- किरण अग्रवाल
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयाेगाला ‘अकाेला पॅटर्न’ म्हणून राज्यभरात जशी ओळख आहे, तशीच ओळख त्यांनी प्रत्येक निवडणुकीत केलेल्या नवनव्या राजकीय प्रयाेगांचीही आहे. परवा त्यांनी अकाेल्यातील पत्रकार परिषदेत हाेय, आम्हाला शिवसेनेसाेबतही आघाडी करायला आवडेल, हवे तर हाच आघाडीचा प्रस्ताव समजा, अशी खुली ऑफर शिवसेनेला दिली. महिनाभरापूर्वी अशीच ऑफर त्यांनी काँग्रेसला दिली हाेती. निवडणुकीचे पडघम वाजू लागले की, त्यांची अशी ऑफर गाजते, फक्त ती वाजत गाजत ‘लग्ना’पर्यंत अर्थात आघाडी गठित हाेण्यापर्यंत पाेहोचत नाहीत. असे का हाेते? याचा विचार आता वंचितने अंतर्मुख हाेऊन करण्याची वेळ आली आहे.
खरेतर आंबेडकरांनी आपल्या पक्षात काळसुसंगत बदल करून पक्षाच्या कक्षा रुंदावत नेल्या, आपणच स्थापन केलेल्या भारिप बहुजन महासंघाला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करून आपल्या पारंपरिक मतांना ओबीसी मतांची जाेड देत गेल्या लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय उपद्रवमूल्य इतर पक्षांना दाखवून दिले. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळेच अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीची गणिते बिघडली. त्यामुळेच त्यांच्या पक्षाला भाजपाची बी टीम म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने हिणवलेही. या पृष्ठभूमीवर त्यांच्या प्रस्तावांचा काँग्रेस सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र ती फाेल ठरली. याला कारणेही तशीच आहेत. आंबेडकरांकडून आघाडीचा दिला जाणारा प्रस्ताव हा रीतसर दिला जात नाही. केवळ माध्यमांमध्ये ते बाेलतात. बहुजन मतांमध्ये विभाजन हाेऊ नये, यासाठी मी तयार आहे, असे दाखविण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असताे, तर कधी ते आपल्या पक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा मागतात, असेही आराेप अनेकदा काँग्रेसकडून झाले आहेत. यात तथ्य असेल तर त्यांच्या पक्षासाेबत आघाडीची चर्चा ही माध्यमांचे रंजन याच पातळीवर भविष्यातही राहील. त्यामुळे अशा प्रस्तावांचे गांभीर्य त्यांना कृतीतून दर्शवावे लागणार आहे.
खरेतर काँग्रेस हे आंबेडकरांचे पहिले प्रेम आहे. त्यांना अकाेल्यातून लाेकसभेत मिळालेल्या प्रतिनिधित्वात काँग्रेसचा ‘हात’ महत्त्वाचाच ठरला हा इतिहास आहे, त्यामुळे आधी काँग्रेसला संधी देत नंतर इतर पक्षांचा पर्याय ते खुले ठेवत आले आहेत. डावे पक्ष, एमआयएम अशा पक्षांना साेबत घेऊन त्यांच्या पक्षाला काहीच फायदा झालेला नाही, हे आकडे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेससाेबत त्यांचे पटत नाही, किंबहुना काँग्रेस आघाडीत सहभागी हाेण्यासाठी राष्ट्रवादी नकाे, अशीच छुपी अट त्यांची राहिली असल्याचे आराेप आहेत. भाजपासाेबत जाणे त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे अलीकडे काही प्रमाणात सॅाफ्ट झालेली शिवसेना चालेल, या भूमिकेपर्यंत ते आले असतील, म्हणूनच शिवसेनेला त्यांनी खुली ऑफर दिली. यापूर्वीही शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येण्याचे प्रयत्न झाले हाेते, आता आंबेडकरांनी नव्याने साद घातली आहे. अर्थात त्याला प्रतिसाद मिळताे की, त्याचेही केवळ प्रतिध्वनीच उमटत राहतात, हे काळच सांगेल.
सारांशात ॲड. आंबेडकरांच्या पक्षाला अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी यश अनुभवता आले. मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत यश आले नाही. आताचा काळ हा युती आघाडीचा काळ आहे. त्यामुळे सेना असाे की काँग्रेस, यांच्यासाेबत आघाडी करण्याकडे त्यांचा कल वाढला असेल तर ताे त्यांच्या काळसुसंगत धाेरणाचाच भाग आहे. फक्त ते कृतीत किती उतरते ते लवकरच कळेलच, घाेडामैदान जवळच आहे.
भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करून आव्हान देण्यामध्ये आंबेडकरांच्या पक्षाचे उपयुक्तता मूल्य अधिक हाेईल, हे वंचितने गेल्या निवडणुकीत कमावलेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. तरीही त्यांना साेबत घेऊन आघाडी करण्यास प्रमुख पक्ष का धजावत नाहीत? याचाही विचार आता आंबेडकरांनी केला पाहिजे.