निसर्गातील काही अनोख्या गोष्टी महाराष्ट्र बाळगून आहे. त्यापैकी एक म्हणजे इथल्या ८० टक्क्यांहून अधिक प्रदेशावर आढळणारा ज्वालामुखीजन्य खडक. त्याची अनेक भूरूपे, स्फटिके ही या भूमिची ओळख ठरली आहेत. तसेच, काही गोष्टी कुतूहल म्हणून लोकांच्या मनात वास करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर आढळणारी विविधरंगी माती. या पठाराचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी इथेच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यामुळे किल्ल्यांवर, डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणाऱ्यांसाठी हे पठार महत्त्वाचे. या मातीमुळे ते अलीकडे विशेष आकर्षण ठरले आहे. त्यामागील नेमकी पर्यावरणीय, भूवैज्ञानिक कारणे लोकांपुढे यावीत म्हणून ‘भवताल’ या गटाने या रंगीत मातीचे रहस्य उलगडण्याचे ठरवले. त्यासाठी ‘भवताल’ची सहा जणांची टीम ९ व १० एप्रिल २०२२ रोजी प्रत्यक्ष पठारावर गेली. त्यात माझ्यासह ज्येष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विद्याधर बोरकर व डॉ. कांतिमती कुलकर्णी, तसेच पुष्कर चेडे, वनिता पंडित, वैभव जगताप हे ‘भवताल’चे कार्यकर्ते होते. रायरेश्वरावरील माती मिळणाऱ्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले. तेथील १० रंगछटांच्या मातीचे नमुने तंत्रशुद्ध पद्धतीने गोळा केले गेले. या नमुन्यांचे रंग होते - १. लालसर, २. फिकट तपकिरी, ३. फिकट गुलाबी, ४. फिकट जांभळा, ५. व ६. दोन वेगवेगळ्या पिवळसर छटा, ७. गडद शेवाळी, ८. पिवळसर शेवाळी, ९. पिस्ता, १०. दुधी. या मातीचे रासायनिक पृथ:करण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या रसायनविज्ञान (केमिस्ट्री) विभागात करण्यात आले. मातीचे रासायनिक पृथ:करण तसेच, पठाराची भूवैज्ञानिक रचना यावरून काही महत्त्वाचे निष्कर्ष हाती आले आहेत.
बहुसंख्य नमुन्यांमध्ये ऑक्साईडच्या स्वरूपातील लोहाचे अस्तित्व आढळले. त्यामुळे तेथील मातीला लाल, पिवळा व फिकट तपकिरी रंग आले आहेत. परंपरागतरित्या घरांच्या भिंती, मातीची भांडी रंगवण्यासाठी पिवळी किंवा गेरू याचा वापर केला जातो. प्राचीन लेणी, गुहांमधील भित्तीचित्रे रंगवण्यासाठीही अशा रंगांचा वापर करण्यात आला. रायरेश्वरवर सर्वसाधारणपणे सात रंगांची माती असल्याचे मानले जाते. लाल, पिवळा, तपकिरी यांच्याशिवाय इतरही रंग आहेत. आमच्या अभ्यासाचा निष्कर्ष असे सांगतो की, या मातीमध्ये लोहाच्या ऑक्साईडच्या जोडीने ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, मँगेनीज या धातूंची काही संयुगे अल्प प्रमाणात आहेत. त्यांच्यामुळे मातीला इतर रंगही प्राप्त झाले आहेत. (उदा. मँगेनीजमुळे जांभळा रंग, वगैरे.) रायरेश्वरवर नेमकी किती रंगांची माती आहे, याबाबत वेगवेगळी मते असू शकतात. लाल, पिवळा, तपकिरी, जांभळा, शेवाळी, दुधी या सहा रंगाची माती तिथे निश्चितपणे आहे. महाराष्ट्रात जांभा आढळणाऱ्या ठिकाणी अशी वेगवेगळ्या रंगांची माती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात विशेषत: कोकण आणि सह्याद्रीचा घाटमाथा या प्रदेशांचा समावेश आहे. या मातीमध्ये आणखी कोणत्या संयुगांचे अस्तित्व आहे याचा शोध घेणे, हा या उपक्रमाचा पुढचा टप्पा असेल. त्यात अत्याधुनिक उपकरणे आणि प्रकिया यांचा अवलंब करण्यात येईल. जांभ्याच्या प्रदेशात इतरही ठिकाणी अशी विविध रंगाची माती मिळाल्याची दाट शक्यता आहे. सह्याद्रीमध्ये भटकंती करणाऱ्यांनी जरुर शोध घ्यावा.
- अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल मंचbhavatal@gmail.com