सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महर्षींनी राजकारणात कोणासाठी काय केले याची उजळणी केली. भूतकाळाचा त्यांचा हा ठाव कोणासाठी...राजकीय घराणी हा विषय नेहमीच चर्चेचा व बऱ्याचदा वादाचा ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील या घराण्याचा दबदबा सर्वश्रुत असून राजकारणात घराण्यांचा दबदबा कायम राहतो, या आपल्या सामाजिक वैशिष्ट्याशी नाते सांगणारा एक सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने पार पडला. माळशिरस तालुक्याच्या माळरानावरील मातीचं सोनं करून नंदनवन फुलविणाऱ्या शंकररावांना अभिवादन करण्यासाठी आयोजिलेल्या त्या समारंभास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आवर्जून उपस्थित होते. राज्याच्या ग्रामविकासाला आकार देण्याचे ऐतिहासिक काम शंकररावांनी केले. त्या कामाची उजळणी होणे, त्यापासून नव्या पिढीने नव्या जगाच्या मागणीला साद घालणारी प्रेरणा घेणे अपेक्षित आहे. या कार्यक्रमातही सहकारमहर्षींच्या कार्याचे स्मरण क्षणोक्षणी केले गेले. वास्तविक यजमान म्हणून माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आपल्या वडिलांप्रती असलेल्या भावनांना वाट करून देतील, असे सर्वांनाच वाटत होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही आणि प्रास्तविकाच्या निमित्ताने विजयसिंहांचे चिरंजीव व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीच सहकारमहषींचे कार्य आणि एकूणच सोलापूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकारणाच्या भूतकाळाचा ठाव घेतला. तो घेताना शंकररावांनी स्व. नामदेवराव जगताप यांच्यापासून ते थेट स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्यापर्यंतच्या जिल्ह्यातील अनेक नेत्यांसाठी काय केले, याची जंत्रीच सादर केली. अकलूजचा सहकारी साखर कारखाना उभा करताना स्वत:ची जमीन गहाण टाकण्याची हिंमत शंकररावांनी कशी दाखविली, हेही सांगायला रणजितसिंह विसरले नाहीत. त्या भाषणाबद्दल दमदार भाषण असाच सूर सोलापूर जिल्ह्यात उमटला. हा सूर आणि भूतकाळाचा ठाव नेमका कोणासाठी, या प्रश्नाचे उत्तर मात्र जिल्ह्याच्या राजकारणातील प्रत्येक जण आपापल्या सोयीने शोधत असल्याचे दिसून येते.विजयसिंह मोहिते-पाटील सध्या खासदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणावरील त्यांची मांड ढिली झाली आहे. पवार काका-पुतण्यांवर निष्ठा वाहणाऱ्या फळीचीही जिल्ह्याच्या राजकारणात वाताहत झाली आहे. अजित पवारांच्या विश्वासू शिलेदारांची ‘तरुण तुर्क’ फळी आपल्या खांद्यावर सोयीचे झेंडे घेऊन राष्ट्रवादीच्याच विरोधात लढण्यास कधी सज्ज झाली हे अजितदादांनाही कळले नाही. त्यात भाजपाचे दोन देशमुख (सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख) स्वत:च्या सोयीने या परिस्थितीचा फायदा घेत आपली देशमुखी गाजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा बँक मोहिते-पाटलांसह अनेक दिग्गजांच्या थकलेल्या कर्जाच्या ओझ्याने खंगली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार व खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्या कार्यक्रमात घेतलेला भूतकाळाचा ठाव नक्की कोणासाठी, या प्रश्नाचे ठोस उत्तर मात्र सापडत नाही. ते उत्तर कोणाच्या बाजूचे आणि कोणाच्या राजकीय फायद्याचे ही बाब अलाहिदा! पण सहकारमहर्षींच्या स्मरणानिमित्ताने मिळणारा त्यागाचा संदेश कोणी गांभीर्याने घेणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. पंढरपूर-लोणंद रेल्वे मार्ग, भीमा-कृष्णा खोरे स्थिरीकरण आणि नदीजोड प्रकल्पांसारख्या विषयांवर आचारसंहितेमुळे सुरेश प्रभू ठोस घोषणा करू शकले नसले तरी ते जिव्हाळ्याचे विषय या कार्यक्रमाच्या निमित्ताने सकारात्मक वळणावर येऊन पोहोचले, ही आनंदाची बाब. याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर सर्व प्रश्न ‘प्रभुचरणी’ असल्याचे आवर्जून सांगत राहिले. या कार्यक्रमात शरद पवार यांचा नामोल्लेखही झाला नाही, हे देखील एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. पण शेवटी रणजितसिंहांनी आपल्या भाषणात घेतलेला वेध अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालेल, हे कोण नाकारणार?- राजा माने
भूतकाळाचा ठाव कोणासाठी...
By admin | Published: January 19, 2017 11:57 PM