काळजीचा घोर कोणामुळे?, ...ते आता टाळले, तर महाराष्ट्राचे भले हाेईल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 09:37 AM2021-06-12T09:37:41+5:302021-06-12T09:38:49+5:30
Politics : महाविकास आघाडी सरकारला दाेन वर्षेही पूर्ण झालेली नसताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार असे आताच कसे सांगत आहेत? ही सर्व पार्श्वभूमी आहे.
काळजी करू नका, सरकार पाच वर्षे टिकेल, असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२व्या वर्धापन दिनात करावा लागला. या काळजीचा घोर कोणाला लागला आहे? आणि कोणामुळे लागला आहे, याचा शोध घेतला, तर महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याची जी प्रक्रिया झाली, त्याकडे डोळसपणे पाहावे लागेल. मध्यरात्री निर्णय घेऊन फडणवीस - अजित पवार सरकार तीन दिवसांसाठी कसे स्थापन करण्यात आले, याचे समाधानकारक उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांनी आजवर महाराष्ट्राला दिलेले नाही. शिवसेनेने आमचे हिंदुत्व नकली नाही, तेच खरे आहे, असे सांगत कधीही मवाळ भूमिका घेतलेली नाही. महाविकास आघाडी सरकारला दाेन वर्षेही पूर्ण झालेली नसताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आगामी निवडणुका स्वबळावर लढविणार असे आताच कसे सांगत आहेत? ही सर्व पार्श्वभूमी आहे.
परिणामी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना धीर देण्यासाठी एक ठाम धोरण, कार्यक्रम आणि निर्णय घेण्याची व्यवस्था करावी लागेल. आघाडीची सरकारे नीट चालत नाहीत, असे सरसकट म्हणता येत नाही. काही राज्यांत तीस-तीस वर्षे आघाडीची सरकारे चालविण्यात यश आल्याची उदाहरणे आपल्याच देशात आहेत. शिवसेनेने आडपडदा न ठेवता कायम संघर्ष करावयाचा ठाम पवित्रा घेऊन महाविकास आघाडीचा निर्णय घेतला. तसेच धाेरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे नाही. अजित पवार यांच्या निर्णयक्षमतेबद्दल काेणाला शंका नाही. त्यांची धडाडीही माहीत आहे. त्यामुळेच तीन दिवसांचे जे नाट्य घडले, त्याची संहिता काेणी लिहिली हाेती, हे अद्याप स्पष्ट हाेत नाही, ताेवर महाराष्ट्र काळजी करत राहणार आहे. शिवाय काेणतेही धाेरणात्मक निर्णय घेताना तिन्ही पक्षांचे सूर वेगवेगळे असतात.
वीज बिलात माफी देण्याचा असाे, की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाचा विषय असो, तिन्ही राजकीय पक्ष वेगवेगळी मते मांडतात. आघाडीचे सरकार चालविण्यासाठी समन्वयाची गरज आहे, त्या समितीने आघाडी सरकारच्या काळात कधी प्रभावीपणे काम केलेलेच नाही. आता शरद पवार एकसदस्यीय समितीच अप्रत्यक्षपणे तयार झाली आहे. एकीकडे भाजप हरएक प्रयत्न करून महाविकास आघाडीचे सरकार कसे पडेल याचा विचार करीत असताना, महाराष्ट्राला काळजीचा घाेर सत्ता मिळूनही का लावला जाताे आहे, याचा शाेध घ्यावा लागेल. शरद पवार यांना त्याचा शाेध लागतच असणार. कारण त्यांना महाराष्ट्र आरपार माहीत आहे. सर्व राजकीय पक्ष आणि त्यांची कामाची पद्धतही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी वर्धापन दिनानिमित्त स्पष्ट केलेली भूमिका योग्य दिशादर्शक आहे. शिवसेनेविषयीची त्यांची मते आणि भूमिकादेखील त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
आता भाजपला चुळबूळ करायला जागा ठेवली नाही. काँग्रेस पक्ष भाजपशी जवळीक करू शकत नाही. राष्ट्रवादीने दोन पावले पुढे टाकत शिवसेनेचे काैतुक करीत त्यांना सोबत घेतले आणि आपणच सध्याच्या वातावरणावर आडुळसा देऊ शकतो, हेदेखील शरद पवार यांनी स्पष्ट करून टाकले आहे. वास्तविक सरकार चालविण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा सल्ला घेऊन किंबहुना मदत घेऊन काही महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून सोडविता येतात. नाणारचा प्रकल्प, वाढवण बंदराचा प्रकल्प असो, की पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न असो, यावर केंद्राची सहमती घेण्यास शरद पवार यांची मदत महत्त्वाची ठरू शकते. कोराेनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र राज्य रोजगार निर्माण करून देणारे आहे. परिणामी मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात येतात. असे स्थलांतर ज्या शहरात माेठ्या प्रमाणात हाेते, तीच शहरे दुसऱ्या लाटेत सर्वप्रथम बळी पडली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद ही उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी तरी विनाकारण हवा भरण्याचे काम प्रसारमाध्यमांना या तिन्ही पक्षांनी देऊ नये. शरद पवार यांनी वडिलकीच्या नात्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता नाना पटाेले किंवा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या ताेंडाला लागून करमणूक करीत बसू नये. महाराष्ट्र शाेक पाळत असताना करमणूक कसली करता आणि जेव्हा साेनिया गांंधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे ठाम आहेत, तेव्हा तुम्ही कशाला लुटूपुटूच्या चर्चेची राळ उडवून देता. ते आता टाळले, तर महाराष्ट्राचे भले हाेईल.