हे काय घडतंय भगवंत?कुरूक्षेत्रात युद्धाला सज्ज झाल्यावरही समोर प्रतिपक्षात आपल्या सगेसोयऱ्यांना पाहून अर्जुनाची जशी दिङ्मूढ स्थिती झाली अगदी तशीच द्विधा अवस्था आमच्या देवेंद्रभाऊंची झालेली...सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाऊंनी प्रतिपक्षाच्या व्यूहरचनेचा भेद करीत आपला रथ रणभूमीच्या केंद्रस्थानी आणला आणि सभोवताल नजर टाकली. तो पालघरचा पट्टा, इकडे भंडारा-गोंदिया, बाजूला अमरावती त्याला लागून चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा. अगदी नाकासमोर नाशिक. पुढे पलुस-कडेगाव. सर्व पट्ट्यात सेना सज्ज.एव्हाना भाऊंनी अर्जुनाच्या भूमिकेत एन्ट्री घेतलेली. समोर उभी ठाकलेली सेना (एकटी शिव नाही). पाहून या अर्जुनाला मग स्फुरण चढले. हाती गदा घेऊन युद्धासाठी तो सज्ज झाला. तेवढ्यात मागून आवाज आला... गदा कसली घेतोस वत्सा, उचल तुझे ते गांडीव आणि साध निशाणा. अर्जुनाने (अर्थात देवेंद्रभाऊंनी) मागे वळून पाहिले. प्रत्यक्षात सारथी नव्हताच. दिल्लीहून हायकमांड रिमोट कंट्रोलने रथाचे सारथ्य करीत होते. या अदृश्य सारथ्यास नमन करून अर्जुन म्हणाला, या युद्धात धनुष्यबाणाची मदत न घेण्याचा प्रण मी केला आहे भगवंत.सारथी : ठीक आहे. वापर तुझे इतर अस्त्र. पण एक लक्षात ठेव... त्या तुझ्या राखीव नारायणास्त्रावर विसंबून राहू नकोस....ठीक आहे असे म्हणून अर्जुनाने प्रतिपक्षाच्या दिशेने कूच केले. पण हे काय...? त्याच्या हातची गदा अचानक गळून पडली. अवसानच गळाले! ज्यांच्या गळ्यात गळा घालून वावरलो, त्यांचेच गळे कापायचे...? पालघरचा तो वनगा काल तर माझा सखा होता ना? आणि तो कोकणी पट्ट्यातला सरदार...त्याला मीच तर खासदारकीच्या गादीवर बसवलं...!नाही...नाही...! यांच्यावर वार करणे मला शक्य नाही. हे धर्मसंगत नाही.(अर्जुन माघार घेतोय हे पाहून त्याला गीता सांगण्याच्या भानगडीत न पडता सारथ्याने त्याचा खरमरीत क्लासच घेतला.)सारथी : हे बघ अर्जुना, तू येथे रणभूमीवर आहेस. संघाच्या चिंतन शिबिरात नाही हे लक्षात घे आणि हे ‘धर्मसंगत’ वगैरे काय बरळतोस...! महाभारतात मी कर्णाला सुनावले तेच तुलाही सुनावतो....त्या वनगाच्या मूत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला वाºयावर सोडले तेव्हा कुठे गेला होता गंगाधरपुत्रा तुझा धर्म?... वनगाला सेनेने हायजॅक केले, त्याला काटशह म्हणून शत्रुपक्षातून तू उमेदवार आणलास... तेव्हा कुठे गेला होता विदर्भपुत्रा तुझा धर्म? कोकणात सेनेवर नारायणास्त्र कोसळेल हे माहीत असतानाही तू गप्प राहिलास तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म...? आणि नाशकात...! सेनेच्या पाठी होता ना तू...मग तो ‘कोकणी’ पिल्ला का सोडलास त्यांच्यावर. तेव्हा नाही आठवला धर्म?आणि एक लक्षात ठेव...! भुजबळ नावाचे रॉकेट कालच लाँच झाले. राष्टÑवादीच्या लाँचपॅडवरून ते उडाले असले तरी कधी मातोश्रीवर विसावेल याचा नेम नाही. २५ वर्षांचा घरोबा होता म्हणे त्यांचा. तेव्हा त्यांची ताकद वाढण्याआधीच होऊन जाऊ दे हर...हर...महादेव.- दिलीप तिखिले
तेव्हा कुठे गेला होता धर्म ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:14 AM