छोटे देश जास्त ‘आनंदी’ का असतात?..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:53 AM2022-03-28T05:53:43+5:302022-03-28T05:55:05+5:30
युद्धाचे सावट आहे खरे; पण इथे नेदरलँडमध्ये लोक आनंदी दिसतात. आपल्याकडे आपण अस्थायी, अवाजवी कामात आपली ऊर्जा खर्च करतो का?
डॉ. विजय पांढरीपांडे
यापूर्वीही नेदरलँडला तीन-चार वेळा गेलो; पण यावेळची ट्रीप जरा वेगळी. त्यामागे एकीकडे कोरोनाच्या भूतकाळाची पार्श्वभूमी अन् दुसरीकडे रशिया - युक्रेन युद्धाच्या ढगांची सावली! त्यातल्या त्यात एका ताज्या बातमीने मानसिक समाधान मिळाले. ते म्हणजे आपण एका दुःखी देशातून सर्वाधिक आनंदी देशात आलोय!
संयुक्त राष्ट्रांनी नुकतीच जागतिक सुख-मापनाची क्रमवारी प्रसिद्ध केली. त्यात युरोपीय छोटे देश अव्वल क्रमांकावर आहेत. अवघी पंचावन्न लाख लोकसंख्या असलेला फिनलंड देश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड अन् पाचव्या क्रमांकावर नेदरलँड! १४६ देशांच्या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. मोठे देश दिवसेंदिवस आनंदाला पारखे होत चालले आहेत, असे या यादीवरून दिसते. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्याचे निकष लावून, भ्रष्टाचाराची पातळी, भावनांचे विश्लेषण, स्वास्थ्य सुविधा, शिक्षणाचा दर्जा अन् या सर्वांचा नागरिकांवर होणारा परिणाम यावर हे आनंदाचे मोजमाप ठरते. एकमेकांप्रति सहिष्णुतेची भावना, सौहार्दाची भावना, सरकारी, राजकीय पातळीवरचा स्वच्छ कारभार असे बरेच निकष असतात ही आनंदी देशांची यादी करण्यामागे. आपण स्वतःला विकासाचे अग्रदूत, महासत्ता वगैरे होण्याची स्वप्ने पाहणारा देश समजत असलो, तरी माणसाचे समाधान, आंतरिक आनंद यामागची मानसशास्त्रीय कारणे वेगळी असतात. सामान्य माणसाकडे माणुसकीच्या भावनेतून बघितले जाते की, नागरिकाच्या भावनांचा अनादर करून त्यांना क्षुल्लक समजले जाते, हेही सर्वंकष आनंदाचे मोजमाप ठरवितानाचे महत्त्वाचे परिमाण असते.
गेल्या दोन-अडीच वर्षांत कोरोनाच्या सावटातून, लॉकडाऊनच्या कटू, बंदिस्त अनुभवातून मोकळा श्वास घ्यायची संधी मिळताच अनेकांनी वेगवेगळे बेत आखले. आमच्या पुढे नेदरलँडमधील फिलिप्स सिटी म्हणून प्रसिद्ध असलेला इंधोवन हाच प्राथमिक पर्याय होता. मुला-सुनेचे नवे स्वतःचे घर बघायचे, नातीना भेटायचे, ही आमच्यासाठी प्राथमिक गरज होती. सुदैवाने व्हिसा, हवाई प्रवासाचे बुकिंग यात फारशा अडचणी आल्या नाहीत आणि आम्ही या देशात पोहोचलो!
चाळीस डिग्रीच्या उन्हातून पाच- सात डिग्रीच्या थंड वातावरणातले स्थलांतर वयोमानानुसार जाणवतेच. सात-आठ वर्षांनंतर या देशात आल्यावरही फारसा फरक जाणवला नाही. तीच शिस्त, तीच स्वच्छता, तेच निरोगी वातावरण... रशियाने सुरू केलेल्या युद्धाचे परिणाम तेवढे जाणवले. गेल्या वीस दिवसातच पेट्रोलचे भाव कधी नव्हे ते दीडपट वाढले आहेत. (१८० रु. लीटर. आपल्याकडे पेट्रोलने शंभरी पार केली तर ती ब्रेकिंग न्यूज होते. मोर्चे निघतात.) गेल्या दोन-तीन दिवसात कुकिंग ऑईल गायब झाले आहे मार्केटमधून... पण मोर्चे, आंदोलने दिसत नाहीत. मागे लॉकडाऊनला कंटाळलेले लोक मात्र रस्त्यावर आले होते म्हणे! एव्हढे सारे असूनही लोक आनंदी आहेत. गोंधळ नाही की राजकीय उलथापालथ नाही. आपल्याकडे बहुतेक ऊर्जा, शक्ती ही आपण अस्थायी, अवाजवी कार्यात खर्च करतो का? आपण स्वतःची बुद्धी न वापरता, कुणाच्या नादी लागून कसल्या तरी प्रवाहात वाहवत जातो का? आपणच आपल्या दुःखाचा इंडेक्स वाढवतो का? पैसा, संस्कृतीचे पाठबळ असूनही आपण आनंदी का नाही, याचा विचार केला पाहिजे.
(लेखक माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहेत)
vijaympande@yahoo.com