भाजपचा विजयरथ कोण, कसा अडवेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 05:41 AM2022-03-22T05:41:08+5:302022-03-22T05:41:34+5:30

हिंदी पट्टा धरून पश्चिम आणि उत्तरेत भाजपला भिडणारे नवे समीकरण समोर येईल. काँग्रेसने राजकारणात तयार केलेली पोकळी फार दिवस राहणार नाही.

Who will sttop victorious chariot of BJP how to stop it? | भाजपचा विजयरथ कोण, कसा अडवेल?

भाजपचा विजयरथ कोण, कसा अडवेल?

googlenewsNext

- पवन वर्मा, राजकीय विषयाचे विश्लेषक

नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनी दोन  गोष्टी समोर आणल्या. पहिली म्हणजे भाजपचा निर्विवाद विजय ! उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये त्या पक्षाचा विजय अधिक ठसठशीत आहे. अर्थात, असे असले तरी,  उत्तरप्रदेशातील विजयाकडे २०२४च्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून पाहता कामा नये.  झाले आता २०२४चा निकाल लागल्यातच जमा आहे, असेही मानू नये. २०१२मध्ये उत्तरप्रदेशात मुलायम सिंग यांची सरशी झाली होती. भाजपला कशीबशी १० टक्के मते मिळवता आली. पण, २०१४ साली भाजपने तेथे दणक्यात यश मिळवले. सपा सणकून आपटला. राजकारण ही एक गतिमान प्रक्रिया आहे. या प्रांतात काहीही गृहीत धरता कामा नये. १९७१ साली पाकिस्तानचा पराभव आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर इंदिरा गांधी अजिंक्य वाटत होत्या. पण, १९७४ साली त्या अडचणीत सापडल्या आणि वर्षभरात आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांना आणीबाणी जाहीर करावी लागली.



राजीव गांधी याना १९८४ साली ४०० जागा मिळाल्या. त्यांचा पराभव करणे जवळपास अशक्यच, असे चित्र तेव्हा देशात होते. पण तीनच वर्षात १९८७ साली त्यांचे सरकार अडचणीत आले आणि १९८९ मधल्या निवडणुकीत  राजीव गांधी यांना चक्क पराभवाचा धक्का  सहन करावा लागला. सद्यस्थितीतील काँग्रेस खूपच अडचणीत आली आहे, हे मात्र  सूर्यप्रकाशाइतके सत्य! २०१४पासून लढवलेल्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाने पराभवाचेच तोंड पाहिले आहे. उत्तरप्रदेशात केवळ २ टक्के मते आणि अवघ्या  २ जागा याहून लाजीरवाणी गोष्ट ती  काय असेल ? त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे इतके होऊनही पक्ष बदलायला तयार नाही. कायापालट शस्त्रक्रियेची गरज असताना या पक्षाच्या सर्वेसर्वा नेत्यांना वाटते की, दोन चार पट्ट्या बांधून काम भागेल!  



काँग्रेसवर टीका करताना भाजपच्या यशाचेही विश्लेषण केले पाहिजे. माझ्या मते पक्षाने पूर्ण वापरून घेतलेल्या तीन बाजू या यशामागे आहेत. पहिले राजकीय हिंदुत्व, सोप्या भाषेत राजकीय लाभ समोर ठेवून मतविभागणीसाठी धर्माचा वापर. दुसरी गोष्ट म्हणजे  राष्ट्रवादाची उत्तेजना. देशाची सुरक्षा आम्हालाच कळते, अन्य कोणी प्रश्न करण्याची गरज नाही, केला तर तो देशविरोधी; हा पक्षाचा दावा!  त्यांच्या विजयाची  तिसरी बाजू म्हणजे कल्याणकारी योजनांचा परिणामकारक वापर. बॅंक खात्यात  पैसे थेट जमा करणे, मोफत रेशन वाटणे, प्रधानमंत्री  आवास योजना, उज्ज्वला यांसारख्या योजना नियोजनपूर्वक वापरल्या गेल्या. उत्तरप्रदेशात भाजपने  आणखी एक केले. सत्तास्थानी योगी आदित्यनाथ आहेत, म्हणजे  तुम्ही सुरक्षित आहात, कायदा सुव्यवस्था ठीक आहे, असा संदेश राज्यभर पेरला गेला.



