ठाकरेंचे शिंदेंकडे, शिंदेंचे ठाकरेंकडे, दादांचे नेमके जाणार तरी कुठे?
By अतुल कुलकर्णी | Published: April 7, 2024 09:46 AM2024-04-07T09:46:59+5:302024-04-07T09:48:17+5:30
हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणाहून छगन भुजबळ मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
नमस्कार
कोण कोणाकडे, कशासाठी जात आहे, याचा हिशेब ठेवणाऱ्याने या असल्या नोकरीत वर्क लोड खूप आहे, म्हणून नोकरी सोडून दिल्याची बातमी आहे. प्रत्येकाची नोंद ठेवून, संध्याकाळी हिशेब लावताना त्याला वेड लागण्याची पाळी आली होती. एकनाथ शिंदे यांचे १३ खासदार त्यांच्यासह भाजपमध्ये गेले. त्या सगळ्यांना उमेदवारी देतो, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यापैकी ९ ठिकाणी त्यांनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यातील एक नाव मागे घ्यावे लागले. भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने यांच्यावर घरी बसण्याची पाळी आली. गजानन कीर्तिकर यांना तिकीट मिळाले नाही. त्यांच्या मुलाने उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी साथ दिली. त्यामुळे कीर्तिकर हे शिंदेंचा हात सोडून मुलासोबत आहेत.
हेमंत गोडसे यांना उमेदवारी न देता त्या ठिकाणाहून छगन भुजबळ मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत, तर धैर्यशील माने यांचेही नाव बदलले जाईल ही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे १३ आले खरे, पण टिकले किती? याचा हिशेब ठेवताना त्यांची तारांबळ उडाली होती. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करायला एवढे दिवस लागले. सोबत गेलेल्या खासदारांची अवस्था अशी, तर विधानसभेच्या वेळी आपले काय होईल? या भीतीने अनेक आमदारांच्या पोटात गोळे आल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. मध्यंतरी भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले होते, आता मी भाजपमध्ये आहे. त्यामुळे मला शांत झोप लागते, तर नुकतेच भाजपवासी झालेले काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी देखील मला रात्र-रात्र झोप येत नव्हती, त्यामुळे मी भाजपमध्ये आलो, असे सांगितले. धर्म ही अफूची गोळी आहे, असे कार्ल मार्क्स म्हणायचे. मात्र, शांत झोपेची गोळी भाजपमध्ये मिळते, हे कदाचित त्यांना माहिती नसावे. त्यामुळे हल्ली भाजपची गोळी खाल्ली की, अनेकांना शांत झोप लागते, असा अनुभव आहे. आपल्याला आता मातोश्रीमधून शांत झोप लागणाऱ्या गोळ्या मिळतील की नाही, याची शिंदेसेनेतल्या आमदारांना खात्री वाटेना. त्यामुळे काहींनी भाजपच्या दुकानातून झोपेची गोळी घ्यायचे ठरवले, तर आश्चर्य वाटणार नाही. त्यातही काहींनी मधला मार्ग काढल्याचे वृत्त आहे. आपापल्या मतदारसंघातून आपण मातोश्रीमध्ये झोपेच्या चांगल्या गोळ्या मिळतात, असा प्रचार आणि प्रसार करू. एकदा का विश्वास संपादन झाला की, मातोश्रीची एजन्सी घेऊन आपापल्या मतदारसंघात शांत झोपेच्या गोळ्यांचे क्लिनिक थाटू, असेही काहींना वाटत आहे. त्यामुळे अनेक जण शिंदेसेनेत असले, तरी प्रचार उद्धवसेनेचा करतील आणि विधानसभेला आपापल्या मतदारसंघात पुन्हा नव्याने क्लिनिक थाटतील, असे झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
अजित पवार गटाचे बरे आहे. त्यांनी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही खासदार स्वतःसोबत नेले नाहीत, तरीही त्यांना बारामती, धाराशिव, परभणी, शिरूर, रायगड अशा पाच जागा मिळाल्या आहेत. सहावी जागा नाशिकची मिळाल्यातच जमा आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीची जागा जिंकणे एवढी एकच चिंता दादांना आहे. जर बारामतीची जागा जिंकता आली नाही, तर विधानसभेत आपली काय अवस्था होईल? या विचाराने भाजपमध्ये जाऊनही दादांना हल्ली झोप लागत नाही, असे संजय खोडके काही पत्रकारांना सांगत असल्याची चर्चा आहे. खरे-खोटे माहिती नाही, पण जर बारामतीची जागा मिळाली नाही तर काय? या प्रश्नावर दादांच्या गटात जोरदार चर्चा आहे.
