तुम्ही माणसं का मारताय?, युक्रेनच्या आजींनी पुतीन यांना खडसावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:26 AM2022-05-28T06:26:53+5:302022-05-28T06:27:15+5:30

तुम्ही माणसं का मारताय?

Why are you killing people? Putin was stabbed by Ukraine's grandmother | तुम्ही माणसं का मारताय?, युक्रेनच्या आजींनी पुतीन यांना खडसावले!

तुम्ही माणसं का मारताय?, युक्रेनच्या आजींनी पुतीन यांना खडसावले!

Next

८२ वर्षांच्या मारिया मायाशपकाल नावाच्या युक्रेनी आजीबाई गेले तीन महिने रोज देवाची प्रार्थना करतात आणि सुरू असलेल्या युद्धातून त्यांना सहीसलामत ठेवण्याची करुणा भाकतात.  रशियाने त्यांच्या देशात घुसखोरी केल्यापासून त्यांचा हा रोजचा शिरस्ता झालेला आहे. गेल्याच आठवड्यात वेगळं काहीतरी घडलं. रोजच्याप्रमाणे सकाळी मारिया आजी देवाची प्रार्थना करत असतानाच प्रचंड मोठा आवाज झाला, आजूबाजूला धुळीचे आणि धुराचे लोट उठले आणि एका क्षणात आजीबाईंच्या घराचं स्वयंपाकघर आणि परसबाग होत्याची नव्हती झाली.  रशियन फौजेने टाकलेला बॉम्ब त्यांच्या घरावर पडला होता. अर्ध घर पूर्णपणे नष्ट झालं आणि उरलेलं अर्ध घर कुठल्याही क्षणी कोसळेल, अशास्थितीत कसंबसं उभं राहिलं. मारिया आजी या घरात एकट्याच राहतात. सोबतीला त्यांचं मांजर. तेही या हल्ल्याने बावचळून  घराच्या पडलेल्या भागात कुठेतरी अडकून मदतीसाठी हाका मारत राहिलं. विशेष म्हणजे या सगळ्यातून मारिया आजी मात्र आश्चर्यकारकरित्या बचावल्या. 

रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याला तीन महिने उलटून गेले.  पुतीन यांच्या युद्धपिपासू वागण्याबद्दल त्यांची जगभर छी थू झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या झेलिन्स्की यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचं जगभर कौतुक झालं. तीन महिने उलटून गेले तरीही या युद्धाचा निर्णय काय, हे काही ठरत नाही. त्यामुळे जागतिक राजकारणात झालेल्या गोचीपेक्षाही अन्नाच्या पुरवठा साखळ्यांवर झालेला परिणाम अधिक भयंकर ठरतो आहे.

- पण युक्रेनमधल्या मारिया आजींसारख्या सर्वसामान्य जनतेसाठी मात्र युद्ध हे आजचं वास्तव आहे. रशियन विमानांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे शहरच्या शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक घरांच्या जागी आता फक्त जळक्या, पडक्या भिंती उरल्या आहेत. अनेकांची जवळची माणसं या युद्धाने हिरावून घेतली आहेत. युक्रेनच्या बख्मुतमध्ये राहणाऱ्या मारिया आजी म्हणतात, ‘मला सुरक्षित ठेवावं यासाठी मी रोज देवाची प्रार्थना करत होते... आणि देवाने माझं ऐकलं. त्याचं माझ्याकडे लक्ष आहे! नाहीतर मी तरी का जिवंत वाचले असते?’
 - पण हा सुटकेचा निःश्वास सोडतानाच त्यांनी असा एक प्रश्न विचारला आहे जो जगातल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकाच्या मनात आजवर एकदा तरी येऊन गेला असेल. या ८२ वर्षांच्या आजीबाई विचारताहेत, ‘पुतीन यांच्यासाठी रशिया पुरेसा मोठा नाहीये का? ते माणसांना का मारत सुटले आहेत? मी देवाकडे अशी प्रार्थना करते की देवा, रशियन लोकांची सद्सद्विवेकबुद्धी जागी कर.’ 

पृथ्वीवरच्या सगळ्यात मोठ्या देशाला हा प्रश्न विचारावा लागणं हे पराकोटीचं दुर्दैवी आहे. अर्थात सर्वसामान्य रशियन नागरिकांचा या युद्धाला पाठिंबा असेल, असा निष्कर्ष कोणी काढू शकत नाही. आजदेखील रशियामधील सर्वसामान्य नागरिक अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून युक्रेनवर लादलेल्या युद्धाचा निषेध करताहेत. ही निदर्शनं केल्याबद्दल रशियन नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागू शकते आणि तरीही अनेक नागरिक या युद्धाला विरोध करताहेत. कारण त्यांनाही मारिया मायाशपकाल नावाच्या युक्रेनी आजीबाईंना पडलेलाच प्रश्न सतावतो आहे, ‘रशिया पुरेसा मोठा नाहीये का?’ 
बख्मुत भागातील डेप्युटी मेयर सुट्कोव्होय मात्र यावेळी भलत्याच तणावाखाली आहेत. ते म्हणतात,   आम्ही लोकांना इथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण लोक मात्र इथून हलायला तयार नाहीत. बख्मुत भागाची जबाबदारी असलेल्या सैन्याच्या पलटणीचे प्रमुख सर्गेई म्हणतात, अजून रशियन फौज आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही.  आमच्यावर फक्त वायुदलाचे हल्ले होताहेत. पण अजूनही लोक घर सोडून सुरक्षित ठिकाणी जायला तयार नाहीत. आम्ही आता लोकांना इथून बाहेर पडण्याची सक्ती करायला लागलो आहोत.

तुम्ही माणसं का मारताय?
बॉम्बहल्ल्यातून वाचलेल्या मारिया आजींना पडलेला प्रश्न आहे की, ‘ते माणसं का मारताहेत?’ त्यांच्या घराच्या गल्लीतल्या झाडांचे शेंडे बॉम्बहल्ल्यात जळून गेले आहेत आणि क्षितिजावर दर काही वेळाने उठणारे धुराचे लोट युक्रेनच्या डोनबस भागात आत आत घुसत चाललेल्या रशियन सैन्याचं अस्तित्व त्यांना विसरू देत नाहीयेत.

Web Title: Why are you killing people? Putin was stabbed by Ukraine's grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.