डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
वैद्यकासारख्या पवित्र क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ म्हणजेच ‘नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट २०२४’ च्या निकालांवरून गदारोळ झाल्यानंतर आता कृपांक तथा ग्रेस मार्क्स काढून टाकण्याचा निर्णय झाला आहे; पण, म्हणजे झाले?- नाही. या गैरप्रकारांच्या धंद्याचा खरा ‘नटवरलाल’ कोण हा खरा प्रश्न आहे. एक नव्हे, तर यात अनेक ‘नटवरलाल’ असणार. आता ते गजाआड जातील, की कुणी अदृश्य शक्ती त्यांना वाचवतील? या अदृश्य शक्तींनी याआधी अनेकदा हे प्रताप केले आहेतच! भारतात परीक्षेतील गैरप्रकार आणि ही प्रकरणे दडपून टाकणे नवे नाही. अगदीच डोळ्यावर आले, की रक्त तापते आणि मग व्यवस्थेबद्दल शंका येतात! ५ मे रोजी नीटच्या परीक्षेच्या दिवशीच गैरप्रकार झाल्याच्या माहितीवरून पाटणा पोलिसांनी पाच लोकांना अटक केली. सवाई माधोपूरहून बातमी आली की, हिंदी माध्यमाच्या परीक्षार्थींना इंग्रजी प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. तासाभराने त्या बदलल्या गेल्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हे मान्य केले. निकालानंतर शंका उत्पन्न झाली, की हे चुकून झाले, की ग्रेस मार्क मिळावेत म्हणून प्रश्नपत्रिका जाणूनबुजून बदलल्या गेल्या? भौतिकशास्त्राच्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरांच्या पर्यायांपैकी दोन पर्याय बरोबर होते... हेही ग्रेस मार्क मिळावेत यासाठी झाल्याचा संशय आहे. अशा परीक्षार्थींची संख्या १,५६३ होती. या सर्वांवर व्यवस्थेने कृपा केली.
परीक्षेचा निकाल लागला तेव्हा ६७ विद्यार्थ्यांना एकसारखे सर्वोच्च ७२० गुण मिळाले. यात फरिदाबादच्या एकाच केंद्रावरची सहा मुले होती. प्रत्येक प्रश्न चार गुणांचा असतो. विद्यार्थ्यांनाही तेवढेच गुण मिळायला पाहिजे होते; परंतु काही मुलांना ७१८ आणि काहींना ७१९ गुण मिळाले. असे कसे होऊ शकते? ही सगळी उदाहरणे गैरप्रकार झाल्याचे संकेत आहेत, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला फटकारताना म्हटले, ‘या प्रकारातून परीक्षेचे पावित्र्य डागाळले आहे’- खरे तर हाच गंभीर प्रश्न आहे. परीक्षा दिलेली देशभरातील मुले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे सारेच वेदनादायी! नक्की माहिती नाही; परंतु मी असे ऐकले, की एका डॉक्टर पित्याने आपल्या मुलाच्या बाबतीत हे असे घडल्याने तणावाखाली येऊन चुकीची शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची चर्चा पसरवणे हेसुद्धा हा प्रश्न किती गहन आहे, हेच दाखवून देते.
शिक्षणमाफियांनी व्यवस्थेला ओलिस ठेवले आहे. दरवर्षी प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उघड होतात; परंतु त्यामागचे सूत्रधार मात्र कधीही गजाआड होत नाहीत. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांत असे गैरप्रकार घडत असतील, तर आपण भविष्यासाठी कशा प्रकारची पिढी तयार करत आहोत? अशा प्रकारे परीक्षा उत्तीर्ण होऊन जे तरुण वैद्यक व्यवसायात येतील, ते काय चिकित्सा करतील? वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना पुढे काय शिकवतील? शिकणारे काय शिकतील? ...अभियांत्रिकीसह इतर सर्वच क्षेत्रांत गुणवत्तेचा हा यक्षप्रश्न उभा आहे. जर्जरावस्थेततील प्राथमिक शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण खात्याकडून गैरप्रकाराच्या माध्यमातून सरकारी निधी फस्त करण्याचे अनेक दाखले आहेत. उच्च शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे. शैक्षणिक गुणवत्ता ढासळते तेव्हा देश रसातळाच्या दिशेने जातो. देशात कुशल लोकांची कमतरता आहे. मी नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेत असल्याने अनुभवाने सांगतो, की पात्र उमेदवार कमीच मिळतात. एकट्या टीसीएससारख्या कंपनीत ऐंशी हजारांपेक्षा जास्त पदे रिकामी आहेत. कारण पात्र उमेदवार मिळत नाहीत. अन्य अनेक कंपन्यांतही अशीच परिस्थिती आहे.
भारत सरकारचा शिक्षण विभाग काय करतो आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपण जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती व्हायला निघालो आहोत. त्यासाठी आपल्याला उच्च श्रेणीतील मनुष्यबळ लागेल. कुठून आणणार असे गुणवान लोक? जगाच्या एकूण लोकसंख्येत भारताचा वाटा १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे; परंतु जगातील १०० मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या किती संस्था आहेत? वास्तव अर्थाने एकही नाही. याच कारणाने आपले तरुण अमेरिका, कॅनडा, इंग्लंड आणि इतर पश्चिमी देशांमध्ये जात आहेत. आपल्याकडे तंत्रशिक्षण महाग असल्याने स्वस्त शिक्षणासाठी रशिया आणि तुकडे झालेल्या सोव्हियत संघातील छोट्या देशांमध्येही जातात. चीनमध्ये जातात. त्याकरिता देशाचे परकीय चलन खर्च होते आणि आपण काय करत आहोत? आपण आपल्या युवकांच्या पायावर कुऱ्हाड मारत आहोत. ‘नटवरलालां’ना पोसत आहोत. शिक्षणाचा सर्वनाश केला जात आहे. कपिल सिब्बल मानव संसाधनमंत्री होते, तेव्हा पैशाच्या बळावर अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागा वाटल्या जातात, असे एक प्रकरण त्यांच्यासमोर आले होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश दिला आणि लगाम कसले. आजही शिक्षण क्षेत्रातील या ‘नटवरलालां’ना जेरबंद करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले पाहिजे. कवी नीरज एका कवितेत लिहितात :‘लूट गये सिंगार सभी बाग के बबूल से और हम खड़े खड़े बहार देखते रहे कारवाँ गुजर गया, गुबार देखते रहे’
जगातील उत्तमोत्तम विद्यापीठांमध्ये मी गेलो आहे. तेथे अनेक मोठ्या भारतीय उद्योगपतींची नावे मी दात्यांच्या सूचित पाहिली. हे उद्योगपती भारतात चांगल्या शिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी मदत का करत नाहीत? देशातील शिक्षण व्यवस्थेप्रती त्यांची आस्था आणि सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.