गुजरातच्या तरुण तुर्कांचा कल कोणाकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:27 AM2017-11-18T00:27:29+5:302017-11-18T00:27:54+5:30
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे.
डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा एकामागून एक राज्य जिंकत असताना त्यांना गृहकलहाचा सामना करावा लागत आहे. १९९८ पासून गुजरातमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. नरेंद्र मोदींनी तर गुजरातवर एकहाती अंमल प्रस्थापित केला. मात्र ते पंतप्रधान झाल्यानंतर आधी आनंदीबेन पटेल व आता विजय रूपाणी यांची राज्यावर हवी तशी पकड नाही. दोघांच्या काळात राज्यात एकामागून एक प्रश्न उग्र होत गेले. त्यातून लोकांमध्ये असंतोष वाढत गेला. आरक्षणासाठी पाटीदार (पटेल) समाजाने आंदोलन सुरू केले. त्यानंतर गुजरातमध्ये हिंसाचारही झाला होता.
आरक्षणाच्या प्रश्नावर पटेल अनामत आंदोलन समितीचा युवा नेता हार्दिक पटेलच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. २०१५ नंतर हार्दिकचे नेतृत्व पुढे आले. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर हार्दिक तुरुंगातही गेला होता व नंतर त्यास गुजरातबाहेर जाण्यास भाग पाडले होते. आक्रमकपणामुळे हार्दिक हा पटेल समाजात खूपच लोकप्रिय झाला आहे. त्याने नरेंद्र मोदींविरोधात थेट भूमिका घेतली आहे. भाजपाला पराभूत करणे एवढेच पटेल समाजाचे लक्ष्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
गुजरातमधील ओबीसी समाजही भाजपावर काहीसा नाराज दिसत आहे. त्यातून ओबीसी समाजाचा युवा नेता अल्पेश ठाकूर याने तर राहुल गांधींच्या उपस्थितीत थेट काँग्रेसमध्येच प्रवेश केला आहे. २०१६ मध्ये ठाकूर समाजाने शेती व रोजगाराच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर जुलै महिन्यात थेट रस्त्यावरच दूध ओतून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला होता. अल्पेश हा ठाकूर समाजासह ओबीसींचे नेतृत्व करतो. गुजरातमध्ये ओबीसी समाजाचा टक्का एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४० टक्के आहे. त्यांची सरकारवरील नाराजी ही भाजपासाठी डोकेदुखी ठरली आहे.
दलित समाजावर गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. राज्य सरकारने हल्लेखोरांविरोधात ठोस कारवाई केली नाही. त्यातून दलित समाजात सरकारविरोधात एक प्रकारची चीड आहे. दलित समाजाने ठिकठिकाणी मोर्चेही काढले होते. त्यातून दलित युवा नेता निग्नेश मेवानी हासुद्धा भाजपाविरोधात उभा ठाकला आहे. तो लवकरच काँग्रेसच्या गोटात सामील होण्याची चिन्हे आहेत. एकूणच गुजरातमध्ये प्रथमच भाजपाला ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये दलित, ओबीसी व पटेल समाजाची मिळून ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते आहेत.
१९ वर्षांच्या भाजपाच्या सत्ताकाळात काही घटकांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यातून आता विरोधाचा आवाज घुमू लागला आहे. गुजरातचे तीन तरुण तुर्क या निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. तिन्ही युवा नेते विरोधात गेल्याने भाजपा अडचणीत सापडली आहे.