सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा
ड्रग्जचा उघड व्यापार, त्यातून होणारे गुन्हे तसेच मद्याच्या अतिसेवनाने गोव्यात होणारे सेलिब्रेटींचेही मृत्यू यामुळे गोव्याचे पर्यटन बदनाम होत आहे. टिकटॉक स्टार सोनाली फोगोट हिच्या मृत्यूनंतर तर गोव्याच्या पर्यटनाची व ड्रग्ज व्यापाराची चर्चा मध्यंतरी देशभर झाली. गोव्यातील समुद्रात अजूनदेखील मोठ्या संख्येने पर्यटक बुडून मरण आहेत. एकाबाजूने पर्यटक गोव्यात येऊन आपल्या स्वैर वर्तनाने गोव्याला बदनाम करतात आणि दुसऱ्या बाजूने गोव्यातील काही दलाल किंवा भामटे पर्यटकांना लुबाडत असल्याने आता गोव्याचे पर्यटन नको रे बाबा असे पर्यटक म्हणू लागले आहेत. पर्यटकांना मारहाण करणे, त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करणे, हॉटेलमधून त्यांचे सामान पळविणे असे गुन्हे अलीकडे वाढले आहेत. यामुळे पोलिस दलातही चिंता आहे.
जीवनात एकदा तरी गोवा पहायला हवा असे जगभरातील पर्यटकांना वाटते. काश्मीरप्रमाणेच गोव्याची ख्याती आहे. अर्थात गोव्यात बर्फ नसला किंवा प्रचंड थंडी नसली तरी, या राज्यातील सुखद हवामान पर्यटकांना भुरळ पाडते. या दिवसांत तर सिंगापूरच्याच हवामानासारखे गोव्याचे हवामान आहे. मात्र पर्यटक समुद्रात बुडाले, कळंगूटमध्ये पर्यटकांना खोलीत कोंडून लुबाडले अशा बातम्या पर्यटकांच्या मनाचा थरकाप उडवत आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी गोव्यातील एकूण पर्यटनाशी निगडीत सरकारची चिंता वाढली आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे किंवा कळंगूटमधील बडे रेस्टॉरंट व्यवसायिक तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी सतत पर्यटकांच्या अशा प्रकारच्या असुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली आहे. गोव्यात येणारे पर्यटक दुचाकी किंवा चारचाकी वाहन भाड्याने घेतात व पूर्ण गोवा पिंजून काढतात. या पर्यटकांना वाहतूक पोलिस काही ना काही कारण देऊन पर्यटकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावतात.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश अशा राज्यांत नोंद असलेल्या वाहनांची क्रमांकपट्टी पाहून ते वाहन थांबविले जाते आणि मग दंड ठोठावला जातो. रोज अशा प्रकारे शंभरहून अधिक पर्यटकांना दंड भरावा लागत आहे. यामुळे गोव्यात फिरणे आता पर्यटकांना नकोसे वाटू लागले आहे. परराज्यांतून वार्षिक पन्नास लाखांहून अधिक देशी पर्यटक गोव्याला भेट देण्यासाठी येतात. अलीकडेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली होती की- परराज्यांतून गोव्यात येणाऱ्या वाहनांची कागदपत्रे एकदाच राज्याच्या सीमांवरील तपास नाक्यांवर तपासली जातील. त्यानंतर ही वाहने वाहतूक पोलिसांकडून वारंवार गोव्यात थांबवली जाणार नाहीत. प्रत्यक्षात तशी कोणतीही उपाययोजना अजून झालेली नाही.
गोव्याचे पर्यटनमंत्री खंवटे यांनीही या विषयाबाबत एकदा पोलिस महासंचालकांशी चर्चा केली होती. आमदार मायकल लोबो यांनीही पर्यटकांचा हा छळ थांबवा अशी मागणी वारंवार केली आहे. पण, लुबाडणूक व सतावणूक थांबलेली नाही. गोव्यात उघड्यावर स्वयंपाक करणाऱ्या पर्यटकांना पकडून दंड ठोठावला जातो. मात्र गरीब व मध्यमवर्गीय पर्यटकांना गोव्यातील महागड्या हॉटेलांमध्ये राहणे परवडत नाही. अलीकडे हॉटेल व्यावसायिक छुप्या पद्धतीने खोलीभाडे वाढवत आहेत.
उत्तर गोव्यात जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. कळंगूट, कांदोळी, बागा, सिकेरी, वागातोर, आश्वे, मोरजी, हरमल, हणजुणा या किनाऱ्यांची नावे प्रसिद्ध आहेत. याच भागांमध्ये काही दलालांकडून पर्यटकांना मुली व महिला पुरविण्याचे खोटे आश्वासन दिले जाते. त्यासाठी कितीही पैसे मोजण्यास तरुण पर्यटक तयार होतात. मग हे पैसे घेऊन दलाल पसार होतात. अशा प्रकारांवरूनही अलीकडे दलाल किंवा रेस्टॉरंट मालक व पर्यटक यांच्यात भांडणे होत आहेत. आम्हाला गोव्यात लुटले असे सांगण्यासाठी शेवटी पर्यटक पोलिसांकडे धाव घेतात.
समुद्रस्नान करण्यासाठी पाण्यात उतरणारे पर्यटक आपले कपडे, मोबाइल वगैरे किनाऱ्यावर ठेवतात. अनेकदा अशा पर्यटकांचे मौल्यवान साहित्य चोरट्यांकडून पळविले जाते. गेल्या आठवड्यातली घटना ताजी आहे. कळंगूट येथील एका क्बलमध्ये चांगली सेवा पुरविली जाईल असे दोघा पर्यटकांना सांगून खोलीत डांबले गेले. त्या पर्यटकांची लुबाडणूक केली गेली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून एका दलालासह दोघा कामगारांना अटक केली. हे पर्यटक कर्नाटकमधून आले होते.
काश्मीरमधून २८ व ३४ वर्षीय दोघे सख्खे भाऊ अलीकडेच गोव्यात आले होते. लग्न ठरल्यामुळे आनंदित होऊन हे दोघेजण आपल्या काही मित्रांसमवेत बॅचलर पार्टी करण्याच्या हेतूने आले होते. दोन्ही भावांचा गोव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. एरवी जीवरक्षक काही किनाऱ्यांवर असतात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सगळीकडे प्रभावी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.