जिल्हा अहमदनगर. दौंड-मनमाड मार्गावर वसलेली एक छोटी वसाहत. नगर बस स्टॅन्डपासून फारतर ६ मैल दूर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली वसाहत. एका बाजूला लहानशी टेकडी आहे. पहिल्या महायुद्धाच्यावेळी या टेकडीवर ब्रिटिशांनी एक पाण्याची टाकी बांधली होती. त्या टाकीमध्येच १९३८ साली मेहेरबाबांनी राहण्याची जागा आणि सभागृह तयार करवून घेतले होते. त्या टाकीमध्ये बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण इमारतीवर आज एक सतरंगा ध्वज फडकताना दिसतो. त्या टेकडीवर मेहेरबाबांची समाधी १९३८ पासून उभी आहे.
‘सेवेतील स्वामित्व’ हे अर्थवाही शब्द समाधीच्या दर्शनी भागावर कोरले आहेत. समाधीच्या चार कोपऱ्यांवर चार मोठ्या धर्मांची प्रतीके दिसतात - मंदिर, मशीद, आग्यारी आणि ख्रिस्ती क्रॉस. आत गेल्यावर माणसाचे मन निःशब्द होते, करुणा आणि प्रसन्नता यांचा मनात उगम होतो आणि भाविक मेहेरबाबांना शरण जातो. “मी शिकवण्याकरिता नव्हे तर जागृत करण्याकरिता आलो आहे” हे समाधीवरचे वाक्य मेहेरबाबांच्या कार्याची दिशा स्पष्ट करते.
या ओसाड, दुर्लक्षित ब्रिटिशकालीन सैन्य वसाहतीमध्ये मेहेरबाबांनी १९२३ च्या ४ मे रोजी म्हणजे बरोबर १०० वर्षांपूर्वी प्रवेश केला आणि या क्षेत्राचा कायापालट झाला. हाकेच्या अंतरावर असलेल्या अरणगावामध्ये बहुतांशी गोरगरीब, मागासलेल्या कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची वस्ती होती. त्यांच्या शुश्रूषेसाठी आणि शिक्षणासाठी मेहेरबाबांनी पहिली काही वर्षे खर्च केली. अंत्योदयाची मुहूर्तमेढ रचली. शाळा आणि दवाखाना सर्वांसाठी विनामूल्य सेवा देत. तेथे जाती-धर्माचा भेद नव्हता. स्वतःच्या देखरेखीत या शाळेतील मुलांना शिक्षण दिले आणि त्याचबरोबर सर्व धर्मांचे अंतिम ध्येय एकच आहे हे बिंबवले. त्यांनी स्वतः लिहिलेली ‘हरी, परमात्मा, अल्ला, अहुर्मझद, गॉड, यझदान, हू’ ही प्रार्थना तेथील मुले रोज ताला-सुरात म्हणत असत. शाळेला त्यांनी आपल्या गुरूचे नाव दिले ‘हजरत बाबाजान संकुल’ आणि त्यातल्या आध्यात्मिक शिकवणीच्या वर्गाला नाव दिले ‘प्रेमाश्रम’.
१९२५-२६ मध्ये मेहेराबाद येथे, मेहेरबाबांनी रस्त्यालगतच एक टेबलवजा पिंजरा करून घेतला आणि त्यात बसून आध्यात्मिक गाथेची निर्मिती केली, ज्यात अनेक आध्यात्मिक रहस्यांचा उलगडा त्यांनी केला. हे हस्तलिखित आज गुप्त असले तरी, याच विषयावरील त्यांचा गॉड स्पीक्स हा ग्रंथ आज देशी-विदेशी अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध आहे.
१९२५ साली १० जुलैला येथूनच मेहेरबाबांनी आपल्या महामौनाला सुरुवात केली. जे मौन त्यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरपर्यंत अबाधित ठेवले. आज मानवाला शब्दांच्या माध्यमातून दिलेल्या उपदेशाची जरूर नसून मानवाचे हृदयापासून परिवर्तन जरुरी आहे, आणि हे आमूलाग्र परिवर्तनच मानवाला फसव्या मायाजालातून जागृत करू शकेल आणि व्यक्ती-व्यक्तीतील द्वेष, दुरावा दूर होऊन त्यांच्यात परस्पर प्रेमाचा संचार करेल, हा त्यांचा मौन संदेश होता.
१९३० च्या दशकामध्ये मेहेरबाबांनी जगप्रवास सुरू केला. जगभरात विविध ठिकाणी जाऊन लोकमानसात परमेश्वरी प्रेमाचे बीजारोपण केले. पाश्चिमात्य संस्कृती भौतिक विज्ञानात प्रगत असली तरी तिच्यात असलेली माणुसकीची आणि आध्यात्मिकतेची उणीव त्यांनी भरून काढली. १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी मेहेरबाद येथे मस्त मौलांसाठी (जे परमेश्वरी प्रेमात आपली सामान्य जाणीव हरवून बसतात) आश्रम काढला आणि पुढील पंधरा वर्षे संपूर्ण भारतीय उपखंडात हजारो मैल प्रवास करून या मस्त मौलांचा उद्धार केला.
जगभर कोठेही गेले तरी मेहेरबाबा मेहेरबादलाच परत येत असत आणि १९४४ पर्यंत हेच त्यांचे प्रमुख वास्तव्य होते. ३१ जानेवारी १९६९ ला मेहेरबाबांनी देहत्याग केला. त्यांचा देह त्यांच्या समाधीत सुपूर्द केला गेला. मेहेरबाबांच्या अमरतिथीच्या उत्सवासाठी जगभरातून येणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांची गर्दी वाढते आहे. मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन आणि तिथे अजूनही जाणवणारा मेहेरबाबांचा अमृतमय सहवास ही एक विलक्षण अनुभूती आहे.
- मोहन खेर, पुणे