या सगळ्या मारामारीत आपापल्या नेत्यांना मानणारे कार्यकर्ते, नेते रोज सकाळी आपल्या शीर्षस्थ नेत्याला फोन करतात... साहेब, आज आपण कोणत्या पक्षात? असे विचारतात. नेत्याने जो पक्ष सांगितला, त्या पक्षाचा स्कार्फ गळ्यात अडकवून हे नेते, कार्यकर्ते प्रचाराला बाहेर पडतात. कालच आमच्या शेजारी स्कार्फ विकणारा गण्या सांगत होता. हल्ली माझ्याकडे सगळ्या पक्षांचे स्कार्फ जोरदार विकत आहेत. त्यामुळे कोणाची हवा आहे ते मी आता सांगू शकणार नाही. कोणाला काय तर कोणाला काय? त्याला विचारले, तुला रे काय एवढा प्रश्न पडतो? तर गण्या म्हणाला, वेगवेगळे सर्व्हे करणारे चॅनलवाले माझ्याकडे येतात. कोणाचे स्कार्फ जास्त विकले गेले असे विचारतात. मी ज्याचे स्कार्फ जास्त विकले गेले असे सांगतो, ते त्याचीच हवा असल्याचा सर्व्हे देतात. हे माहिती झाल्यामुळे काही उमेदवार मला एक्स्ट्रा पैसे देत होते. माझे हे सगळे इन्कम बुडाले. कोणाचे तरी एकाचे स्कार्फ विकले गेले, तर माझा धंदा बरा चालेल, असा गण्याचा त्यावर खुलासा होता.
असो. गण्याचा धंदा हा आपला मूळ विषय नाही. ज्या घाऊक पद्धतीने इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारणे सुरू आहे. त्यावरून काही जुन्या जाणत्या नेत्यांना आपण नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. त्यातील एकाने परवा रात्री थेट महात्मा गांधींना फोन केला. बापू, आम्ही करायचे तरी काय? असे काकुळतीला येऊन विचारले, तेव्हा बापू म्हणाले, ते त्यांच्या उड्या मारताहेत. तू तुझ्या उड्या मारून घे. मी ही हल्ली खूप व्यस्त आहे. तुला काय सल्ला देणार. त्यावर त्या गृहस्थांनी, बापू तुम्ही कशासाठी व्यस्त? असा सवाल केला. एक दीर्घ श्वास सोडून बापू म्हणाले, बाबा रे, निवडणुकीचा काळ आहे. माझ्या फोटोंची छपाई वेगवेगळ्या आकारांच्या कागदावर सुरू आहे. माझे फोटो कसे छापून येतील हे मीच बघायला नको का? दुसरे कोण बघणार? मी सरकारी भिंती आणि छोट्या-मोठ्या कागदांवर उरलो आहे. उद्या जर मला या कागदांवरूनही काढून टाकले, तर मला लक्षात कोण ठेवेल? तेव्हा तुझे तू बघ. यावर माझ्यासारखा सर्वसामान्य पामर काय बोलणार? तुमचे तुम्ही बघा बुवा... बापूंच्या या उत्तरावर निरुत्तर होऊन त्या गृहस्थांनी फोन ठेवला.
तुम्ही काय करणार?
- तुमचाच,
बाबूराव.