहे. कारण त्यांना त्यांच्या राज्यात निवडणूक लढवायची आहे. त्यांना महाराष्ट्रात फारसा रस नाही. विधिमंडळ पक्षनेत्यात बदल केला तर त्या जागी अशोक चव्हाण, संग्राम थोपटे, अमित देशमुख आणि नाना पटोले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. जिथे गोंधळ नाही, खेचाखेची नाही ती काँग्रेस कसली ?
- हे प्रकार काँग्रेसला नवीन नाहीत; पण मतदार बदलला आहे, हे काँग्रेसला कधी कळणार?- आजही लोक डोळे झाकून हातावरच शिक्के मारतात असे ९० टक्के नेत्यांना वाटते !
atul.kulkarni@lokmat.com