- सुधीर महाजन
‘तेरे कमीज से मेरे कमीज पर धब्बे कम है’, असा खेळ औरंगाबादेतशिवसेना आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी सुरू केला आहे. तुझ्यापेक्षा मी किती स्वच्छ हे दाखवताना माझ्या सदऱ्यावरही डाग आहेत; पण ते तुझ्यापेक्षा कमी आहेत, असेच सांगण्याचा हा प्रयत्न. म्हणजे घोटाळे आम्हीही करतो; पण तुमचे तर महाघोटाळे आहेत. तुम्ही महाघोटाळेबाज आम्ही म्हणजे ‘चिरगूट’ असा हा प्रकार. हे दोघेही पक्ष एकमेकांचे कपडे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. महापौरांनी चहा, नाश्ता, भोजनावळी, फोटो, यासाठी कशी उधळपट्टी केली हे एमआयएमने उघड करताच शिवसेनेनेही मुशायऱ्याचा पैसा एमआयएम नेत्याने कसा हडप केला, याची कथा लावली. यातून मनोरंजनच झाले. आता एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील हे पाच दिवसांत महापालिकेतील शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचे घबाडच बाहेर काढणार आहेत. एका अर्थाने आता हा कलगीतुरा रंगणार आणि यांच्यात तोंडातून महापालिकेतील भ्रष्टाचारांच्या सुरसकथा बाहेर पडणार, अशी आशा करायला हरकत नाही; पण असे घडणार नाही. जलीलसुद्धा भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर मांडणार नाहीत. कारण या आरोप-प्रत्यारोपाचे स्वरूप पाहता एकमेकांवर शिंतोडे उडविण्याचा हा खेळ दोघेही खेळणार नाहीत, एवढा राजकीय सुज्ञपणा या दोघांकडेही आहेच.
लोकसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. पाच वर्षांपूर्वी मध्य औरंगाबादची विधानसभेची जागा शिवसेनेच्या नाकावर टिच्चून एमआयएमने जिंकली आणि आता खासदारकी हिसकावली. त्यामुळे हा पराभव सेनेच्या पचनी पडणे शक्यच नाही. या पराभवाची पहिली मळमळ महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाहेर पडली. या सभेत खा. जलील यांच्या अभिनंदनाचा एमआयएमच्या प्रस्तावाला शिवसेनेने बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सर्वच नवनिर्वाचित खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावरून एमआयएमचे नगरसेवक संतप्त झाले आणि गदारोळ उडाला. २० सदस्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही सरकारकडे पाठविण्यात आला. येथूनच दोन पक्षांमधील धुम्मस बाहेर आली. जलील यांच्या वैयक्तिक अभिनंदन ठरावाला बगल देत सेनेने मार्ग काढला. कारण महापौर नंदकुमार घोडेले यांना चंद्रकांत खैरेंना दुखवायचे नव्हते. शिवसेनेची सारी सत्ताच चंद्रकांत खैरे यांच्याकडे एकवटली असल्याने त्यांना पराभूत करणाऱ्या उमेदवाराच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्याएवढे मोठे मन आणि धारिष्ट्य घोडेलेंकडे नाही आणि समजा त्यांनी असे केले असते, तर त्यांना ते परवडणारेही नव्हते. याचे उत्तर म्हणून एमआयएमने महापौर घोडेले यांच्या उधळपट्टीचे जाहीर दाखले द्यायला सुरुवात करीत महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. नंतर सेनेने मुशायऱ्याच्या खर्चाचे पाकीट उघडे केले?
या दोन पक्षांतील ही हाणामारी एवढ्यापुरती मर्यादित राहिली असती, तर हरकत नव्हती. उलट जनतेचे मनोरंजन झाले असते. महापालिकेतील गैरव्यवहाराची सुरस, मनोरंजक प्रकरणे बाहेर आली असती. आपण कर रूपाने भरलेला पैसा कसा उधळला जातो, याचे वास्तव लोकांसमोर आले असते; परंतु आता शिवसेनेने एमआयएमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शाहगंजमधील ज्या टपरी प्रकरणावरून गेल्यावर्षी दंगल झाली होती त्या टपऱ्या हटविण्याचा पवित्रा आता सेनेने घेतला आहे. हा संवेदनक्षम मुद्दा असल्याने त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. एमआयएम हा महापालिकेतील विरोधी पक्ष; परंतु महापौरांच्या उधळपट्टीचा विषय त्यांनी सभागृहात उपस्थित करण्याऐवजी निदर्शनानंतर मांडला. याच विषयावर त्यांना सभागृहात सेनेची कोंडी करता आली असती. महापालिकेत गेली चार वर्षे ‘गुण्या गोविंदाने’ राहणारे हे दोन पक्ष हमरीतुमरीवर आले; पण या क्षुल्लक राजकारणासाठी शहराची शांतता वेठीस धरली जाऊ शकते.