डॉ. दीपक शिकारपूर, उद्योजक, संगणक साक्षरता प्रसारक
कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, बिग डेटा ॲनालिसिस, रोबोटिक्स या आणि यासारख्या घटकांमुळे संबंधित संगणकीय प्रणाली आणि यंत्रणा अधिकाधिक स्वतंत्रपणे निर्णय घेणाऱ्या आणि स्वयंभू बनत आहेत. लष्कराच्या दृष्टीने यांचे महत्त्व खूपच आहे, कारण अशा सिस्टम्स मानवी मेंदूपेक्षा कैकपटीने जास्त वेगाने निर्णय घेऊन तो तितक्याच त्वरेने अंमलात आणू शकतात, तेही अधिक अचूकतेने. उदा. ताशी शेकडो किलोमीटर वेगाने वाट्टेल तशी वळणे घेणाऱ्या विमानाच्या मागे सोडलेले क्षेपणास्त्र किंवा हजारो किलोमीटर अंतरावरून दुसऱ्या देशातील विशिष्ट लक्ष्यावर सोडलेले भू-लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र. वाटेतील भौगोलिक, तसेच मानवनिर्मित अडथळे टाळून अशी ‘गायडेड मिसाइल्स’ ठिकाणावर अचूक पोहोचतात ती त्यांना पुरवलेल्या माहितीचे झटपट विश्लेषण करण्याच्या संगणकीय क्षमतेमुळेच. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्येही विविध पातळ्या असतात, त्यापैकी दोन मुख्य अशा – नॅरो (ऊर्फ मर्यादित) आणि जनरल (सर्वसाधारण किंवा सर्वसमावेशक म्हणू). ‘नॅरो’चा वापर होताना आपण अनेक ठिकाणी पाहतो व अनुभवतो. ई-मेलचे स्पॅम फिल्टर, ऑटो सर्च, ऑटो ट्रान्सलेट, स्वयंचलित वाहने, दस्तऐवजांची वर्गवारी, तसेच क्रम लावणे, (आपल्याबरोबर) बुद्धिबळ किंवा अन्य बोर्ड गेम्स खेळणारा संगणक आदी! मात्र ‘जनरल ए आय’ हे जरा वेगळे प्रकरण आहे. अशा प्रणाली जवळजवळ मनुष्याप्रमाणेच विचार करून निर्णय घेऊ शकतील, भावभावना आणि शब्दांमागचा खरा अर्थही बऱ्यापैकी समजू शकतील आणि मुख्य म्हणजे केलेल्या चुकांतून आणि अनुभवांतून शिकू शकतील. नॅरो आणि जनरल अशा दोन्ही ‘ए आय’चा वापर लष्करी व सायबर हल्ल्यांसंदर्भात अतिशय प्रभावीपणे केला जाऊ शकतो, हे मात्र आताच सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ मर्यादित बौद्धिक क्षमतेची ‘ड्रोन्स’ म्हणजेच छोटी दूरनियंत्रित स्वयंचलित विमाने फार मोठ्या संख्येने शत्रूच्या प्रदेशात सोडणे. यांची संख्याच इतकी प्रचंड ठेवायची की शत्रूने प्रत्येक ड्रोन शोधून नष्ट करेपर्यंत त्यांनी पुरेशी माहिती मायदेशी पाठवलेली असेल किंवा मालमत्तेचे भयंकर नुकसान केलेले असेल. याला ‘स्वार्मिंग’ असे नाव आहे (swarm – विशेषतः टोळांसारख्या घातक कीटकांच्या समूहाला स्वार्म म्हणतात). लष्करी (उघड, तसेच छुप्या) हल्ल्यांसाठी स्वार्मिंग पद्धत अतिशय प्रभावी आहे, कारण रोबोंची संख्या, अचूकता आणि कोणत्याही धोकादायक स्थितीमध्येही पुढे जाण्याची क्षमता यामुळे शत्रू हतबल होऊ शकतो. शिवाय ही ड्रोन्स तयार करायला तुलनेने खर्च कमी येतो. एक रशियन ‘आत्मघातकी ड्रोन’ जो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लक्ष्य ओळखण्याची क्षमता वाढवतो, युक्रेनवर चालू असलेल्या आक्रमणाच्या प्रतिमांमध्ये दिसला आहे. या ड्रोनचे नाव ‘कुबला’ असे आहे . हे शस्त्र (ड्रोन) हवेत उडत असताना, वर्ग आणि प्रकारानुसार लक्ष्याचा शोध घेते. १.२ मीटरचे पंख असलेला हा ड्रोन लहान पायलटलेस फायटर जेटसारखा दिसतो. हे पोर्टेबल लॉन्चमधून उडवले जाते. ३० मिनिटांसाठी १३० किलोमीटर प्रतितास प्रवास ते करू शकते आणि ३ किलो स्फोटकांचा स्फोट करून जाणूनबुजून लक्ष्यावर कोसळते. रिमोट ग्राउंड टार्गेट्स नष्ट करण्यासाठी या ड्रोनच्या मार्गदर्शन प्रणालीमधून निश्चित लक्ष्यावर मारा केला जातो. रशियाने बॉम्ब निकामी करण्यापासून ते विमानविरोधी तसेच हत्या करण्यापर्यंतच्या कामांसाठी मानवरहित शस्त्रे व वाहने विकसित केली आहेत. हे तंत्र समुद्रात पाण्याखालीसुद्धा काम करते. महासागरांमध्ये, मानवविरहित नौदल आणि समुद्राखालील वाहनांमध्ये एआयचा समावेश करण्याची योजना आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये, रशियाने जमिनीवरील लक्ष्यांवर, शत्रूच्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी आणि ‘गुप्त मोहिमा’ पार पाडणाऱ्या सैनिकांना मदत करण्यासाठी तयार केलेल्या ‘कामिकाझे ड्रोन’ने नौदलाच्या जहाजांना सशस्त्र केले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार आहे, याची जाणीव हळूहळू होऊ लागली आहे. नवसंशोधनाचा वापर सकारात्मक पद्धतीने करायचा की संहारासाठी हे अखेर माणसानेच ठरवायचे आहे! deepak@deepakshikarpur.com