परिणामकारक सोशल इंजिनियरिंगचे  श्रेय पक्षाला दिलेच पाहिजे. उच्च वर्णीयांना बगलेत मारून पक्षाने यादवेतर इतर मागासांचा पाठिंबा मिळवला. राज्याच्या लोकसंख्येत त्यांची संख्या ३२ टक्क्यांपर्यंत जाते. याशिवाय त्याच्या मदतीला संघ कार्यकर्ते होतेच. अखिलेश यादव यांनी लढत चांगली दिली. पण, त्यांच्या  गोटात चलबिचल होती. पहिली गोष्ट, ते उशिरा  जागे झाले. भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी लढायचे तर २०१९ साली पराभूत झाल्यावर त्यांनी  लगेच कामाला लागायला हवे होते. सपाचा मतांचा पाया विस्तृत नव्हता. ८ टक्के यादव, सुमारे १६ टक्के मुस्लीम, ही संख्या पक्की मानली तरी उत्तरप्रदेशात जिंकून द्यायला ती पुरेशी नाही. भाजपला पेचात टाकणारा एखादा टोकदार नेमका  मुद्दाही सपाच्या भत्त्यात नव्हता. केवळ भाजपवर टीका करून भागणार नव्हते. आपण  काय देणार हेही शेवटी मतदारांना सांगावे लागते. शिवाय, महत्त्वाचे म्हणजे  भाजपची बरोबरी करील असे कार्यकर्त्यांचे जाळे पक्षाकडे नव्हते.

या सगळ्याचा अर्थ काय ? - तर  भाजपा अजिंक्य आहे, हे अर्धसत्य! महत्त्वाचे हे, की विरोधकांचीही तयारी नव्हती. राज्याच्या निवडणुकीत भाजप अनेकदा हरला आहे. भाजपशी झुंज देऊन राज्यस्तरावरील  वलयांकित नेत्यांनी बालेकिल्ले राखले आहेत.

भाजपची ताकद देशपातळीवरील निवडणुकीत आहे. तळागाळापासून उत्तम नियोजन, समन्वय, आव्हान, पटतील असे मुद्दे  आणि संघटनात्मक जोर या गोष्टी भाजपकडे आहेत. लोकात असमाधान असले तरी या ताकदीपुढे ते फिके पडते. २०२४चे आव्हान हेच असून, चेंडू आता विरोधकांच्या कोर्टात पडला आहे.

काँग्रेस पक्षाला पर्याय शोधणे हे वर्तमानातले मोठे आव्हान होय. काँग्रेसचे महत्व कमी लेखण्याचा हा प्रयत्न नव्हे!  काँग्रेस या पक्षाच्या अस्तित्त्वामागची संकल्पना, देशाविषयी या पक्षाच्या विचारसरणीत असलेले  भान हे सारे आज  इतके महत्त्वाचे आहे. पण, ऐन मोक्याच्या वेळी भारतासाठी लढायला आजचा काँग्रेस पक्ष असमर्थ ठरताना दिसतो, हे कसे नाकारणार ?. मुख्य म्हणजे पाणी डोक्यावरून गेले तरी  हा पक्ष बदलायला तयार नाही.
एरव्ही साधारणत: २५० जागांवर भाजपचा निकटचा प्रतिस्पर्धी हाच पक्ष आहे. अशा थेट लढतीत भाजपाचा सरशीचा दर ९६ टक्के येतो. म्हणजेच कमकुवत काँग्रेस हेच  भाजपचे सर्वोच्च बळ ठरते.

हिंदी पट्टा धरून पश्चिम आणि उत्तरेत भाजपला लढत देईल, असे नवे समीकरण पुढे आले पाहिजे. निसर्गाप्रमाणे राजकारणही पोकळी ठेवत नाही. या न्यायाने येत्या काही दिवसात असे समीकरण पुढे येईल. उत्तरोत्तर क्षीण होत गेलेल्या काँग्रेस पक्षाने अशी पोकळी निर्माण केली आहे. अन्य कोणी खावा असा मतांचा टक्का आता काँग्रेसकडे उरलेलाच नाही. त्यामुळे जे काही समीकरण, योग्य अशी आघाडी तयार होईल तिला स्वतंत्रपणे उभारणी करावी लागेल. 

देशपातळीवरील भाजपाविरोधी पक्षांच्या एकसंघ प्रयत्नातूनच विरोधकात जोम निर्माण करता येईल. केवळ आकड्यांच्या बेरजा करून विरोधकांचे  ऐक्य होणार नाही. व्यासपीठावर नेते उभे राहून एकमेकांशी हात मिळवतील, तर तेवढ्यानेही काही साधणार नाही. एकेमकांवर कुरघोड्या करून तर त्याहून नाही. समग्र भारत समोर ठेवून सर्वांना शांतपणे धोरण आखावे लागेल.

राजकारण म्हणजे शक्यतेची कला होय! चैतन्यपूर्ण लोकशाहीसाठी सशक्त विरोधी पक्ष हवा. चिकाटीने धोरणात सुस्पष्टता आणून हे साधावे लागेल.

Web Title: Who will sttop victorious chariot of BJP how to stop it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.