-वप्पाला बालचंद्रन, माजी विशेष सचिव, कॅबिनेट सचिवालय
संसदेच्या जागतिक इतिहासात सभागृहातील सर्वांत भयंकर हल्ला ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकेत झाला. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंसक समर्थकांनी अमेरिकन संसदेत घुसून काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात अडथळा आणला. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक निकालावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हे अधिवेशन भरले होते. संसदेच्या सभागृहांवरील त्या आधीचा मोठा हल्ला ९ डिसेंबर १८९३ मध्ये फ्रेंच संसदेवर झाला. ऑगस्ट वेलेंट नामक अराजकवादी संघटनेने प्रेक्षक सज्जातून देशी बनावटीचे बॉम्ब फेकले; त्यात फ्रेंच संसदेच्या कनिष्ठ सभागृहात उपस्थित असलेले २० जण जखमी झाले होते. १८९२ मध्ये रावकुल नामक एका दुसऱ्या अराजकवाद्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. ऑगस्ट वेलेंट त्याचा निषेध करत होता. त्यालाही नंतर ४ फेब्रुवारी १८९४ रोजी मृत्युदंड देण्यात आला. ‘अराजक अमर रहे, दांभिक समाज मुर्दाबाद’ अशा आशयाच्या घोषणा देत त्याने मृत्यू पत्करला. यापासून प्रेरणा घेऊन भारतीय स्वातंत्र्ययोद्धे भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि सुखदेव यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकण्याचे ठरवले. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी झालेल्या क्रूर लाठीहल्यात राष्ट्रवादी नेते लाला लजपतराय जखमी होऊन नंतर त्यांचे निधन झाले. या घटनेचा निषेध हे तिघे करत होते. ८ एप्रिल १९२९ला सभागृहात दोन बाॅम्ब फेकण्यात आले. जाचक अशा सामाजिक सुरक्षा कायद्याचा निषेध करणारी पत्रकेही त्यांनी फेकली. त्यानंतर १३ डिसेंबर २०२३ ला सुरक्षा व्यवस्थेचे कडे तोडून काही युवक संसदेच्या नव्या इमारतीत घुसले. भगतसिंग यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे ते सांगत होते.
२३ मार्च २०१७ रोजी लंडनच्या वेस्टमिन्स्टर परिसरात इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु, संसदेच्या इमारतीपर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. रस्त्याने जाणाऱ्या निरपराध पादचाऱ्यांना मोटारींचा वापर करून चिरडून टाकण्याचा एक नवा प्रकार इस्लामिक स्टेटचे दहशतवादी वापरत होते तो हा काळ. अशा प्रकारचा पहिला हल्ला फ्रान्समध्ये नाइस येथे १६ जुलै २०१६ रोजी झाला. मूळच्या ट्युनिशियन दहशतवाद्याने जमावामध्ये ट्रक घुसवून ८४ बळी घेतले. या घटनेत २०० लोक जखमी झाले होते.
भारतात आपल्या संसदेवर अशा प्रकारचा थेट हल्ला १३ डिसेंबर २००१ रोजी झाला. जैश- ए- मोहम्मदच्या अतिरेक्यांनी संसदेच्या आवारात बनावट कार स्टीकर वापरून प्रवेश केला. ते वेगाने पुढे घुसत असताना उपराष्ट्रपतींच्या गाडीच्या ताफ्यामुळे त्यांचा वेग कमी झाला. हा ताफा ओलांडून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता सुरक्षा जवानांनी त्यांना अडवले. उभय पक्षात गोळीबार झाला. त्यामुळे बाकीचे पोलिस सावध झाले. हे अतिरेकी संसदेच्या आवारातील वेगवेगळ्या प्रवेशद्वारांतून घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षारक्षकांवर त्यांनी गोळीबार चालवला होता. मात्र त्यांना संसदेच्या इमारतीत प्रवेश करता आला नाही. केंद्र राखीव पोलिस दलाची हवालदार कमलेश कुमारी यादव हिने संसदेच्या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून टाकले होते. या धुमश्चक्रीत ११ गोळ्या लागून ती मरण पावली.
याच्याही आधी श्रीनगरमध्ये विधानमंडळाच्या इमारतीवर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी १ ऑक्टोबर २००१ रोजी हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली टाटा सुमो त्यांनी या इमारतीवर येऊन आदळविली. स्फोटात आठ पोलिस आणि सामान्य लोकांमधील १२ जण मरण पावले होते. यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेत एक दहशतवादी विधिमंडळाच्या इमारतीत शिरला; परंतु सुदैवाने बैठक स्थगित करण्यात आली होती आणि सभापती तसेच त्यांचे कर्मचारीच केवळ त्या ठिकाणी उपस्थित होते. या कारबॉम्बचा स्फोट झाल्याने विशेष सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात सगळे दहशतवादी मारले गेले. (लेखातील मते व्यक्तिगत)