- किरण अग्रवाल
राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भाने वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांतील काही नावे घेतली जात असून, यंदा खरंच या तीनही जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. तसे झालेच तर तो नक्कीच एक इतिहास ठरेल.
आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असतातच. पण हा विकास अधिक वेगाने पुढे न्यायचा, तर त्यासाठी मंत्रिपदासारख्या जबाबदारीची अपेक्षा बाळगली जाते. राज्यातील शिंदेशाहीच्या सरकारात वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतात याची उत्सुकता त्याचदृष्टीने वाढली आहे. विकासासाठीच मंत्रिपदे इतका मर्यादित हेतू यामागे नाही, तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वर्चस्वाला रोखण्यासाठीचा काटशह म्हणूनही त्याकडे पाहिले जात असल्याने याबाबतची उत्सुकता वाढणे स्वाभाविक ठरले आहे.
राज्यात घडून आलेल्या राजकीय भूकंपानंतर गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आरुढ झाले असून, आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदिच्छा भेटीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहे. यात मंत्रिमंडळाच्या रचनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे खुद्द शिंदे यांनी म्हटल्यामुळे आता कोणत्या मतदारसंघाला व कोणाला लाल दिवा लाभतो हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे यांना ‘खो’ देऊन शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे, त्यासाठी घडून आलेले राजकारण बघता यापुढील काळात ठाकरे यांची संघटना व शिंदे सरकार यांच्यात वर्चस्ववादाची लढाई लढली जाण्याची चिन्हे आहेत. अकोल्यातील शिवसेनेचे एकमात्र आमदार नितीन देशमुख ठाकरे यांच्याकडे माघारी परतल्याने या जिल्ह्यात भाजपाला मंत्रिपद खुणावते आहे. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या या जिल्ह्याला लगतच्या अमरावतीमधील बच्चू कडू यांचे पालकत्व लाभले, परंतु त्यांच्या प्रहार पक्षाच्या विस्ताराखेरीज अकोल्यातील जनतेला वेगळा किंवा विशेष लाभ झालेला दिसून येऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर व महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही आ. रणधीर सावरकर यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रक्रमाने घेतले जात असून, स्थानिक पातळीवर अलीकडे अधिक आक्रमक बनलेल्या शिवसेनेला रोखण्याची खेळी म्हणून भाजपा मंत्रिपदाची आस ठेवून आहे. ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे की सावरकर, अशी येथे स्पर्धा होऊ शकते.
वऱ्हाडाचा विचार करता, केवळ बुलडाणा जिल्ह्यात शिंदे यांच्या बंडाला समर्थन लाभले. शिवसेनेचे आमदारद्वय डॉ. संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून बंडामध्ये साथ दिली. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात या दोघा संजयपैकी एकाला तरी मंत्रिपदाची संधी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर भाजपचे माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये समन्वयकाची भूमिका निभावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणवले जाणारे कुटे यांच्याकडे एक अेाबीसी चेहरा म्हणूनही भाजप पाहात आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपदही पक्के मानले जात आहे. १९७८ पासून आजपर्यंत बुलडाणा जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात किमान राज्यमंत्री म्हणून तरी स्थान मिळालेले आहेच, यंदा मात्र ४७ वर्षांच्या इतिहासात या जिल्ह्याला प्रथमच एका वेळी दोन मंत्रिपदांची संधी चालून आलेली दिसत आहे. तसे झाल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने, म्हणजे मेट्रोच्या गतीने होण्याची अपेक्षा करता येईल.
वाशिमच्या बाबतीत बोलायचे तर १९९८ मध्ये जिल्हा स्थापन झाल्यानंतर या जिल्ह्यातील सुभाष ठाकरे व सुभाष झनक या दोघांनाच मंत्रिपद लाभले. झनक यांच्यानंतर सुमारे १२ वर्षांपासून या जिल्ह्याला मंत्रिपदच मिळालेले नाही. २५ व्या राैप्यमहाेत्सवी वर्षात जिल्हा वाटचाल करीत असताना या जिल्ह्यालाही मंत्रिपद लाभले तर विकास वेगाने हाेईल. विशेष म्हणजे, सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये खासदार भावना गवळी यांचे शिवसेना प्रताेद पद काढून घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल आहे. पक्षांतर्गंत पातळीवर नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. अशास्थितीत आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या राजेंद्र पाटणी यांचे नाव चर्चेत आले असून, खासदारकीमुळे काहीसे आकारास आलेले शिवसेनेचे वर्चस्व रोखतानाच भाजपाला संघटना विस्तारासाठी त्यामुळे माेठी संधी लाभण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यादृष्टीने वाशिमकरांच्या नजरा मंत्रिमंडळाकडे लागल्या असून तब्बल एका तपाचा मंत्रिपदाचा बॅकलाॅग दूर होण्याची अपेक्षा केली जात आहे, जी अवाजवी म्हणता येऊ नये.
सारांशात, अकोला व वाशिम येथे ठाकरेंच्या संघटनेला शह देण्यासाठी तर बुलडाण्यात समर्थकांना संधीसाठी मंत्रिपदांची अपेक्षा केली जात असून, कोणत्या का कारणाने होईना; लाल दिव्यांची संख्या वाढली तर वऱ्हाडाच्या विकासाला चालना मिळून जाईल.