- तेचि गुबिन, संचालक, गृहनिर्माण विभाग अध्यक्ष, अरुणाचल विकास परिषद
आज इटानगरहून मुंबईला फक्त ४ तासांत विमानाने सहज येता येतं. अरुणाचल प्रदेशात विमानतळ झालं, रेल्वे पोहोचली, इटानगरहून देशाच्या कोणत्याही भागात विमानानं काही तासांत पोहोचता येतं. आताच्या काळात यात काय मोठंसं अप्रूप? - असं भारतातल्या अन्य राज्यात राहणाऱ्या कुणाही व्यक्तीला वाटणं साहजिकच आहे. मात्र, देशाच्या इशान्येच्याही अतिपूर्वेला असलेल्या या राज्यात अगदी अलीकडच्या काळापर्यंत दळणवळणाची साधनं नव्हती. इटानगरहून साधं गुवाहाटीला जायचं तर चोवीस तास लागत. तीन-तीन दिवस प्रवास करून दिल्ली-मुंबईसारख्या शहरात पोहोचावं लागायचं. जिकिरीचा प्रवास, त्यामुळे स्थानिकांनी बाहेर जाणं अवघड, देशातून बाकीच्यांना येणंही अवघड. अशा तुटलेल्या प्रदेशात राहणारी माणसं नेमकी कशी जगतात, हे इतरांना समजणंही अवघडच होतं.
अरुणाचल प्रदेशात किमान २६ विविध जमाती. शिवाय पोटजमाती १०० हून अधिक. प्रत्येकाची भाषा, खानपान, राहणीमान, श्रद्धा, परंपरा अलग. निसर्गपूजक रीतीभाती वेगवेगळ्या. सत्तरच्या दशकात अरुणाचल प्रदेशात बळजबरीच्या धर्मांतरणाविरोधात जी आंदोलनं झाली त्यात शाळकरी वयात मी स्वत: सहभागी झालो होतो. बस्ती-बस्तीत जाऊन, लोकांना भेटून आम्ही सांगत होतो की आपली भाषा, परंपरा, श्रद्धा, प्रार्थनापद्धती आपण जपल्या पाहिजेत. आपण एक असायला हवं. पुढे आम्ही ‘निशी इंडिजिनिअस फेथ ॲण्ड कल्चर असोसिएशन’ची स्थापना केली. मी निशी कम्युनिटीचा प्रतिनिधी. सुरुवातीला संस्थापक उपाध्यक्ष होतो, मग अध्यक्ष झालो. आपल्याच माणसांना एक करणं, आपल्या प्रार्थनापद्धतीसह आपली भाषा, चालीरीती जपणं, श्रद्धांवर होणारं बाह्य आक्रमण रोखणं ही आव्हानं होती. अरुणाचल प्रदेशातच आदी नावाच्या जमातीने याच टप्प्यातून प्रवास करत त्याच काळात आपली प्रार्थनाघरं असावी, असा उपक्रम सुरू केला. त्याला नामघर, न्यमलो असंही म्हणतात. दर शनिवारी लोक एकत्र येऊन प्रार्थना करत.
आम्हीही शनिवारी एकत्र प्रार्थना सुरू केल्या. मात्र, नोकरी करणाऱ्यांना शनिवारी येणं शक्य नव्हतं, मग रविवारी प्रार्थना सुुरू झाल्या. सुरुवातीला तर आम्ही आमच्या प्रार्थना सभांना अन्य जमातीच्या लोकांनाही आमंत्रणं दिली. हाही एक वेगळा प्रयोग होता, लोक दुसऱ्या प्रार्थना सभांना जात नसत. मात्र, त्या भेटीही सुरू झाल्या.हळूहळू अरुणाचल प्रदेशातील अन्य जमातीच्या लोकांनी म्हणजे आपातानी, मिस्मी, गालो यांनीही आपापली प्रार्थनाघरं उभारली. त्यातून अरुणाचलात एक चळवळच उभी राहिली. प्रत्येक कम्युनिटीने आपापली नामघरं उभारली. अनेक कम्युनिटीमध्ये सूर्य आणि चंद्राची उपासना होते. दोन्यी पोलो म्हणतात त्यांना.- या साऱ्यांतून साधलं काय, तर १९९०च्या दशकात एक राज्यस्तरीय संघटना उभी राहिली. ‘इंडिजिनिअस फेथ ॲण्ड कल्चरल सोसायटी ऑफ अरुणाचल प्रदेश’. स्थानिक लोकसंस्कृती, भाषा, रीतीभाती, खानपान यांचं संवर्धन व्हावं, यासाठी ही संस्था काम करू लागली. पुढे २००१ मध्ये राज्य सरकारने इंडिजिनिअस फेथ ॲण्ड कल्चरल डिपार्टमेंट सुरू केलं. त्यातून सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी काम हळूहळू उभं राहू लागलं. बळजबरीचं धर्मांतर थांबलं.विविध जनजातींच्या लोकांनी आपापली प्रार्थनाघरं उभारत ‘एकत्र’ येत स्थानिक वारसा जपण्याचं, संस्कृतीसह प्रार्थनापरंपराच नाही तर खानपान ते भाषा, ते पोशाख या साऱ्याचं महत्त्व जाणलं आणि हे सारं ‘आपलं’ आहे, आपण जपलं पाहिजे, ही भावना मूळ धरू लागली. आता बऱ्यापैकी ती रुजलीही आहे.
याच काळात रस्ते, रेल्वे, विमानं अरुणाचल प्रदेशात पोहोचले. देशभरातून पर्यटकही येऊ लागले, स्थानिकांनाही आपल्या महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसह मोठ्या संधींसाठी देशभर जाण्याची संधी उपलब्ध होऊ लागली. प्रवास सोपा झाला आणि त्यामुळे देशाशी जोडलं जाणं फार सुकर होऊ लागलं. सीमावर्ती, दुर्गम भागात राहणाऱ्या माणसांसाठी हे सारं फार महत्त्वाचं ठरतं. एकीकडे आपलं स्थानिक वेगळेपण जपणं आणि दुसरीकडे मुख्य प्रवाहाशी जोडलं जाणं, हे दोन्ही महत्त्वाचं आहे. परस्परांच्या श्रद्धांचा, प्रार्थनापद्धतींचा, भाषांचा आदर राखत मुख्य भारतीय प्रवाहाचा भाग होण्याची प्रक्रिया आता कुठं आकार घेऊ लागली आहे.