काही माणसे कोणत्याही पक्षात असली तरी अस्वस्थच असतात. पक्षातले व सत्तेतले सर्वोच्च स्थान मिळेपर्यंत त्यांच्या जीवाला चैन नसते. नारायण राणे हे तसे नेते आहेत. ते सेनेत असताना अस्वस्थ होते, काँग्रेसमध्येही स्वस्थ नव्हते आणि उद्या ते भाजपात गेले तरी त्यांची अस्वस्थता त्यांची सोबत करणारच आहे. त्यांच्या स्वस्थतेचा एकमेव काळ त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा आहे. सध्या फडणवीस त्यांच्या पदावर ठाम आहेत आणि मोदींसह संघ त्यांच्यामागे ठाम आहे. राण्यांना त्या पक्षात एखादे मंत्रिपद फारतर मिळेल. शिवाय बाहेरून आलेल्यांना संघ परिवार कसा कस्पटासमान वागवतो हेही मग त्यांना कळेल. मी आणि मीच केवळ (फारतर माझी मुले) कर्तबगार आणि बाकीचे सारे वेठबिगार ही वृत्ती ज्यांच्यात असते त्यांना अनुयायी वा सहकारी चालत नाहीत त्यांना नोकरच लागत असतात. राण्यांना ते सेनेत मिळाले नाहीत, काँग्रेसमध्ये मिळाले नाहीत आणि भाजपातही मिळायचे नाहीत. त्यामुळे त्यांनी गटस्थापना केली काय किंवा पक्षांतर केले काय, त्यांचे सध्याचे संतप्त अस्वस्थपण कायमच राहणार आहे. सेनेत त्यांना बाळासाहेब सांभाळत. काँग्रेसमध्ये त्यांना सांभाळणारे कुणी नव्हते. भाजपचे नेते बाहेरच्यांचे फारसे लाड करीत नाहीत. सेनेचे जे मंत्री महाराष्ट्रात किंवा रालोआचे जे भाजपबाह्य मंत्री केंद्रात आहेत त्यांच्याजवळ महत्त्वाची खाती सोडा, पण सांगता येण्याजोगेही काही नाही. एकचालकानुवर्ती म्हणून ओळखल्या जाणा-या संघटनेत दुसरे सारे अनुयायी किंवा आज्ञाधारक असतात. त्या संघटनेला दुसरा आज्ञेकरी चालत नाही आणि राण्यांना आज्ञेखेरीज काही बोलता येत नाही. शिवाय सत्तेत शिरण्यामागे अनेकांचे अनेक हेतू असतात. काहींना त्यांच्या संस्था सांभाळायच्या असतात, काहींना पदे तर काहींना इस्टेटी. त्यातही ज्यांच्या इस्टेटी मोठ्या व सत्तेत आल्यानंतर जमलेल्या असतात त्यांना तसे करणे व्यक्तिगत कारणासाठीही भाग असते. विदर्भातील मेघे आणि देशमुखांपासून मुंबई-पुण्याकडील अनेक काँग्रेसजनांनी भाजपमध्ये शिरण्याची जी घाई एवढ्यात केली तिची कारणे जनतेला कळणारी आहेत. अशा पुढाºयांच्या गर्जनाच तेवढ्या मोठ्या असतात. मात्र त्यांचे पोकळपण त्यांनाही कळले असते. राणे काँग्रेसमधून बाहेर पडले तरी त्या पक्षाच फारसे नुकसान आता व्हायचे नाही आणि ते राहिले तरी त्यांची मदत पक्षाला कधी व्हायची नाही. स्वत:चे व स्वत:साठी राजकारण करणाºया पुढाºयांचा इतरांना फारसा फायदा व्हायचाही नसतो. त्यांच्या भालदार-चोपदारांच्या अंगावर भपकेबाज पोशाख दिसले तरी अखेर ते पुढाºयाचे नुसते अंगरक्षकच असतात. तात्पर्य, राण्यांच्या गटस्थापनेत वा नव्या घटस्थापनेत महत्त्वाचे वाटावे वा दिसावे असे काही असणार नाही. काँग्रेस पक्षाने त्यांचा विचार करून आपले डोके शिणविण्यात त्यामुळे फारसा अर्थ नाही. त्याखेरीज आपले बळ वाढविण्यावर भर द्यावा आणि राण्यांमुळे फडणवीसांची काळजी किती वाढते ते पाहून आपली करमणूकही त्या पक्षाने करून घ्यावी. पक्षांतर हे भारतीय राजकारणाचे गेल्या काही दशकांतले महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. ही पक्षांतरे का होतात आणि कशासाठी ती करवून घेतली जातात हा राजकारणाच्या चांगल्या अध्ययनाचा विषय आहे. काही माणसे विचारांसाठी ते करतात तर बरेच जण कसल्या तरी प्राप्तीसाठी त्याचा अवलंब करतात. त्यातून राण्यांसारखा नेता एकामागोमाग एक पक्ष बदलत असेल आणि सोडलेल्या पक्षावर टीकास्त्र सोडण्याचे काम करीत असेल तर त्याचे पक्षांतर फारसे विचारण्यात घेण्यासारखेदेखील नसते हे येथे नोंदवायचे.
...गटस्थापना केली काय किंवा पक्षांतर केले काय, त्यांचे अस्वस्थपण कायमच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:49 AM