रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार -चित्रपटाच्या पडद्यावर ‘देमार’ हाणामारी करून खलनायकाला धडा शिकवणारा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीपासून वाचवण्यासाठी मुंबई पोलिस सध्या जिवाचे रान करत आहेत. सलमानचे निकटवर्तीय माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याने मुंबई पोलिस चांगलेच हबकले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीची सुरुवात कुठे होते आणि तिचा शेवट कुठे होतो याचा थांगपत्ता कुठल्याच यंत्रणेला लागत नाही. भारतातील माफिया टोळ्यांच्या इतिहासात अवघ्या ३१ वर्षांच्या तरुणाने इतक्या अल्पावधीत जगाच्या पाठीवरच्या अनेक देशात आपल्या टोळीचा कारभार पसरविल्याचे दुसरे उदाहरण नाही. म्हणूनच ही टोळी नेस्तनाबूत कशी करायची या यक्षप्रश्नाचे उत्तर सध्या तपास यंत्रणा शोधत आहेत. लॉरेन्स बिश्नोईचा चौदा वर्षांचा गुन्हेगारीचा प्रवास पाहिला तर ‘देमार’ हिंदी सिनेमाच्या तोंडात मारील, अशी ‘स्टोरी’ समोर येते. गेल्या काही वर्षांत लॉरेन्स बिश्नोई हे नाव भारताच्या अंडरवर्ल्डमध्ये उदयाला आले आणि सध्या अनेक देशांमध्ये त्याची चर्चा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हेही सध्या लॉरेन्स बिश्नोई या नावाने कमालीचे परेशान आहेत. भारताचे राजनैतिक अधिकारी लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने खलिस्तानवाद्यांना लक्ष्य करीत आहेत, असे ट्रुडो म्हणतात. वर्षभराने तिथे निवडणुका होणार आहेत. कॅनडाच्या लोकसंख्येपैकी दोन टक्क्यांहून अधिक शीख समुदाय आहे. ट्रुडो यांना त्यातील खलिस्तान समर्थकांचा पाठिंबा हवा आहे. मागील निवडणुकीत ट्रुडो यांच्या पक्षाला बहुमत मिळू न शकल्याने ते इतर पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत. तिथल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता जगमीत सिंग याने गेल्या महिन्यात जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यावर ट्रुडो यांचे सरकार अस्थिर झाले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला बिश्नोई हा सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडीओबाजीत पारंगत आहे. आपल्याकडील अनेक आयुधांपैकी सध्याच्या या प्रभावी आयुधाचा पुरेपूर फायदा घेत त्याने आपल्या टोळीचा व्याप वायुवेगाने वाढवला. धमक्या देण्यासाठी तो थेट ई-मेल पाठवतो किंवा सोशल मीडियाचा वापर करतो. आधीच्या पिढीतील गुंडांनी हा बेधडक मार्ग वापरला नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्याचे अनेक व्हिडीओ त्याने तुरुंगात चित्रित केल्याचा आरोप होतो. काही व्हिडीओत तो जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना दिसतो तर कधी मृत जवानांना श्रद्धांजली वाहताना दिसतो. कधी शायरी म्हणताना पाहायला मिळतो. आपली प्रतिमा समाजात देशप्रेमी म्हणून उभी करण्याचा त्याचा आटापिटा असतो. सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचे प्रकरण १९९८ साली घडले तेव्हा अवघ्या पाच वर्षांचा असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने शिकारीबद्दल सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी करावी हाही समाजात आपली कट्टरपंथी प्रतिमा तयार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याआड आपली कृष्णकृत्ये झाकली जातील असा बिश्नोईचा समज असल्याचा आरोप पोलिस अधिकारी करतात. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे व्हिडीओ तुरुंगात चित्रित झाले नसल्याचा खुलासा करण्यासाठी पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी लॉरेन्स बिश्नोईने आणखी एक व्हिडीओ व्हायरल करून आपण तुरुंगातच व्हिडीओ चित्रित करत असल्याचे पुरावेच दिले. त्यात त्याने त्याची बराकच दाखवली आणि मोबाइल तुरुंगात त्याच्या हातात पोहोचल्याचे सिद्ध झाले. व्यवस्था आपल्यासमोर कशी झुकते हे दाखवण्याची एकही संधी तो अजिबात दवडत नाही. दोन डझनाहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे हे उपद्व्यापच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता वाढवत आहेत.
बिश्नोई टोळीत असलेल्या सातशे जणांपैकी अनेकांच्या स्वत:च्या टोळ्या आहेत आणि त्या टोळ्या घेऊन ते लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सहभागी झाले आहेत. देश-विदेशातील सर्वांशी तो वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून संपर्कात राहतो. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आणि बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या गुंडांनी ते बिश्नोईच्या इशाऱ्यावरून कोणतीही जोखीम घेऊन आपले लक्ष्य साध्य करत असल्याचे दाखवून दिले आहे. ही टोळी देशातील नऊ राज्ये आणि अमेरिका, अझरबैजान, पोर्तुगाल, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा आणि रशियामध्ये हातपाय पसरेपर्यंत कोणतीच यंत्रणा तिला का रोखू शकली नाही, या प्रश्नाच्या उत्तरातून अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट होतील.
‘शत्रुत्व संपवून जिवंत राहण्यासाठी सलमान खानने पाच कोटी रूपयांची खंडणी द्यावी, नाहीतर त्याची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही वाईट होईल. हे हलक्यात घेऊ नका’, असा लिहिलेला व्हॉट्सॲप मेसेज नुकताच मुंबई वाहतूक पोलिसांना मिळालाय.
काळविटाच्या शिकारीने दुखावलेला लॉरेन्स आता मात्र काही कोटींच्या मोबदल्यात सारे मिटवायला तयार कसा होतो, असा प्रश्न पोलिसांना पडलाय. सलमानकडे लॉरेन्सने फक्त पाच कोटीच मागावेत, हेही अनेकांना खटकते आहे. ही (किरकोळ) रक्कम पाहता तो मेसेज खरेच त्याच्या टोळीकडूनच आलाय का, याची तपासणी पोलिस करत आहेत.ravirawool66@gmail.com