चंद्रकांत दडस, उपसंपादक, लोकमत, मुंबई
ज्योतिषी आणि धर्मगुरूंचा सल्ला घेण्यासाठी राजकारणी, व्यापारी, चित्रपट अभिनेते, क्रिकेटपटू ते अगदी सामान्य कुटुंबातील अनेक जण रांगेत उभे राहतात. हे आपल्या भारतासाठी काही नवीन नाही. मात्र तब्बल ४ ट्रिलियन डॉलरचे भांडवल असलेला देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय शेअर बाजार याबाबतीत सर्वात पुढे गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी कोणा हिमालयात राहणाऱ्या एका साधूलाच शेअर बाजार अक्षरशः चालवायला दिला.
यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराने जगभरात आपले हसू करून घेतले आहे. गेल्या काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले असले, तरीही हा साधू नेमका आहे तरी कोण? त्याचे नाव का जाहीर होत नाही? की यात काही राजकीय लागेबांधे आहेत, अशा अनेक चर्चांना उधाण आले आहे. एनएसईच्या माजी अध्यक्षा रामकृष्ण म्हणतात की, मी गेल्या २० वर्षांपासून वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींसाठी ‘शिरोमणी’ असलेल्या साधूकडून मार्गदर्शन घेत आहे! या रामकृष्ण बाईंनी सेबीला २०१८ मध्ये सांगितले होते की, हे साधू हिमालयात राहात असून, त्यांचे कुठेही “अस्तित्व” नाही!
चित्रा रामकृष्ण या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या स्थापनेपासून (१९९२) या संस्थेशी संबंधित आहेत. म्हणजे जवळपास ३० वर्षांपासून त्या या साधूकडून मार्गदर्शन घेत होत्या, असे मानायला जागा आहे. या साधूच्या सांगण्यावरून बाईंनी आनंद सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय शेअर बाजाराचे सीईओ म्हणून नियुक्ती केली. त्यांचा वार्षिक पगार १५ लाख रुपयांवरून तब्बल ४ कोटी २१ लाख रुपये करण्यात आला.या साधूचे जगात मानवी अस्तित्वच नाही, असे चित्रा रामकृष्ण म्हणतात. मात्र साधू आणि चित्रा यांच्यात झालेल्या संवादाचे डिलिट केलेले ई-मेल सेबीच्या हाती लागल्यानंतर सत्य हळूहळू बाहेर येत आहे. हे साधू नियमितपणे शेअर बाजारातील समस्यांवर चित्रा यांच्याशी संवाद करत. त्यांना बाजारातील अंतर्गत कामकाज जवळून माहिती होतेच; पण दिल्लीच्या राजकीय आणि नोकरशहा वर्तुळातही त्यांची चांगलीच उठबसही होती.
या ई-मेल संवादात चित्रा या साधूंना ‘शिरोमणी’ असे संबोधतात. हे साधू बाजारात कोणत्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला कोणती जबाबदारी द्यायची, याबाबतही चित्रा यांना आदेश देत असत, त्याप्रमाणे चित्रा यांच्याकडून कृती केली जात असे. १७ ते २४ फेब्रुवारी २०१५ दरम्यान झालेल्या ई-मेल संवादावरून असे दिसते की, हे साधू एनएसईच्या कर्मचाऱ्यांना नावानिशी ओळखत होते. “लाला यांना नवीन जबाबदारी दिली जाईल, तर कासम उपप्रमुख म्हणून काम करेल. कासमला मुख्य कामातून काढून टाकावे, मयूरला बढती देण्यात यावी”, असे अनेक आदेश साधूंनी ई-मेलद्वारे चित्रा यांना दिलेले दिसतात.
आणखी काही ई-मेल्समध्ये हे साधू रामकृष्ण यांना एनएसईमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी कशी लॉबिंग करावी, यासाठी मार्गदर्शन करताना दिसतात, तर सेबीसोबत काही गोष्टींसाठी तडजोड करण्यासाठी बोलायला हवे, असे हे साधू ४ डिसेंबर २०१५ ला रामकृष्ण यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हणतात. एका ई-मेलमध्ये चित्रा साधूला म्हणतात, स्वामी, शेअर बाजार फक्त तुमच्या आणि माझ्या आशीर्वादामुळे चालत आहे. या संवादातून एकच स्पष्ट होते की, बाजाराचा सर्व कारभार त्या साधूच्या सांगण्यावरून करत होत्या. त्यामुळे कोणतेही पद नसताना मनमानी कारभार करणारा तो साधू कोण? हे बाहेर येणे आवश्यक आहे.