विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, एक युवक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो. हळूहळू स्वतःला संत म्हणवू लागतो. ढोंग रचून एके दिवशी स्वतः थेट परमेश्वर असल्याचे जाहीर करतो. त्याचे हजारो भक्त निर्माण होतात. नंतर एक सीडी येते; त्यात दक्षिण भारतातील एका सुप्रसिद्ध सिनेनायिकेबरोबर तो रतिक्रीडा करताना दिसतो. तक्रारींची यादी लांबत जाते. त्याला अटक होते. तो सुटतो आणि एक दिवशी या देशातून पळून जातो. काही दिवसांनी बातमी येते की, बाबाने एक बेट खरेदी केले आहे. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ नावाचा एक देश निर्माण केला आहे.
- गोष्ट इथेच थांबत नाही. या बाबाची एक प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होते आणि प्रश्न विचारते.ही एखाद्या सिनेमाची कहाणी नव्हे! ही कहाणी आहे आपल्या देशातल्या नित्यानंद नावाच्या एका स्वयंघोषित परमेश्वराची. कोविड काळात पुष्कळ गोष्टी आपल्या आठवणीतून धूसर होत गेल्या. त्यामध्येच हे नित्यानंद बाबा होते.
कुठे काही खबर नव्हती. अचानक गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या दोन बैठकांनंतर हे नित्यानंद बाबा पुन्हा बातम्यांमध्ये झळकले. २२ फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती असा एक विषय घेऊन बैठक आयोजित केली होती. दुसरी बैठक विकासाची दिशा या विषयावर २४ फेब्रुवारीला होती. या दोन्ही बैठकांमध्ये नित्यानंद याचा देश ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ची एक देखणी महिला प्रतिनिधी, बाबाची प्रेयसी विजयप्रिया सहभागी झाली. आपण कैलास देशाचे स्थायी राजदूत आहोत म्हणून तिने ओळख करून दिली होती. नित्यानंद बाबा हे हिंदू धर्माचे सर्वोच्च गुरू असून, त्यांना होत असलेला त्रास थांबवण्यासाठी काय करता येऊ शकते, असा प्रश्न या विजयप्रियाने विचारला.
तिने बैठकींच्या ठिकाणी अनेक महत्त्वपूर्ण लोकांबरोबर फोटो काढून घेतले. ते फोटो स्वघोषित देश कैलासच्या वेबसाइटवर टाकले. त्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला. ‘जिनेव्हामधल्या दोन कार्यक्रमांत फरार गुरू नित्यानंद याच्या काल्पनिक देशाच्या प्रतिनिधीने भाषण केले; पण त्याला आम्ही फार महत्त्व देत नाही, कारण ते प्रासंगिक होते’- अशी सारवासारव यावर संयुक्त राष्ट्रांनी केली. आता प्रश्न असा की, संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत नित्यानंदची ही प्रेयसी विजयप्रिया पोहोचली कशी? ती स्वयंसेवी संघटनेमार्फत गेली, असे सांगितले जाते. परंतु बैठकीत तिच्या नावापुढे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ असा स्पष्ट उल्लेख दिसतो आहे. कोणतीही नोंदणी, चौकशी न होता एखादी व्यक्ती संयुक्त राष्ट्राच्या सामान्य का असेना, बैठकीत सहभागी कशी होऊ शकते? विजयप्रियाला कुठून तरी मदत मिळाली असली पाहिजे, हे निश्चित.
गेल्या वर्षीची एक घटना आठवा. ब्रिटनचे वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने दिलेल्या बातमीत नित्यानंदाच्या प्रतिनिधीनी ‘हाउस ऑफ लॉर्डस’च्या दिवाळी पार्टीत भाग घेतल्याचा उल्लेख होता. त्यात एक विजयप्रियाही होती. या दोघांना कंजर्वेटिव पक्षाच्या दोन खासदारांनी केवळ आमंत्रणच दिले नव्हते तर त्यांचा परिचय ब्रिटन, कॅनडा आणि इतर अनेक देशांना कैलास नामक देशाच्या राजदूत म्हणून करून दिला होता. त्यानंतर ही संयुक्त राष्ट्रातील घटना समोर आली आहे. याचा अर्थ उघड आहे की या लोकांना कोणीतरी मदत करत असणार. ती कोणी केली याची चौकशी झाली पाहिजे; कारण भारताच्या दृष्टीने नित्यानंद फरार गुन्हेगार आहे. बलात्कार, अपहरण यासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत.
