हरीश गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली -
राष्ट्रपतींची निवडणूक होताच ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपती निवडले जातील. याही निवडणुकीच्या हालचाली दिल्लीच्या सत्ता वर्तुळात सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीवर या स्तंभात काही आठवड्यांपूर्वी लिहिले होते. उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असावा यावर आता उच्च वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे कळते.उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने सभागृहाचे काम व्यवस्थित चालणे हे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून असते. संसदेचा अनुभव असलेल्या व्यक्तीकडे हे पद असले, तर काम सुरळीत चालते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.काही अपवाद वगळता मागचे काही अध्यक्ष प्राय: संसदीय कामकाजाचा अनुभव असलेले होते. काहीना मंत्रीपदाचा अनुभव होता. राष्ट्रपती निवडीच्या अगदी उलट संसदेतील ७८६ खासदार उपराष्ट्रपती निवडतात. त्यात राज्यसभेतले १२ आणि लोकसभेतले २ नियुक्त खासदारही असतात.यावर्षीच्या उपराष्ट्रपती निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील ४ राज्यसभा खासदार भाग घेऊ शकणार नाहीत. तेथे विधानसभा अस्तित्वात नाही. एनडीएकडे सध्या लोकसभेत ३३६ जागा आहेत. राज्यसभेतील १२४ धरून ४६० सदस्य होतात. बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, जनता दल (एस) बसपा आणि इतरांनी एनडीए उमेदवाराला पाठिंबा दिला तर ही संख्या वाढू शकते. राज्यसभेच्या ६० जागांसाठी येत्या जुलैत द्वैवार्षिक निवडणूक होत आहे. त्यानंतर कदाचित हे बळ आणखी वाढू शकते.
राजनाथ यांचे नाव अग्रस्थानी? -उपराष्ट्रपती पदासाठी अनेक नावे चर्चिली जात आहेत. प्रत्येकाच्या मागे काही ना काही संयुक्तिक कारण दिले जाते. कोणालाही कधीही कळू शकणार नाही, अशा काही अतर्क्य आणि काही बुचकळ्यात टाकणाऱ्या कारणांसाठी समजा, एम. व्यंकय्या नायडू राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नाहीच झाले तर त्यांचेच नाव या पदासाठी दुसऱ्यांदा घेतले जात आहे. १९५२ ते १९६२ ही सलग दहा वर्षे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. हमीद अन्सारी यांनाही दोनदा हे पद मिळाले; मात्र पुढे येणारी राजकीय स्थिती पाहता यंदा पुन्हा एकवार असे काही होण्याची शक्यता जाणकारांना कमी वाटते. भाजपात एक पिढीकडून पुढच्या पिढीकडे जबाबदारी जाईल असे पक्षाच्या निरीक्षकांना वाटते. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या राजवटीत पंचाहत्तरी ओलांडलेले लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा अशा काहींना बाजूला केले गेले.२०२१ साली झालेल्या मंत्रिमंडळ खान्देपालटात अटल, अडवाणी काळातील १२ मंत्री वगळले गेले. त्यांनी तर पंचाहत्तरीही ओलांडली नव्हती. प्रत्येकच पक्षात अशा प्रकारे एका पिढीकडून दुसरीकडे सूत्रे जातात. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डा हे सरकार आणि प्रत्येक स्तरावर नवी माणसे आणत असतील तर त्यात गैर काही नाही. सध्याचे ३२ कॅबिनेट आणि स्वतंत्र कार्यभार असलेले २ राज्यमंत्री विचारात घेतले तर राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मुख्तार अब्बास नक्वी यांचा अपवाद वगळता बहुतेक शोधून शोधून उचलले गेले आहेत, असेच दिसते. बरेच जण पहिल्यांदाच मंत्री झाले असून संघ परिवाराबाहेरचे आहेत. राजनाथ सिंह सदैवच कमालीचा संयम दाखवत आले आहेत; त्याचा त्यांना फायदा होईल. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तर मोदींवर भरपूर टीका केली तरी त्यांनी दुर्लक्ष केले आहे. म्हणून अनेकांना वाटते की राजनाथ सिंह हेच पुढचे उपराष्ट्रपती होतील. ते स्वत: तर विस्तीर्ण अशा रायसिना हिल्सवर जायला कधीच तयार आहेत. आणखी एक. मोदी यांच्यापुढे ज्येष्ठत्व सिद्ध करू शकतील असे राजनाथ यांच्याहून दुसरे कुणी आहेच कुठे भाजपकडे? आनंदीबेन दुसऱ्या दावेदार यावेळी उपराष्ट्रपतीपद महिलेला मिळेल अशीही एक जोरदार चर्चा सध्या राजधानी दिल्लीत रंगू लागली आहे. अन्य काही महिलांच्या संभाव्य यादीत आनंदीबेन पटेल यांचे नाव अग्रभागी असल्याचे अंतस्थ सूत्रे सांगतात. त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून कार्यकाळ पूर्ण होण्याआधी जावे लागले. मोदी यांनी त्यांना मध्यप्रदेशचे राज्यपाल केले. नंतर उत्तर प्रदेशात नेले. उत्तर प्रदेशातील भाजपच्या निवडणूक यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या आनंदीबेन पटेल समाजाच्या प्रतिनिधी आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातेत विधानसभा निवडणुका आहेत. आनंदीबेन उपराष्ट्रपती झाल्या तर पटेल समुदायाला पक्ष आपल्याबरोबर असल्याचा संदेश मिळेल. हा संदेश राज्य भाजपसाठी गुजरातेत महत्त्वाचाच असणार, हे नक्की !