डॉ. मृदुला बेळे, बौद्धिक संपदा, कायद्याच्या अभ्यासक -
बाहुबलीचे संगीतकार एम. एम. किरवाणी (म्हणजेच एम. एम. क्रीम) एकदा एका मुलाखतीत म्हणाले, ‘सुपरहिट चित्रपट करायचा असेल तर एक तर तुमच्याकडे उत्तम कथा, दिग्दर्शक, छायाचित्रकार, नटनट्या असायला हव्यात, नाही तर मग इलियाराजा हा माणूस तुमच्या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक असायला हवा.’- तर दक्षिणेत इलियाराजा या संगीतकाराचा हा असा दबदबा आहे. तब्बल चौदाशे चित्रपटातल्या सात हजार गाण्यांचं संगीत दिग्दर्शन करण्याचा विश्वविक्रम इलियाराजांच्या नावावर आहे; पण अलीकडे त्यांच्या नावावर एक नवाच विक्रम प्रस्थापित होऊ पाहत आहे-,तो म्हणजे वारंवार कॉपीराइटबद्दलचे वाद आणि खटल्यात अडकण्याचा.१९८०च्या दशकात दाक्षिणात्य चित्रपट उद्योगात इलियाराजा उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून उदयाला येऊ लागले. १९७४-१९७५ मध्ये काम सुरू केलं असलं तरी आपली खरी किंमत काय आहे, हे कळायला त्यांना १९८० साल उजाडलं आणि त्यांनी आपला लहानपणीचा मित्र सुब्रमण्यम याच्याबरोबर एको नावाची कंपनी सुरू केली.इलियाराजांच्या सगळ्या गाण्यांचे हक्क या कंपनीने विकत घेतले; पण आपल्या मित्राशी फारसं न जमल्याने इलियाराजा एको कंपनीतून बाहेर पडले. शिवाय मलेशियामधली ॲगी आणि आणखी एक-दोन कंपन्यांकडेही इलियाराजांच्या तीस चित्रपटांच्या संगीतावरचे अधिकार आहेत.काळ पुढे सरकला आणि दिवस आले ते स्पॉटीफाय, यूट्यूब आणि आयट्यूनसारख्या प्लॅटफॉर्मवरून धडाधड गाणी डाउनलोड करता येण्याचे. ही गाणी आता एक ‘डिजिटल कंटेंट’ बनला होता आणि ती पुरविणाऱ्या इनरेको नावाच्या कंपनीचा यात चंचुप्रवेश झाला होता. इलियाराजा यांच्या त्या तीस चित्रपटांच्या गाण्यांचे डिजिटल अधिकार इनरेकोने विकत घेतले. पुढे २०१५मध्ये या सगळ्या कंपन्या आपल्या गाण्यांवरच्या मानधनाची एक दमडीसुद्धा आपल्याला देत नाहीत, त्यामुळे त्यांना आपलं संगीत वापरण्यापासून ताबडतोब थांबवावं अशी विनंती इलियाराजा यांनी न्यायालयाला केली. मद्रास उच्च न्यायालयाने २०२०मध्ये इलियाराजा यांची ही विनंती नाकारली आणि उलट ‘यापुढे त्यांना त्यांच्या गाण्यांवर काहीही मानधन मिळणार नाही, त्यांनी आपल्या कॉपीराइटचा आग्रह धरणं थाबवावं, कारण तो त्यांनी विकून टाकलेला आहे’ असा निर्णय दिला. या विरोधात नुकतेच इलियाराजा मद्रास उच्च न्यायालयाच्या द्विसदस्य खंडपीठाकडे गेले आहेत. या सगळ्यात कॉपीराइट कायद्यातल्या काही शब्दांचा अर्थ न्यायाधीशांनाच कळला नाहीये असं इलियाराजा यांचं म्हणणं आहे. इतकं गोंधळात पडण्यासारखं यात आहे तरी काय? चित्रपटातील गाण्यावरचा कॉपीराइट हा गुंतागुंतीचा विषय आहे खरा! ज्या कुणाच्या बुद्धीचा परिपाक म्हणून एखादी कलाकृती जन्माला येते, त्याच्या मालकीचा कॉपीराइट असतो. गाण्याचे तीन भाग असतात- शब्द, संगीत आणि ध्वनिमुद्रण. शब्दांवर कॉपीराइट असतो गीतकाराचा, संगीतावर संगीतकाराचा आणि ध्वनिमुद्रणावर चित्रपट निर्मात्याचा. मग