आणखी एक प्रश्न, जामिनावर सुटल्यानंतर नित्यानंद भारतातून पळाला कसा? नक्कीच त्याच्यामागे कोणती ना कोणती शक्ती असणार. आपल्या देशाच्या प्रशासकीय वर्तुळात या नित्यानंदची किती वट होती पाहा. या नित्यानंदावर दोन बहिणींना पळवून नेल्याचा आरोप होता. त्या बहिणींना गुजरातमधील त्याच्या आश्रमात त्याने ठेवले आहे, असे सांगितले जात होते. नित्यानंदने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप एका भाविकेने केला. कमाल म्हणजे, जे पोलिस नित्यानंदाविरुद्ध बलात्कार आणि अपहरणाच्या आरोपांची चौकशी करत होते त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. कारण?- त्या पोलिसांनी म्हणे नित्यानंद याच्या आश्रमातील मुलांना अश्लील सामुग्री दाखवली. किती अजब आहे हे!
- अशा परिस्थितीत कोणी पोलिस नित्यानंदाविरुद्ध पाऊल उचलण्याची हिंमत कशी करील? मोठमोठे नेते ज्याच्या पायाशी बसलेले असतात त्याला कोण पकडणार? २०१८ मध्ये त्याच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल झाले होते. २०१९ मध्ये पोलिसांना वाटले की तो फरार असावा. त्याचा ठावठिकाणा कुणाला माहिती नव्हता. मग अचानक बातमी आली की, फरार नित्यानंदाने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर गणराज्यात एक बेट खरेदी करून त्याला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास’ असे नाव दिले आहे. इक्वाडोरने त्यावेळी याचा इन्कार केला. नित्यानंदला आश्रय दिलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते; परंतु तो इक्वाडोरमध्येच आहे, असे म्हणतात. त्याच्या कथित देशाचा ध्वज, घटना, बँक आणि राष्ट्रचिन्हसुद्धा आहे. २०१९ नंतर त्याला कोणीही पाहिलेले नाही; परंतु त्याचे फोटो, प्रवचने कैलासच्या वेबसाइटवर आढळतात. त्याच्याकडे पैसा कुठून येतो हाही, एक प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत आपला प्रतिनिधी पोहोचवून त्याने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता भारताची ताकद काय आहे, हेही त्याला कळले पाहिजे. संयुक्त राष्ट्रांना आपण कठोरपणे विचारले पाहिजे, की ही विजयप्रिया त्यांच्या बैठकीत पोहोचलीच कशी?
या नित्यानंद बाबावर इतकी मेहेरबानी का आणि कुणाची हेही मला कळत नाही. अट्टल गुन्हेगार, आर्थिक घोटाळे करणारे आरोपी आणि हे असले बुवा-बाबा देशातून पळून जाण्यात यशस्वी कसे होतात, सुरक्षा यंत्रणा काय करत असतात, असा थेट प्रश्न विचारण्याची वेळही आलेली आहे. अशा रीतीने कुणीही देशाला धोका देणार नाही, याचा कडेकोट बंदोबस्त झाला पाहिजे.
स्वतःला परमेश्वर मानणारा हा फरार भोंदू बाबा स्वतःची प्रतिनिधी थेट संयुक्त राष्ट्रांत पोहोचवतो, म्हणजे काय ? भारताने संयुक्त राष्ट्रांकडून याचे उत्तर मागितले पाहिजे आणि मुख्य म्हणजे हा भोंदू प्रतिपरमेश्वर जिथे कुठे दडून बसला आहे, तिथे त्याच्या मुसक्या आवळून त्याला देशात आणले पाहिजे !