सध्या जिथे पाहावं तिथे मोठमोठ्याला इमारती बांधल्या जात आहेत. उंचच उंच इमारती, त्यात सतराशे साठ सुखसोयी. अर्थात, इमारत किती का मोठी असेना, ती इमारत म्हणजे काही शहर नाही. इमारतीमध्ये कितीही सुविधा असल्या तरी आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, कामधंदे करण्यासाठी त्या इमारतीमधून बाहेर पडावंच लागतं. पण जगात अशी एक इमारत उभी आहे जिथे राहणारी माणसं महिनोनमहिने इमारतीच्या बाहेर नाही पडली तरी त्यांचं कोणतंही काम अडत नाही. ‘संपूर्ण शहर एका छताखाली’ अशी या इमारतीची ओळखच आहे. एका इमारतीने जवळ जवळ संपूर्ण शहराला सामावून घेतलं आहे. व्हिटीयर हे या इमारतीचं नाव. अमेरिकेतील अलास्का येथे ही व्हिटीयर इमारत आहे. व्हिटीयर हे शहर आहे आणि इमारतही.
या १४ मजली इमारतीत शहरातले ८५ टक्के लोक राहतात. या इमारतीत जेनेसा लाॅरेन्झ ही तरुणी गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या आईवडिलांसोबत राहते. आपल्या या इमारतीची माहिती सांगणारा एक व्हिडीओ तिने काही महिन्यांपूर्वी तयार केला आणि तो समाजमाध्यमांवर पोस्ट केला. आता एवढुशा शहराबद्दल खरंतर कोणाला काय वाटणार आहे? असा तिचा समज होता. पण तिच्या या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले, तेव्हा तिला जाणवलं की लोकांना छोट्या शहराबद्दल भलेही काही वाटत नसेल पण एका इमारतीत राहणाऱ्या आपल्या या छोट्या शहराबद्दल मात्र लोकांना खूप कुतूहल आहे.
व्हिटीयर इमारतीत राहणाऱ्या माणसांना इमारतीच्या बाहेरच पडावं लागत नाही. कारण या १४ मजली इमारतीत घरांसोबतच किराणा दुकानं, रोजच्या जगण्याला आवश्यक गोष्टींची दुकानं, उद्योग व्यवसायांची कार्यालयं, शासकीय कार्यालयं, पोस्ट ऑफिस, महापौरांचं कार्यालय, पोलिस स्टेशन, छोटं रुग्णालय, हाॅटेल्स, थिएटर, मुलांना खेळण्यासाठी जागा, व्यायामासाठी जिम आणि चर्च असं सर्व काही आहे. शिवाय बालवाडीपासून बारावीपर्यंत शिक्षणाची सोयही याच इमारतीत आहे. जेनेसा आणि तिच्या सोबतची ५०-६० मुलं याच इमारतीतल्या शाळेतच शिकली.
व्हिटीयर इमारतीत राहायला येण्याआधी जेनेसा अलास्कामधील ॲन्क्रोएज या शहरात राहायची. हे शहर इथून तासाभराच्या अंतरावर. व्हिटीयर येथे ती आणि तिचे आईबाबा उन्हाळ्यात यायचे. पण इथला निसर्ग, वातावरण, इथली शांतता, इतर जगापासूनची अलिप्तता जेनेसाच्या आईबाबांना इतकी आवडली की त्यांनी आपला मुक्कामच व्हिटीयर इमारतीत हलवला. जेनेसाच्या शाळेपासून खेळण्यापर्यंतच्या सर्व गरजा इमारतीतच पूर्ण होत होत्या. कडक हिवाळ्यातही व्हिटीयरमध्ये करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. इमारतीच्या लाॅबीमध्ये खेळता येतील असे अनेक खेळ, शिवाय इमारतीपासून काही अंतरावर हिमनद्यांची सफर, डोंगर चढणे, बर्फावरून घसरणे, शेकोटी करणे अशा अनेक गोष्टी करून येथील लोक आपलं मन रमवतात. आजूबाजूला बर्फच बर्फ. ओसाड वाटेल अशी जागा आणि तिथे एका इमारतीत अख्खं शहर सामावलेलं. आजूबाजूला कितीही जागा असली तरी येथील लोकांना ती खरेदी करता येत नाही. कारण येथील ९७ टक्के जागा रेल्वेच्या मालकीची. व्हिटीयर ही येथील एकमेव अशी जागा जिथे लोक स्वत:च्या मालकीचं घर घेऊन राहू शकतात. याच एका कारणाने अख्ख्या शहराने एका इमारतीत आपलं बस्तान बसवलं.
व्हिटीयरच्या जन्माची ऐतिहासिक गोष्ट
व्हिटीयर या इमारतीचा जन्म दुसऱ्या महायुद्धात झाला. १९४१ मध्ये सिमाॅन बाॅलिव्हर हे कमांडिग जनरल होते. त्यांना अलास्कामधील ॲकोरज आणि फेअरबॅंक्स या शहरात सामरिक लष्करी तळ उभारायचा होता. हा तळ गुप्तपणे उभारण्यासाठी जे सैनिक लागणार होते त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आणि लष्करी तळ उभारण्यासाठी लागणारी सामग्री गुप्त जागी ठेवण्यासाठी एक जागा हवी होती. त्या जागेची गरज व्हिटीयरने पूर्ण केली. त्यांनी सहामजली इमारत बांधून १००० लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. तेव्हा या जागेला ‘एच १२’ हे नाव दिलं होतं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर ही इमारत नाहीशी करायचं असं ठरलं होतं. पण तसं झालं नाही. लगेच शीतयुध्द सुरू झालं.
अमेरिकेने आपलं सैन्य आणखी बलशाली करण्याचं ठरवलं आणि या सहामजली इमारतीचं रूपांतर १४ मजली इमारतीत झालं. नंतर त्याचं नामकरण ‘बेगीच टाॅवर’ झालं. तेथे सैन्याची कुटुंबासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली. शीतयुध्द संपल्यानंतर झालेल्या भूकंपात या इमारतीचं विशेषत: लष्करी तळाचं नुकसान झालं आणि तेथील बरेच सैनिक ती इमारत सोडून गेले. पुढे १९७३ नंतर लोकांनी ठराव करून लष्कराची ही जागा राहण्यास उपलब्ध करून घेतली. या इमारतीचं नाव बदलून ते अमेरिकेतील प्रसिद्ध कवी जाॅन ग्रीनलीफ व्हिटीयर यांच्या नावावरून व्हिटीयर असं ठेवलं गेलं.