ट्रम्प आणि किम ही लाकडाच्या खेळण्यातील बाहुल्यांची नावे धारण करणारी दोन माणसे साधी नाहीत. आजच्या घटकेला त्यांनी सारे जग वेठीला धरले आहे. ट्रम्पच्या पाठीशी सारे जग उद्ध्वस्त करू शकणारी अमेरिकेची अण्वस्त्र शक्ती उभी आहे आणि तिची कळ त्याच्या एकट्याच्या हाती आहे. किमचे म्हणणे असे की त्याच्याजवळ सारी अमेरिका नाहिशी करू शकेल एवढी अणुशक्ती आहे आणि तिचा वापर तो कधीही करू शकतो. त्या दोघांच्या या तणातणीत बाकीची अण्वस्त्रधारी राष्टÑे गप्प आहेत आणि माघारली आहेत. त्यांच्या हाणामारीत त्यांच्याएवढेच हे जगही उद्ध्वस्त होईल या चिंतेने त्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चीन, रशिया व अन्य काही देशांनी चालविले आहे. त्यातून त्यांची सिंगापूरची १२ जून या दिवशीची शिखर परिषद निश्चित झाली. मात्र ती जाहीर होताच किमचे पोरखेळ पुन्हा सुरू झाले. ‘आम्हाला चर्चेच्या टेबलवर भेटायचे की अण्वस्त्रांच्या तळावर हे ट्रम्पने ठरवायचे आहे’ असे सांगून त्याने त्या परिषदेलाच सुरुंग लावला. परिणामी ट्रम्प यांनी ही परिषद रद्द झाल्याची घोषणा केली. मात्र दोनच दिवसांनी ती पुन्हा होऊ शकेल असे संकेतही त्यांनी व त्यांचे परराष्ट्रमंत्री पाँपेई यांनी दिले. या परिषदेची गरज दोघांनाही आहे. तरीही प्रथम वाकायचे कुणी याविषयीचा तणाव त्यांच्यात आहे. किम हुकूमशहा आहे आणि त्याला फारशी कशाची व कुणाची पर्वा नाही. त्याने आपल्या चुलत्याला व सावत्र भावाला स्वहस्ते मारले आहे. ट्रम्प यांची कीर्तीही अमेरिकेला फारशी साजेशी नाही. एका पोर्नस्टारसह त्यांचे अनेक स्त्रियांशी असलेले संबंध आता उघड झाले आहे. त्यांनाही स्वत:च्या कीर्तीची व अपकीर्तीची फारशी चाड नाही. भीती आहे ती जगाला आणि तीही त्यांच्या अण्वस्त्रांची व त्यांच्या अस्थिर, अशांत व कमालीच्या बदलत्या मानसिकतेची. अण्वस्त्रांची भीती ती प्रथम कोण चालवितो, ती चुकीने चालविली गेली की योजनेने याचीच अधिक आहे. त्यातून ट्रम्प आणि किम हे दोघेही जगाला विश्वसनीय वाटावे असे पुढारी नाहीत. त्यांचे देशही त्यामुळे त्यांना भ्यालेले व धास्तावलेले आहे. ट्रम्पला अडवायला अमेरिकेचे कायदेमंडळ व न्यायशाखा तरी आहेत. किमला थांबवणारे त्याच्या देशात कुणी नाही. जे होते ते त्याच्याच आज्ञेनुसार. अशा पुढाऱ्यांविषयी अनुमान बांधता येत नाही आणि ते बोलतील तसेच वागतील याची खात्रीही देता येत नाही. त्यातून किम बालीश तर ट्रम्प अहंमन्य आहेत. सत्ताधाºयांना सल्ला चालत नाही, हुकूमशहांना तर सल्लागार संशयितच वाटत असतात. त्यामुळे हे दोघेही कुणावर विश्वास ठेवीत नाहीत. ट्रम्प एकाचवेळी रशिया, इराण आणि साºया युरोपशी भांडण करण्याच्या पवित्र्यात तर किमला अमेरिकेएवढाच जपान, द. आशिया व आॅस्ट्रेलियाही शत्रूस्थानी वाटणारा. अशी माणसे त्यांच्याजवळ असलेल्या अण्वस्त्रांहूनही अधिक अविश्वसनीय आणि भयकारी असतात. शस्त्रांना कळ तरी असते. या माणसांची कळ ते स्वत:च असते. आपण अमेरिकेच्या कोणत्याही शहरावर अण्वस्त्रांचा मारा केव्हाही करू शकतो असे किमने अनेकदा म्हटले आहे. तर आम्ही काही क्षणातच किमच्या उ. कोरिया या देशाचा नायनाट करू शकतो अशी धमकी ट्रम्पने दिली आहे. या दोघांचाही उद्दामपणा जग शांतपणे सहन करताना दिसणे ही स्थितीच त्यांचा उन्मत्तपणा वाढविणारी आहे. अशा माणसांचा अनुभव जगाने यापूर्वी घेतला आहे. आता पुन्हा एकवार त्या भयाने ते धास्तावले आहे. अडचण ही की किम हुकूमशहा असल्याने त्याची जनता त्याला भिते आणि अमेरिकेची जनता ट्रम्पच्या वागणुकीने हतबुद्ध होऊन बसली आहे. अशावेळी रशिया व चीन यांनी पुढाकार घेऊन त्यात मध्यस्थी करायची. पण ते देखील मध्यस्थी करण्याऐवजी परस्परविरोधी बाजू घेतानाच अधिक दिसतात. ही स्थिती साºयांनाच निष्क्रिय बनविणारी आणि हतबुद्ध करणारी आहे. मात्र ती फार काळ चालणे हाही शांततेला धोका आहे.
या दोघांना कोण आवरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:58 AM