गायक, वादक यांना कॉपीराइट नसतो का? - तर नसतो. कारण ते गाण्याचे सर्जक नाहीत. ते गीतकाराचे शब्द संगीतकार सांगेल तसे पोहोचविणारे वाहक. त्यामुळे त्यांना गाण्यावर असतो तो ‘परफॉर्मर्स राइट’ नावाचा संबंधित अधिकार; पण हे गाणं हे काही स्वतंत्र गाणं नाही. ते एका चित्रपटाचा भाग! चित्रपटावर कॉपीराइट निर्मात्याचा. गाण्यातल्या चलत चित्रासकट चित्रपट निर्मात्याचा कॉपीराइट! पण आताचा जमाना यूट्यूब म्युझिक, स्पॉटिफायसारख्या प्लॅटफॉर्म्सचा.आपली गाणी स्पॉटिफायसारख्या माध्यमांना पुरविण्याचे अधिकार चित्रपट निर्मात्याने डिजिटल कंटेंट निर्मिती करणाऱ्या इनरेकोसारख्या कंपन्यांना विकलेले असतात. एखादं गाणं ज्या प्रमाणात स्पॉटीफायवर ऐकलं गेलं, त्या प्रमाणात इनरेकोसारख्या कंपनीला मोबदला मिळतो आणि त्या प्रमाणात अशा कंपन्या संगीतकार, गीतकार आणि गायकांना रॉयल्टी देतात. चित्रपट निर्मात्याला ही रॉयल्टी मिळत नाही. गाण्याचे गीतकार आणि संगीतकार चित्रपट निर्मात्याबरोबर करार करताना आपला कॉपीराइट त्यांना ‘प्रदान’ करतात आणि त्याबदल्यात संगीतनिर्मिती करण्यासाठी मोबदला घेतात. ते गाणे ज्या प्रमाणात ऐकले जाईल त्याप्रमाणात मिळणाऱ्या पैशांचा वाटा म्हणजे रॉयल्टी किती असावी अशा सगळ्या अटींचा त्या करारात अंतर्भाव असतो.कॉपीराइटचा ‘जनक’ आणि ‘मालक’ या कॉपीराइट कायद्यातल्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. गाण्यावरचे हक्क निर्मात्याला विकले तरी त्याचे जनक हे गीतकार आणि संगीतकारच आहेत. मालक मात्र चित्रपट निर्माता, त्याच्याकडून हक्क विकत घेतलेल्या एको, ॲगीसारख्या कंपन्या आणि डिजिटल हक्क विकत घेतलेल्या इनरेकोसारख्या कंपन्या! कॉपीराइटचा जनक जेव्हा मालकाला आपल्या कामावरचे हक्क प्रदान करतो, तेव्हा त्याला त्या करारात लिहिल्याप्रमाणे मोबदला मिळायलाच हवा. शिवाय या कलाकृतीचा निर्मिक मी आहे, असं म्हणण्यापासूनही त्याला कुणीही थांबवता कामा नये.१९८०मध्ये जेव्हा ॲगी आणि इतर काही कंपन्यांना इलियाराजा यांनी गाण्यांचे हक्क प्रदान केले तेव्हा डिजिटल कंपन्यांचा उदय झालेला नव्हता. इनरेको तेव्हा दृष्टिक्षेपातसुद्धा नव्हती. नंतर कधीतरी ॲगी आणि इतर कंपन्यांनी हे डिजिटल हक्क इनरेकोला विकले असावेत. इलियाराजा आणि ॲगी व इतर कंपन्या यांच्यातल्या कराराच्या किंवा ॲगी आणि इनरेको यांच्यातल्या कराराच्या अटी काय आहेत हे आपल्याला ठाऊक नाही; पण तरीही मद्रास न्यायालयाने इलियाराजा यांचा या कॉपीराइटशी काहीही संबंध नाही, असे म्हणणे मात्र उचित नव्हे. ते मालक नसले तरी त्यांच्या संगीताचे जनक तेच आहेत, हे सत्य नाकारता येत नाहीच. जनक म्हणून करारातल्या अटीनुसार त्यांना मोबदला मिळायला हवा. म्हणूनच त्यांच्या विनंतीवर आता मद्रास उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठ काय निर्णय देते, हे पाहणे रोचक असणार आहे. तोवर इलियाराजांनी ‘आया है राजा लोगो रे लोगो’ म्हणत दिमाखात आपला कॉपीराइट मिरवायला हरकत नसावी!mrudulabele@gmail.com