कर्नाटकात गेले काही दिवस जे चालले आहे आणि परवा गोव्यात जे घडले ते सारे भारतीय लोकशाहीची विटंबना करणारे आणि जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी त्यांच्या पक्षनिष्ठांबाबत आणि वैचारिक भूमिकांबाबत केवढे बेशरम होऊ शकतात ते दाखवून देणारे आहे. कर्नाटकात आपला पक्ष क्रमांक एकचा असतानाही राहुल गांधींनी जेडी (एस) च्या कुमारस्वामींना सरकार बनवायला पाठिंबा दिला. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना त्यांची मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मागे घ्यायला लावली.
आघाडीचे सरकार जेवढ्या कुरबुरी करीत आणि तडजोडी सांभाळत चालावे तसे ते एवढे दिवस चालले. आता त्यातील कुमारस्वामींच्या पक्षातील काही व काँग्रेसच्या पक्षातील काही आमदारांनी सरकारविरुद्ध बंड करून भाजपच्या नेतृत्वात जाण्याचा निर्लज्जपणा केला. म्युन्सिपालटीचे सभासद अशा वेळी जसे पळावे तसे ते पळून मुंबईत राहायला गेले. (म्हणजे त्यांना तेथे नेऊन त्यांची सरबराई करण्याची व्यवस्था भाजपने केली) तेथून त्यांची धिंड गोव्यात जायची होती व पुढे बंगळुरूला जाऊन त्यांना कुमारस्वामींचे सरकार पाडायचे होते. मुंबईत त्यांना भेटायला गेलेल्या काँग्रेस व जेडी (एस) च्या नेत्यांना महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी अटकाव करून त्यांच्या पक्षद्रोहाला व लोकशाहीच्या त्यांनी चालविलेल्या वस्त्रहरणाला शासकीय संरक्षण दिले. नेमक्या याच सुमारास गोव्यातील काँग्रेसच्या १५ आमदारांपैकी १० जणांनी भाजपशी नवा घरठाव केल्याचे वृत्त आले आणि पक्षांतर वा निष्ठांतर हा भारतीय राजकारणाला गेली काही दशके जडलेला रोग अजून तसाच आहे याचा पुरावा पुढे केला. आपण निवडून दिलेल्या व आपल्या विचारांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींवर लोकांचा विश्वास राहू नये आणि त्यांनी सत्तेच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून मनाला येईल तेव्हा पक्ष बदलावा असे दर्शविणारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची अधोगती आहे. भाजपची विचारसरणी व काँग्रेस आणि जेडी (एस) यांची विचारसरणी परस्परविरोधी आहे आणि आपले पक्षांतर हे विचारांतरही ठरणार आहे याची तमा या प्रतिनिधींनी बाळगली नाही आणि लोक आपले काही बिघडवू शकत नाहीत, असा विश्वासही त्यांनी जाहीर केला आहे. देशात कधी नव्हे तेवढे पक्षांतर हे आता टोकाचे ‘निष्ठांतर’ झाले आहे. काँग्रेस व जेडीएसमधून माणसे थेट भाजपचे भगवे निशाण खांद्यावर घेतात हा प्रकार थेट ‘धर्मांतर’च्या पातळीवर जाणारा आहे, अखेर धर्म काय किंवा विचारसरणी काय या माणसांच्या जीवननिष्ठा निश्चित करणाऱ्या बाबी आहेत. मात्र या प्रकारचा दोष पक्षांतर करणाºया आमदारांचाच नाही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन व प्रलोभन देणाºया भाजपच्या नेत्यांचाही आहे.
काँग्रेस किंवा जेडीएस हे पक्ष आपले आमदार ‘सांभाळू’ शकले नाहीत यासाठी काही जण त्यांनाही दोष देऊ शकतील. पण सत्ताधाऱ्यांचे प्रलोभन आणि सत्ताहीनांची विनवणी यात फार मोठे अंतर आहे. सत्तेची पायरी चढून जाणे हा राजकारणातील एकमेव महत्त्वाकांक्षेचा विषय आहे आणि त्या पायरीसाठी पायघड्या घालायला प्रत्यक्ष दिल्लीतील सत्ताधारी पक्ष मुंबईत, गोव्यात आणि बंगळुरूमध्ये उतरत असेल तर त्या दिशेने जायला या आमदारांनाही लाज वाटण्याचे फारसे कारण नाही. सगळे पक्ष, सगळे पुढारी व सगळ्या संघटनाच यासाठी दोषी आहेत, असे मग म्हणावे लागेल. विचार व कार्यक्रम यावर पक्षाची उभारणी करता येत नाही आणि एखाद्या पुढाºयावरील निष्ठेपायीच ज्यांना संघटना उभ्या करता येतात त्यांचे याहून वेगळे काही व्हायचेही नसते. पक्षांतराची लागण (एक कम्युनिस्ट पक्ष सोडला) तर देशातील सगळ्या पक्षांना आहे. त्यांचा तमाशाच आज आपण राजकारणाच्या कानडी रंगभूमीवर पाहत आहोत. यात निषेध कुणाचा करायचा? त्या आमदारांचा, त्यांना प्रलोभने दाखविणाºया दिल्लीकरांचा की त्यांना आपण निवडून देतो म्हणून आपलाच?