राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी तसे अनेक मुद्दे असताना त्यांनी दिल्ली शहरातील प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून जो सम-विषम तारखांचा प्रयोग सुरू करण्याचे जे योजिले आहे त्यातून स्वत:चा आणि आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा अपवाद न करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचे स्वागत न करता हाही त्यांचा प्रसिद्धीचाच एक स्टंट असल्याची टीका करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्या वाहनांच्या क्रमांकातील अखेरचा अंक सम असेल तीच वाहने सम तारखांना रस्त्यावर येतील व तेच विषम क्रमांक आणि विषम तारखांबाबत लागू होईल असा नियम केला गेला आहे. त्यातून त्यांनी राजधानीतील काही बड्या पदांवरील तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना सूट दिली असली तरी स्वत:ला मात्र अशी सूट घेतलेली नाही. तसे करण्यामागे दिल्ली शहरातील अन्य बड्यांनी आपले अनुकरण करावे आणि या मोहिमेत पुढाकार घ्यावा असाही एक अंतस्थ हेतू असू शकतो व तसे असण्यात काही वाईट नाही. त्यांच्या या मोहिमेचे खुद्द न्यायव्यवस्थेनेही स्वागत केले आहे. मुळात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर नववर्ष दिनापासून केवळ पंधरा दिवस अंमलात येणार आहे. या प्रयोगाचा कितपत लाभ होतो यावर तिला कायमस्वरूपी राबवायचे वा नाही याचा विचार केला जाणार आहे. कोणत्याही स्थितीत प्रदूषण आटोक्यात आलेच पाहिजे या विचाराने दिल्ली शहरात डिझेलवर चालणाऱ्या मजबूत मोटारींची नोंदणी तीन महिन्यांपर्यंत स्थगित ठेवण्याचे आणि पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश तर चक्क न्यायालयांनीच दिले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या राज्याची राजधानी असलेल्या पाटणा शहरात पंधरा वर्षे जुन्या मोटारींना प्रवेश बंदीचा प्रयोग लागू करण्याचा विचार करू लागले आहेत. त्याचवेळी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत असे स्पष्टपणे म्हटले आहे की, चुकारांना दोन हजारांचा दंड आणि वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद नियमात असली तरी शहराचा व्याप आणि आवाका लक्षात घेता केवळ पोलीस यंत्रणा सर्व वाहनांवर लक्ष ठेवू शकेल आणि चुकारांवर कारवाई करू शकेल हे शक्य नाही. लोकानी आपल्या शहराच्या स्वच्छ पर्यावरणासाठी आपणहून यात सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. केजरीवाल यांची अपेक्षाही काही वेगळी नाही. पण समाजासमोर आदर्र्श निर्माण करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पुढाकार घेतला तर त्यातून चांगला संदेश जात असतो व त्यासाठीच केजरीवाल यांनी स्वत:स अपवाद न करण्याचे ठरविले असावे. त्याला प्रसिद्धीचा स्टंट म्हणून हिणवायचे कोणालाच काही कारण नाही.
टीका कशासाठी?
By admin | Published: December 27, 2015 9:49 PM